Tunnel of Love
More to Explore,  शोध अज्ञाताचा.....

विविधरंगी प्रेमाचा बोगदा (Tunnel of Love)

 

प्रेमाचं प्रतीक काहीही असू शकतं. अगदी गुलाबाच्या फुलापासून डेरीमिल्कच्या चॉकलेटपर्यंत काहीही ! इथे साधन महत्त्वाचं नसतं तर भावना महत्त्वाच्या असतात. त्या जोडीदाराला आपल्याशी घट्ट बांधून ठेवतात आणि नात्याची वीण मजबूत करतात. म्हणूनच तर शहाजहानने बांधलेला ‘ताजमहाल’ प्रेमाचं प्रतीक म्हणून नावारूपाला आला. बेगम मुमताजच्या मृत्यूनंतरही या ‘ताजमहाल’ने त्या दोघांना आठवणींच्या रुपात कायम एकत्र ठेवलं. असंच नावारूपाला आलेलं एक प्रेमाचं अनोखं प्रतीक म्हणजे युक्रेनमधला प्रेमाचा बोगदा (Tunnel of Love) .

साधारणतः बोगदा म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो काळोखातला रस्ता आणि त्यावरून सुसाट जाणाऱ्या गाड्या किंवा ट्रेन. मग असा हा बोगदा प्रेमाचं प्रतीक कसा होऊ शकतो ? खरं तर प्रेमाचा हा बोगदा थोडा वेगळा आहे. त्याच्या अगदी मधोमध रेल्वेची पटरी आहे आणि तो वेली व झाडांनी अशा प्रकारे झाकलाय की वर नैसर्गिक छतच तयार झालंय. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या बोगद्याचे दोन भाग आहेत. त्यानुसार बोगद्याच्या एक टोकाशी प्लायवूडचा कारखाना आहे, जिथे दिवसातून तीन वेळा मालवाहतूक करण्यासाठी रेल्वे येते. तर दुसरा रस्ता कुठे जातो कोणालाच माहीत नाही. त्यात रेल्वेच्या ठरलेल्या वेळापत्रकामुळे मोकळ्या वेळात इथे प्रेमीयुगुलं व हौशी पर्यटकांची रेलचेल असते.

tunnel of love during summer
उन्हाळ्यात Tunnel of Love असा दिसतो.

युक्रेनच्या पश्चिमेला वसलेल्या क्लेवन (Klevan) शहरापासून ७ किलोमीटर अंतरावर हा बोगदा आहे. तो जवळजवळ ३ किलोमीटर लांब आहे. असं म्हणतात अमेरिका व सोव्हिएत महासंघात झालेल्या शीतयुद्धाच्या वेळी इथे एक लष्करी छावणी होती. त्यावेळी सैन्यदलाच्या तुकड्यांना सुरक्षित जागी लपवण्यासाठी या पटरीजवळ झाडं लावली गेली. त्यामुळे ट्रेनमधल्या प्रवाशांना झाडांशिवाय काही दिसणार नाही अशी व्यवस्था झाली. त्यावेळी लावलेली झाडं छान मोठी होत गेली आणि नंतर हा बोगदा निसर्गाच्या हिरवाईने नटला. खरं तर २००९ सालापर्यंत फक्त स्थानिकांनाच या बोगद्याविषयी माहीत होतं, पण एका फोटोग्राफरने एका नवविवाहित जोडप्याचे या ठिकाणी वेगवेगळे फोटोज काढले. जसे सोशल मीडियावर हे फोटोज व्हायरल झाले तसा हो बोगदा जगभरात प्रसिद्ध झाला तो Tunnel of Love म्हणजेच प्रेमाचा बोगदा या नावानेच ! आता प्रेमीयुगुलांत एक असा समज निर्माण झाला आहे की इथल्या झाडांवर रिबीन बांधल्याने दोघांतलं प्रेम चिरकाळ टिकतं व त्यांच्या इच्छा पूर्ण होतात. त्यामुळेच जगभरातून अनेक प्रेमीयुगुलं या प्रेमाच्या बोगद्याला पाहण्यासाठी युक्रेनमध्ये येतात. एवढंच नाही, तर चीन- जपानमधल्या फिल्म इंडस्ट्रीलाही या बोगद्याने भुरळ घातलीय. अनेक सिनेमांचं चित्रीकरण इथे होतं. या बोगद्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचे ऋतूनुसार बदलणारे स्वरूप. उन्हाळ्यात हा बोगदा हलक्या पिवळसर रंगात परिवर्तित होतो, तर वर्षाऋतूत हिरवाईने नटतो अन् थंडीची चाहूल लागली की अंगावर बर्फाची चादर ओढतो. आता तुम्ही ठरवा तुम्हांला कधी इथे तुमचं रोमँटिक फोटोशूट करून घ्यायला आवडेल !

 

tunnel of love covered with snow
Image Source

नमस्कार मंडळी, मी पूजा.... पूजा नरेश जाधव. आपल्या ट्रॅव्हल विथ ड्रीम्स या ब्लॉगच्या माध्यमातून नवनवीन पर्यटनस्थळांची माहिती तुमच्यासमोर आणतेय. गेल्याच वर्षी तोलानी वाणिज्य महाविद्यालयातून B. Com चं शिक्षण पूर्ण केलं. सध्या स्पर्धा परीक्षांची तयारी करतेय. त्यातून वेळ मिळाला की सरळ मोर्चा वळतो तो आपलं सगळ्यात आवडतं काम करायला ! हेच आपल्या ब्लॉगसाठी नवीन पोस्ट बनवण्याकडे.... यासोबत मला नवनवीन पदार्थ बनवायला आणि खायलाही खूप आवडतात. माझा दुसरा आवडता छंद म्हणजे झाडं लावणे आणि त्यांना न्याहाळत बसणे. अधूनमधून पुस्तकंही वाचते. त्यामध्ये परीकथा, साहसकथा आणि प्रवासवर्णनं वाचण्याकडे माझा जास्त कल असतो. या सगळ्यासोबत कॉलेजमध्ये असताना ज्यूडोचं प्रशिक्षणही घेतलं. नंतर पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना महाराष्ट्र टाइम्ससोबत "कॉलेज क्लब रिपोर्टर" म्हणूनही कामाचा अनुभव घेतला. या सगळ्या उद्योगांव्यतिरिक्त मला मनसोक्त भटकंती करायला आणि त्या त्या ठिकाणचे पारंपारिक पदार्थ चाखायलाही खूप आवडतं. तिथली संस्कृती अनुभवणं, लोकांच्या लहानसहान गोष्टींचं निरीक्षण करणं यात वेगळीच मजा येते. तशी स्वप्नं बरीच आहेत, पण त्यातलं एक म्हणजे आपला हा ब्लॉग यशस्वी करायचा. तुम्ही सगळे या प्रवासात आमच्यासोबत आहात, त्यामुळे काळजीचं काही कारणच नाही. ...... खूप बोलले ना. आता थोडं थांबते. तसे आपण भेटत राहूच नवीन पोस्टसोबत. तुम्हांला पोस्ट आवडली का हे जरूर कळवा हं. वाट बघतेय तुमच्या प्रतिक्रियेची.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enjoy this blog? Please spread the word :)

RSS
EMAIL
Facebook
Facebook
Google+
Google+
http://travelwithdreams.com/tunnel-of-love
Instagram