Spread the love

आपल्या सौंदर्याची मोहिनी टाकत दरवर्षी अधिकाधिक पर्यटकांचा ओढा खेचून आणणारा धबधबा म्हणजे खोपोलोतील ‘झेनिथ धबधबा’. रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध धबधबा अशी त्याची ख्याती आहे . जवळजवळ ८० ते ९० फुटांवरून कोसळणारा हा धबधबा मुंबई व पुणे दोन्ही शहरांपासून जवळ आहे. झेनिथ धबधबा मोठा व वक्राकार आहे. इथे ट्रेकिंग, रॅपलिंगसाठी उत्तम संधी असल्यामुळे अनेक साहसप्रेमी पावसाळ्यात त्याचा आनंद लुटण्यासाठी येतात. मुख्य धबधब्यापासून काही अंतरावर आणखी लहान – मोठे धबधबेही आहेत. त्यामुळे एकांताच्या शोधात असणाऱ्यांनी ती वाट धरायला हरकत नाही. तसेच इथे जवळच दत्ताचे मंदिरदेखील आहे.

झेनिथ धबधब्याजवळील इतर लहानमोठे धबधबे

झेनिथ धबधब्याकडे जाणारा रस्ताही तसा चढ-उतारांचा आहे, पण गटाने जाताना मज्जा येईल. तिथे पोहोचण्याआधी तुम्हांला भातशेतातून व पाण्याच्या लहानमोठ्या झऱ्यांतून जावे लागेल. वाटेत दोन झरे लागतात व त्यांचे पाणी जवळजवळ गुडघ्यापर्यंत असते. रस्त्यात चिखल असल्यामुळे वाट घसरणीची होते. त्यामुळे फ्लोटर घातले तर व्यवस्थित चालता येईल.
धबधब्याकडे जाताना वाटेत लागणारा झरा(water stream)

हा ट्रेक पाऊण ते एक तासाच आहे. इथे तुम्हांला खाण्यासाठी मका, वडापाव व चहाचा पर्याय उपलब्ध आहे. खोपोली भागात ‘ रमाकांत वडापाव ‘ प्रसिद्ध आहे . त्यामुळे जवळच असाल तर नक्की खाऊन बघा.
लक्षात ठेवा:
१. काही लोक पार्किंगसाठी पैशाची मागणी करतात, पण तिथे कोठेही खाजगी कार पार्किंगची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे अशा फसव्या लोकांपासून सावध रहा.
२. धबधब्याच्या पृष्ठभागावर मोठाले दगड आहेत व पाण्याची खोलीही जास्त आहे . तसेच दगड निसरडे असून त्यांच्या कडा तीक्ष्ण आहेत. त्यामुळे सावधानता बाळगा.
३. तेथील स्थानिक लोकांसाठी हा धबधबा पिण्याच्या पाण्याचा स्रोत आहे. त्यामुळे तिथेच कचरा टाकू नका. कृपया एक जबाबदार पर्यटक बना.

जायचे कसे ?
१. खाजगी वाहनाने थेट धबधब्याच्या पायथ्याशी ( base of water ) जाता येते.
२. ट्रेन ने जाणार असाल तर मध्य रेल्वे मार्गावरील खोपोली स्थानक जवळचे आहे. येथून धबधब्याकडे जाण्यासाठी रिक्षा व टमटमचा पर्याय उपलब्ध आहे. रिक्षा धबधब्यापासून २०० ते ३०० मीटर अंतरावर थांबतात. तिथून पायी जावे लागते.
३. जर खोपोली स्थानकापासून धबधब्यापर्यंत पायी जाणार असाल तर स्थानकाच्या पश्चिमेला जाऊन ब्रिजवरून चालत रहा. तिथून पुढे एक इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स पार करून पुढे गेल्यावर धबधब्याचा रस्ता लागेल. पुढे दोन झऱ्यांतून वाट काढत निसर्गाच्या हिरवाईचा आनंद घेत चालत गेल्यावर तुम्ही झेनिथ धबधब्यावर पोहोचता.

धबधब्याजवळील दाट झाडी

धबधब्यानजीकची टेकडी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *