BLOG,  Social Corner

बटाटा,अंड की कॉफी बिन्स..?

प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार हे येतच असतात. आपण त्या घटनेकडे कसे पाहतो यावर पुढच्या गोष्टी ठरतात. अनेकदा संकटं आली की आपण हतबल होतो आणि सरळ देवावर सगळं लादून मोकळे होतो. त्यातूनही काही नाही झालं की नशिबाला दोष देत आयुष्यभर रडत बसतो. अशीच एक रडुबाई होती नयना. मितभाषी, शातं पण लहानसहान गोष्टींचा अतिविचार करणारी. एकेदिवशी कामावरून घरी आली तीच मुसमुसत आईच्या कुशीत शिरली. आईने विचारलं, “नयना,काय झालं ? आल्याआल्याच रडायला लागलीस.” नयना वैतागलेल्या स्वरात आईला म्हणाली, “मी कुणाचं काय वाईट केलंय की माझ्यामागे संकटांचा ससेमिरा लागलायं. एक संपलं की दुसरं समोर असतंच. आई मी थकलेय आता या आयुष्यालाच कंटाळलेय. नको वाटतं आता सगळं”. आईने तिला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, “नयना,आज काय झालं हे मला माहीत नाही पण मला आज किचनमध्ये आपल्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळाली. जर तुझी इच्छा असेल तर तुलाही सांगते. येशील माझ्यासोबत आत?” नयनाला आईच्या बोलण्याचं कुतूहल वाटलं. ती थोडी सावरली. डोळे पुसले व मानेनेच आईला होकार दिला.

आई तिला स्वयंपाकघरात घेऊन गेली. नयना आईच्या शेजारी उभी होती. आईने तीन पातेली काढली. तिघांमध्ये प्रत्येकी ग्लासभर पाणी घेतलं व ते गॅसवर उकळवत ठेवलं. नयना सगळं कुतूहलाने पाहत होती. दहा मिनिटांनी पाणी चांगलं उकळलं. नंतर आईने पहिल्या पातेल्यात दोन लहान बटाटे ठेवले व झाकण लावलं. दुसऱ्यात दोन कच्ची अंडी ठेवली तर तिसऱ्या पातेल्यात कॉफीच्या बिया टाकल्या व झाकण ठेवून दिलं. नयना आईला काही विचारणार तोच आईने तिला हाताने शांत राहण्याचा इशारा केला. पुन्हा शांततेत पुढची दहा मिनिटं गेली..नंतर आईने गॅस बंद केला व नयनाला विचारलं, “काय पाहिलंस ?” नयना म्हणाली बटाटे, अंडी आणि कॉफी  बिन्स”. “नयना ती झाकणं उघड. तीनही पदार्थांच निरीक्षण कर.”

नयनाने झाकणं उघडली चिमटयाने बटाटा बाहेर काढला व हलकाच काटा चमचा त्यात घुसवला. नंतर एक अंड घेतलं आणि ते सोललं. कॉफीचा सुगंध तर क्षणभर ती घेतच राहिली. नंतर आईला म्हणाली, “हे बघ बटाटे मऊ  झाले ,म्हणजेच शिजले. अंडंही शिजलंय आणि कॉफीचा तर मस्त सुगंध दरवळतोय.”

“अगदी बरोबर हे बटाटे बघ.आधी कडक होते आणि उकळल्यावर मऊ झाले. बिच्चारे ! परिस्थितीसमोर हात टेकले. आता ही अंडी बघ आधी द्रवपदार्थ होता,पण उकळी तशी टणक झाली. यांना परिस्थितीने कठोर बनवलं.” 

“अंडी आणि बटाट्याचं ठीक आहे आई , पण या कॉफीच्या बियांचं काय ? त्या ना मऊ झाल्या ना टणक.” “यांच उत्तर तूच तर दिलंस नयना!” 

करा तुम्हीही विचार…………………..

 “काय?” 

