India,  More to Explore,  शोध अज्ञाताचा.....

झिरो : हाक निसर्गाची….

झिरो : हाक निसर्गाची….

Apatani-Tattooed-women-in-Ziro ( अपातानी जमात )
एक असा प्रदेश जिथे उन्हाळ्यातही थंडावा असतो आणि हिवाळ्यात तर अंग गोठवणारी थंडी असते. नजर जाईल तिथे पाईन वृक्षांची झाडं, घनदाट अरण्यं आणि हिरवीकंच शाल पांघरलेले पर्वत दिसतात. कुठेही उभे रहा फोटो काढायला, अगदी पिक्चर परफेक्ट सीन प्रत्येक अँगलमध्ये मिळावा ! ही जागा काही परदेशात नाही तर ती दडलीय विविधतेने नटलेल्या भारताच्या उत्तर-पूर्वेला असलेल्या अरुणाचल प्रदेशात ! तिलाच तर म्हणतात झिरो व्हॅली! 
खरं तर हे आहे अपातानी पठार ( Apatani Plateau). समुद्रसपाटीपासून १५०० मीटर  उंचीवर वसलेले  हे पठार म्हणजे अपातानी लोकांचं माहेरघर! अपातानी ही तिथली एक जमात आहे. चेहऱ्यावरील टॅटू आणि स्त्रियांच्या नाकाच्या दोन्ही बाजूंना लावलेल्या मोठया गोलाकार नथी हेच त्यांचं वैशिष्ट्य! काही वर्षांपूर्वी हा प्रदेश तसा अज्ञातच होता, पण युनेस्कोने त्याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा  दिला आणि नंतर झिरो व्हॅली पर्यटकांच्या बकेट  लिस्टमध्ये समाविष्ट झाली. पण तरीही या प्रचलित  सेव्हन सिस्टरली स्टेट्स मध्ये  बिनधास्तपणे  पर्यटनासाठी  जायला अनेक पर्यटक  कचरतात.  त्यामुळे  तिथे  इतर पर्यटनस्थळांइतकी गर्दी नसते. म्हणूनच साहसप्रेमींसाठी हे मोक्याचं ठिकाण आहे. जर तुम्हालाही निसर्गाच्या कुशीतली शांतता अनुभवत गिर्यारोहण करायचं असेल तर नक्कीच  झिरो व्हॅलीला भेट द्या. 

तिथे  गेल्यावर काय काय पाहायचं हा प्रश्न पडला असेल ना ! तर त्याचंच हे उत्तर : 

