BLOG,  India,  More to Explore

त्रियुगीनारायण : जिथे शिवपार्वती विवाहबंधनात अडकले!

असं म्हणतात, ‘लग्नगाठ स्वर्गात बांधली जाते, कारण ती पवित्र असते’. म्हणूनच तर विवाहसोहळ्याला खूप महत्त्व आहे, कारण आपण भावनिकदृष्टया त्याच्याशी जोडलेले असतो. त्यामुळे विवाह कुठे करायचा याचाही अगदी कल्पकतेने विचार केला जातो. त्यातूनच उदयाला आलेली कल्पना – डेस्टिनेशन वेडिंग ! अगदी राजसी थाटातील राजमहालांपासून दऱ्याखोऱ्यांतील पर्वतांवर लग्न केली जातात. असंच लग्नासाठी एक हटके डेस्टिनेशन म्हणजे उत्तराखंडमधील त्रियुगीनारायण मंदिर ! ते मंदिर जिथे भगवान शंकर व माता पार्वती यांचा विवाहसोहळा पार पडला. 

त्रियुगीनारायण मंदिर

हा विवाहसोहळा आपल्याला थेट शिवपार्वतीच्या काळात घेऊन जातो. माता पार्वती ही शिवभक्त होती. तिने भगवान शंकराला मिळवण्यासाठी ‘गौरीकुंड’ येथे अखंड तपस्या केली. भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी गुप्तकाशीमध्ये माता पार्वतीला लग्नाची मागणी घातली. त्यानंतर त्रियुगीनारायण येथे त्यांचा विवाहसोहळा संपन्न झाला. पुराणानुसार त्रियुगीनारायण ही माता पार्वतीच्या वडिलांच्या ‘हिमावत’ राज्याची राजधानी होती.  सर्व देव-देवता व ऋषीमुनींच्या साक्षीने झालेल्या या विवाहसोहळ्यात भगवान विष्णूंनी पार्वतीमातेच्या बंधूची भूमिका स्वीकारली व भावाची सर्व कर्तव्यं पार पाडली, तर खुद्द ब्रम्हदेव पुरोहित बनले.

विवाहापूर्वी सर्व देवतांनी इथे स्नानही केले होते. त्यामुळे इथे तीन कुंड तयार झाले आहेत. त्यांना रूद्र कुंड, विष्णू कुंड व ब्रह्मकुंड म्हणतात. या तिन्ही कुंडांमध्ये सरस्वतीकुंडातून पाणी येते. सरस्वती कुंडाची निर्मिती भगवान विष्णूंच्या नासिकेतून झाली आहे म्हणूनच, असं म्हणतात की इथे स्नान केल्यामुळे संतानहीनतेपासून मुक्ती मिळते. 

सरस्वती कुंड

याशिवाय मंदिराच्या आवरात जिथे हा विवाहसोहळा संपन्न झाला तिथे एक शिळा आहे.तिला ब्रह्मशिळा असंदेखील म्हणतात. त्रियुगीनारायण मंदिराचं आणखी एक मुख्य वैशिष्ट्य व आकर्षण म्हणजे इथे तीन युगांपासून प्रज्वलित असणारा अखंड धुनी.शिवपार्वतीच्या विवाहावेळी हा धुनी प्रज्वलित करण्यात आला. अगदी तेव्हापासून तो विझलेला नाही. त्यामुळे या मंदिरात ज्यांचा विवाह होतो, ते कधीही एकमेकांपासून दूर  होत नाहीत अशी भाविकांची श्रद्धा आहे. म्हणूनच की काय, या मंदिरात येणारे अनेक भाविक या धुनीतली मूठभर राख आपल्यासोबत घेऊन येतात, जेणेकरून त्यांचं वैवाहिक जीवन शिवपार्वतीच्या आशीर्वादाने सुखकर व मंगलमय होईल. 