“कॉफीच्या बिया ना नरम झाल्या ना टणक, पण त्यांनी आपला सुगंध मात्र त्या पाण्यात सोडला आणि त्यातून एक नवीन पदार्थ बनला. कॉफी! त्या बियांनी परिस्थितीचा सामना केलाच पण असा की त्यांनी आपली छाप मागे सोडली.परिस्थिती समजून घेतली आणि मार्ग काढला.”

शेवटी आईने विचारलं,”नयना आता मला सांग की तुला कोण व्हायला आवडेल – बटाटा,अंड की कॉफीची बी?” 

नयना आनंदाने म्हणाली,  “कॉफीची बी” आणि आईला जाऊन बिलगली.

मंडळी, नयनाने तर ठरवलं की तिला कोण व्हायला आवडेल. तुम्ही ठरवलंत का..? मग  आम्हांलाही सांगा अभिप्राय कळवून.!!

नमस्कार मंडळी, मी पूजा.... पूजा नरेश जाधव. आपल्या ट्रॅव्हल विथ ड्रीम्स या ब्लॉगच्या माध्यमातून नवनवीन पर्यटनस्थळांची माहिती तुमच्यासमोर आणतेय. गेल्याच वर्षी तोलानी वाणिज्य महाविद्यालयातून B. Com चं शिक्षण पूर्ण केलं. सध्या स्पर्धा परीक्षांची तयारी करतेय. त्यातून वेळ मिळाला की सरळ मोर्चा वळतो तो आपलं सगळ्यात आवडतं काम करायला ! हेच आपल्या ब्लॉगसाठी नवीन पोस्ट बनवण्याकडे.... यासोबत मला नवनवीन पदार्थ बनवायला आणि खायलाही खूप आवडतात. माझा दुसरा आवडता छंद म्हणजे झाडं लावणे आणि त्यांना न्याहाळत बसणे. अधूनमधून पुस्तकंही वाचते. त्यामध्ये परीकथा, साहसकथा आणि प्रवासवर्णनं वाचण्याकडे माझा जास्त कल असतो. या सगळ्यासोबत कॉलेजमध्ये असताना ज्यूडोचं प्रशिक्षणही घेतलं. नंतर पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना महाराष्ट्र टाइम्ससोबत "कॉलेज क्लब रिपोर्टर" म्हणूनही कामाचा अनुभव घेतला. या सगळ्या उद्योगांव्यतिरिक्त मला मनसोक्त भटकंती करायला आणि त्या त्या ठिकाणचे पारंपारिक पदार्थ चाखायलाही खूप आवडतं. तिथली संस्कृती अनुभवणं, लोकांच्या लहानसहान गोष्टींचं निरीक्षण करणं यात वेगळीच मजा येते. तशी स्वप्नं बरीच आहेत, पण त्यातलं एक म्हणजे आपला हा ब्लॉग यशस्वी करायचा. तुम्ही सगळे या प्रवासात आमच्यासोबत आहात, त्यामुळे काळजीचं काही कारणच नाही. ...... खूप बोलले ना. आता थोडं थांबते. तसे आपण भेटत राहूच नवीन पोस्टसोबत. तुम्हांला पोस्ट आवडली का हे जरूर कळवा हं. वाट बघतेय तुमच्या प्रतिक्रियेची.

4 Comments

  • Neha

    तुम्ही खूप छान लिहिता…. मी तुमच्या पोस्ट रोज वाचते 😊.. रोज काहीतरी नवीन शिकायला मिळतं..💛 Keep it up Pooja✌️😊

    • POOJA JADHAV

      धन्यवाद नेहा.😊 तुम्हां सगळ्यांचे हे अभिप्रायच आम्हांला चांगलं काम करण्याची प्रेरणा देतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enjoy this blog? Please spread the word :)

RSS
EMAIL
Facebook
Facebook
Google+
Google+
http://travelwithdreams.com/who-are-u-potato-egg-or-coffee-bean
Instagram