१. झिरो पुटो (Ziro Pito) 
नव्या झिरोपासून ६ किमी अंतरावर असलेल्या जुन्या झिरोमध्ये स्थित ही एक लहान टेकडी आहे, पण तिचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. कारण निसर्गसौंदर्यासोबतच तिची नाळ भारताच्या इतिहासाशी जोडली गेली आहे. स्वतंत्र भारताचं पहिलं प्रशासकीय केंद्र इथे स्थापन करण्यात आलं. झिरो पुटोला ‘लष्करी पुटो’ (Army Puto) असंदेखील म्हणतात, कारण १९६० च्या दरम्यान इथे लष्करी छावणीची स्थापना करण्यात आली. इतिहासासोबतच इथलं सौंदर्यही अप्रतिम आहे. झिरो पुटोहून अपातानी पठाराचे विहंगम दृश्य दिसते. त्याचबरोबर तुम्हांला ट्रेकिंगची हौस असेल तर टेकडीच्या माथ्यापर्यंत नक्की जा . तिथून संपूर्ण झिरो शहराचे दृश्य दिसते. 
Ziro Valley Image Source
Image Source
२. टॅली व्हॅली वन्यजीव अभयारण्य ( Talley Valley Wildlife Sanctuary ) 
 झिरो व्हॅलीपासून ३० किमी अंतरावर हे अभयारण्य आहे. ३३७ चौरस किमी जागेत पसरलेलं हे अभयारण्य ‘झिरो’ ची शान आहे. इथे मनुष्यवस्ती विरळ असल्याने घनदाट जंगलं व जैवविविधता आढळते. मुख्यतः नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या प्राणी व वनस्पतींच्या प्रजाती इथे आढळतात. त्याचप्रमाणे सिल्व्हर फर, पाईन, ऑर्किड, बांबू आणि अनेक वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती इथे आहेत. इथलं मुख्य आकर्षण म्हणजे इथे आढळणारा ढगाळ बिबट्या (Clouded leopard) व प्लिओब्लास्टस सिमोन (Pleioblastus simone) ही बांबूची वनस्पती, जी फक्त टॅली व्हॅलीमध्येच आढळते. त्यामुळे ही वैशिष्ट्य जवळून पाहण्यासाठी नक्की या अभयारण्याची सैर करा.
टॅली व्हॅली वन्यजीव अभयारण्यातील दृश्य
Image Source
३. मेघना गुंफा मंदिर (Meghna Cave Temple)      जर तुम्हाला पुरातन इतिहासात रुची असेल तर हे गुंफा मंदिर फक्त तुमच्यासाठी आहे , कारण हे मंदिर जवळजवळ ५००० वर्षे जुनं आहे.इथे संस्कृत भाषेतील कोरीवकाम आढळते. त्याचप्रमाणे मंदिराची वास्तुरचना व शिल्पकलाही अप्रतिम आहे. काळाच्या पडद्याआड हे मंदिर लोकांच्या स्मृतीतून निघून गेलं . नंतर पुन्हा १९६२ मध्ये त्याचा शोध लागला . हे मंदिर भगवान शंकराचा २८वा अवतार भगवान लकुलिशाला समर्पित आहे. जगभरातून लोक इथे येतात. मुख्यतः महाशिवरात्रीला इथे मोठ्या उत्सवाचे आयोजन केले जाते .
Meghna Cave Temple Image Source
Image Source
४. कील पाखो ( Kile Pakho ) 
तुम्हाला एकाच  वेळी हिरवाईने नटलेला डोंगर आणि बर्फाने  वेढलेला हिमपर्वत पाहायला आवडेल का?
जर उत्तरं ‘हो’असेल तर ‘कील पाखो’ला यावं लागेल, कारण ही एकमेव अशी जागा आहे जिथून  हे परस्परविरोधी दृश्य दिसतं. एका बाजूला हिरवाईची शाल पांघरलेली झिरो व्हॅली तर दुसऱ्या बाजूला बर्फाची चादर ओढलेला हिमालय! पण इथे येण्याचा एकमेव मार्ग आहे आणि तो म्हणजे ट्रेकिंग . त्यामुळे जर तुम्हाला हे विस्मयकारी दृश्य डोळ्यात साठवायचं असेल तर पूर्ण तयारीनिशीच या बरं का ! जुन्या झिरोपासून कील पाखो ७ किमी अंतरावर आहे.
Image Source
Image Source
५. मिडी ( Midey ) 
गिर्यारोहकांसाठी (Hikers and Trek Lovers) आणखी एक मोक्याचं ठिकाण म्हणजे मिडी! घनदाट बांबूंच्या वनांतून व पाईन वृक्षांच्या मधून वाट काढत निसर्गाचा आस्वाद घेत ट्रेक करण्यात वेगळीच मज्जा! त्यामुळे ट्रेकप्रेमींनीही नक्की या ‘ हॉटस्पॉटचा ‘ विचार करा.
Image Source
Image Source
६. हपोली ( Hapoli ) 
आपल्या सौंदर्याने पर्यटकांना घायाळ करणारे आणखी एक ठिकाण म्हणजे हपोली. सुबनसिरी जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय हपोलीमध्ये आहे. जर तुम्ही हपोलीच्या सौंदर्याच्या प्रेमात असाल तर तुम्ही तिथल्या सर्किट हाऊसमध्ये राहू शकता. ते टेकडीच्या अगदी उंचावर आहे. तिथून संपूर्ण हपोलीचे विहंगम दृश्य दिसते. कोणाला नाही आवडणार अशा घरात राहायला ! इथे वाहतूक व रस्ते मर्यादित आहेत. त्यामुळे ट्रेकिंग हाच एकमेव पर्याय आहे हपोलीला पोहोचण्याचा . इथलं आकर्षण आहे तारीण मत्स्यशेती ( Tarin Fish Farm ) . तिथे स्थानिक प्रजातींच्या माशांची शेती उंचावर काशी केली जाते हे प्रत्यक्ष पाहता येते. इथल्या लोकांच्या शेतीचं हेच मुख्य आकर्षण आहे की भातशेती व मत्स्यशेती ते एकत्रच करतात. याशिवाय ऑर्किडच्या काही दुर्मिळ प्रजाती व सांजी आपू , पप्पी आपू यांसारख्या वैशिष्ट्यपूर्ण फुलांची लागवड इथे केली जाते. त्यामुळे हपोलीला आलात, तर नक्की वेळ काढून हे सगळं बघा
Image Source
७. दोलो मांडो (Dolo Mandi) 
झिरो व्हॅलीच्या पश्चिमेला दापोरिजो रस्त्यावर दोलो मांडो ही लहान टेकडी आहे . ट्रेकप्रेमींसाठी हे एक उत्कृष्ट ठिकाण आहे . इथून हपोली व जुन्या झिरो शहराचे दृश्य दिसते . इथे पोहोचण्यासाठीही ट्रेकिंग हाच एकमेव पर्याय आहे 
Image Source
Image Source
८. पाईन  वृक्षवाटिका (Pine Grove)
पाईन वृक्षांनी वेढलेल्या या उपवनाला म्योलँग (Myolyang) असेही संबोधले जाते . याचे वैशिष्ट्य  म्हणजे आपल्या सौंदर्याने हे उपवन फोटोग्राफर्सना आकर्षित करते . वने डे पिकनिक साठी हा एक मस्त पर्याय आहे . शिवाय जुन्या झिरो शहरापासून केवळ ३ किमी. अंतरावर असल्याने इथे चालत किंवा टॅक्सीने सहज पोहोचता येते. 
Image Source
Image Source
९. डिलोपोलँग मॅनिपोलँग (Dilopolyang Maniipolyang ) 
टॅली व्हॅली अभयारण्याकडे जाताना वाटेत या जुन्या टेकड्यांशी गाठ पडते . त्यांच्यावर 
पसरलेलं हिरवं लुसलुशीत गवत त्यांची शान वाढवतं व पाहणाऱ्याला  प्रसन्न करतं
Image Source
Image Source
१०. बांबू उपवन ( Bamboo Grove ) 
हे काही साधंसुधं उपवन नाही. इथे एका विशिष्ट प्रजातीचे बांबू आढळतात. एकच देठ असलेली बांबूची सरळसोट उंच वाढलेली झाडं इथे आढळतात. त्यांना वन स्टेम मोनोपोडियल बांबू प्लांट ( One stem monopodial bamboo plant ) किंवा जॅपनीज टिम्बर बांबू ( Japanese Timber Bamboo ) या नावांनीही ओळखले जाते. सरळ रेषेत वाढत आकाशाकडे झेपावणाऱ्या या बांबूंच्या उपवनातून चालण्यात एक वेगळीच मजा आहे. त्यासोबतच निळसर पाईन वृक्षांनी आच्छादित उपवन हेसुद्धा तिथलं एक वैशिष्ट्य आहे. मुख्यतः हायकर्स इथे येतात. पर्यटकही असतात पण तुलनेने कमीच ! 
Image Source
Image Source
११. टिपि ऑर्किड संशोधन केंद्र ( Tipi Orchid Research Centre ) 
झिरो व्हॅलीमधील प्रमुख आकर्षणांपैकी एक म्हणजे टिपि ! १० हेक्टर विस्तृत जागेवर पसरलेल्या या संशोधन केंद्रामध्ये ऑर्किडेरियम, टिश्यू कल्चर लॅब, संग्रहालय, गार्डन व केंद्राची मुख्य इमारत आहे. पण मुख्य आकर्षण म्हणजे इथलं ऑर्किड ग्लास हाऊस ! इथे फुलांचे नमुने, मध्यभागी तळे व त्यात कारंजे आणि सोबतच आकर्षक पद्धतीने मांडलेली ऑर्किडची १०००हून अधिक प्रकारची फुले आहेत. जवळजवळ १०,००० ऑर्किडच्या रोपांतून मिळणाऱ्या या विविध प्रकारच्या फुलांचे इथे संवर्धन केले जाते. या संशोधन केंद्राला भेट दिल्यानंतर जवळच असलेल्या कामेंग नदीवर रिव्हर राफ्टिंगची मजा लुटता येते. त्याव्यतिरिक्त सेसा ऑर्किड अभयारण्यालाही (Sessa Orchid Sanctuary ) भेट देत येईल. 
Image Source
Image Source

झिरोविषयी इत्यंभूत माहिती मिळाली. पण जायचं कधी?

पर्यटनासाठी फेब्रुवारी ते ऑक्टोबरचा काळ अनुकूल आहे. परंतु फेब्रुवारी ते एप्रिल जास्त सोईस्कर काळ आहे, कारण तेव्हा आकाश स्वच्छ असते व वातावरणात खूप गारवा नसतो. त्यामुळे सर्व पर्यटनस्थळांची निवांतपणे सैर करता येते. याशिवाय दरवर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान इथे “झिरो म्युझिक फेस्टिव्हलचे” आयोजनही केले जाते. ४ दिवस चालणाऱ्या या सांस्कृतिक कार्यक्रमात तिथल्या स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय संगीताचा मिलाफ साधला जातो. त्याचबरोबर तिथल्या लोकजीवनाची, त्यांच्या परंपरा व खाद्यसंस्कृतीचीही जवळून ओळख होते.
याशिवाय “इको- फ्रेंडली फेस्टिव्हल” म्हणूनही त्याला संबोधले जाते. त्याची माहिती zirofestival.com या त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर होते.

झिरो हे एक असं ठिकाण आहे जिथे आजही आधुनिकता आणि तंत्रज्ञान फार पोहोचलेलं नाही. त्यामुळे मातीचा गंध आणि निसर्गाचा रंग टिकून आहे. जर झिरो पर्यटनासाठी जायचं असेल तर तुम्हा-आम्हालाही झिरो होऊन (लक्झरी लाईफ आणि श्रीमंती थाट काही काळासाठी दूर ठेवून) निसर्गाशी एकरूप व्हावं लागेल. तरच पर्यटनाची खरी मज्जा अनुभवता येईल. 

झिरो व्हॅलीला पोहोचायचं कसं ? 
१. विमान (Air) :
 झिरोपासून आसाममधील जोर्हाट (Jorhat) विमानतळ सगळ्यात जवळ आहे. त्याव्यतिरिक्त लिलबरी (Lilabari) विमानतळही आहे. तसेच गुवाहाटी आंतरराष्ट्रीय विमानतळही आहे, जे परदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी जास्त सोईचे आहे. 
२. ट्रेन (Rail) :
नहारलगुन ( Naharlagun) व नॉर्थ लाखीमपूर (North Lakhimpur) रेल्वेस्थानकं झिरो जवळ आहेत. गुवाहाटीहननियमित इंटरसिटी ट्रेन व नवी दिल्लीहून आठवड्यातून एक ट्रेन नहारलगूनकडे रवाना होते. 
३. रस्ता (Road) : 
गुवाहाटीपासून झिरो व्हॅलीकडे जाणारी रात्रीची बस आहे. अरुणाचल प्रदेशच्या राज्य वाहतूक महामंडळाकडून आठवड्याचे चार दिवस ही बससेवा उपलब्ध असते. याव्यतिरिक्त नॉर्थ लाखीमपूर किंवा इटानगरहून झिरो व्हॅलीला पोहोचण्यासाठी शेअर टॅक्सीचा पर्यायही उपलब्ध आहे. 
Our Work
Content 91%

नमस्कार मंडळी, मी पूजा.... पूजा नरेश जाधव. आपल्या ट्रॅव्हल विथ ड्रीम्स या ब्लॉगच्या माध्यमातून नवनवीन पर्यटनस्थळांची माहिती तुमच्यासमोर आणतेय. गेल्याच वर्षी तोलानी वाणिज्य महाविद्यालयातून B. Com चं शिक्षण पूर्ण केलं. सध्या स्पर्धा परीक्षांची तयारी करतेय. त्यातून वेळ मिळाला की सरळ मोर्चा वळतो तो आपलं सगळ्यात आवडतं काम करायला ! हेच आपल्या ब्लॉगसाठी नवीन पोस्ट बनवण्याकडे.... यासोबत मला नवनवीन पदार्थ बनवायला आणि खायलाही खूप आवडतात. माझा दुसरा आवडता छंद म्हणजे झाडं लावणे आणि त्यांना न्याहाळत बसणे. अधूनमधून पुस्तकंही वाचते. त्यामध्ये परीकथा, साहसकथा आणि प्रवासवर्णनं वाचण्याकडे माझा जास्त कल असतो. या सगळ्यासोबत कॉलेजमध्ये असताना ज्यूडोचं प्रशिक्षणही घेतलं. नंतर पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना महाराष्ट्र टाइम्ससोबत "कॉलेज क्लब रिपोर्टर" म्हणूनही कामाचा अनुभव घेतला. या सगळ्या उद्योगांव्यतिरिक्त मला मनसोक्त भटकंती करायला आणि त्या त्या ठिकाणचे पारंपारिक पदार्थ चाखायलाही खूप आवडतं. तिथली संस्कृती अनुभवणं, लोकांच्या लहानसहान गोष्टींचं निरीक्षण करणं यात वेगळीच मजा येते. तशी स्वप्नं बरीच आहेत, पण त्यातलं एक म्हणजे आपला हा ब्लॉग यशस्वी करायचा. तुम्ही सगळे या प्रवासात आमच्यासोबत आहात, त्यामुळे काळजीचं काही कारणच नाही. ...... खूप बोलले ना. आता थोडं थांबते. तसे आपण भेटत राहूच नवीन पोस्टसोबत. तुम्हांला पोस्ट आवडली का हे जरूर कळवा हं. वाट बघतेय तुमच्या प्रतिक्रियेची.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enjoy this blog? Please spread the word :)

RSS
EMAIL
Facebook
Facebook
Google+
Google+
http://travelwithdreams.com/ziro-natures-hawk
Instagram