मंदिरातील अखंड धुनी

वेदांमधील उल्लेखानुसार हे त्रियुगीनारायण मंदिर आदि शंकराचार्यांनी त्रेतायुगात बांधले, तर केदारनाथ व बद्रीनाथ मंदिरांची स्थापना द्व़ापारयुगात केली. असंही म्हणतात, की याच ठिकाणी भगवान विष्णूंनी वामन रूप धारण केलं. पौराणिक कथेनुसार इंद्रासन प्राप्त करण्यासाठी बळीराजाला १०० यज्ञ करावयाचे होते. त्यापैकी ९९ यज्ञ त्याने पूर्ण केले होते. ‘आता इंद्रासनाची रक्षा करायची तर शेवटचा यज्ञ थांबवला पाहिजे’, या हेतूने श्री विष्णूंनी वामनावतार घेतला व बळीराजाचा यज्ञ भंग केला. म्हणून इथे भगवान विष्णू वामनरूपात पुजले जातात. मंदिरात भगवान श्रीविष्णूंची २ फूट उंच चांदीची मूर्ती आहे. सोबतच माता लक्ष्मी व माता सरस्वतीचीही मूर्ती आहे.


पुराणापासून महत्त्वपूर्ण असलेल्या या मंदिरात अनेक VIP लग्नही झाली आहेत. टीव्ही अभिनेत्री कविता कौशिक, आयपीएस अपर्णा गौतम, आयएएस ललित मोहन यांनीहीआपली लग्नगाठ त्रियुगीनारायण मंदिरातच बांधली. तुम्हालाही गढवाल हिमालयाच्या कुशीत रूद्रप्रयाग जिल्ह्यात वसलेल्या या मंदिरात डेस्टिनेशन वेडिंग करायला आवडेल का?   

त्रियुगीनारायण मंदिरातील अभिनेत्री कविता कौशिकचा विवाहसोहळा

त्रियुगीनारायणला जायचे कसे?

डेहराडून विमानतळ इथून २६० किमीवर आहे. तिथून रूद्रप्रयाग जिल्ह्यात यायचे. रूद्रप्रयागहून हे मंदिर ८१ किमी दूर आहे व तिथून  त्रियुगीनारायणला येण्यासाठी सहज टॅक्सी उपलब्ध होते. तसेच सर्व मुख्य रस्त्यांनी हे मंदिर जोडलेले आहे. 


नमस्कार मंडळी, मी पूजा.... पूजा नरेश जाधव. आपल्या ट्रॅव्हल विथ ड्रीम्स या ब्लॉगच्या माध्यमातून नवनवीन पर्यटनस्थळांची माहिती तुमच्यासमोर आणतेय. गेल्याच वर्षी तोलानी वाणिज्य महाविद्यालयातून B. Com चं शिक्षण पूर्ण केलं. सध्या स्पर्धा परीक्षांची तयारी करतेय. त्यातून वेळ मिळाला की सरळ मोर्चा वळतो तो आपलं सगळ्यात आवडतं काम करायला ! हेच आपल्या ब्लॉगसाठी नवीन पोस्ट बनवण्याकडे.... यासोबत मला नवनवीन पदार्थ बनवायला आणि खायलाही खूप आवडतात. माझा दुसरा आवडता छंद म्हणजे झाडं लावणे आणि त्यांना न्याहाळत बसणे. अधूनमधून पुस्तकंही वाचते. त्यामध्ये परीकथा, साहसकथा आणि प्रवासवर्णनं वाचण्याकडे माझा जास्त कल असतो. या सगळ्यासोबत कॉलेजमध्ये असताना ज्यूडोचं प्रशिक्षणही घेतलं. नंतर पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना महाराष्ट्र टाइम्ससोबत "कॉलेज क्लब रिपोर्टर" म्हणूनही कामाचा अनुभव घेतला. या सगळ्या उद्योगांव्यतिरिक्त मला मनसोक्त भटकंती करायला आणि त्या त्या ठिकाणचे पारंपारिक पदार्थ चाखायलाही खूप आवडतं. तिथली संस्कृती अनुभवणं, लोकांच्या लहानसहान गोष्टींचं निरीक्षण करणं यात वेगळीच मजा येते. तशी स्वप्नं बरीच आहेत, पण त्यातलं एक म्हणजे आपला हा ब्लॉग यशस्वी करायचा. तुम्ही सगळे या प्रवासात आमच्यासोबत आहात, त्यामुळे काळजीचं काही कारणच नाही. ...... खूप बोलले ना. आता थोडं थांबते. तसे आपण भेटत राहूच नवीन पोस्टसोबत. तुम्हांला पोस्ट आवडली का हे जरूर कळवा हं. वाट बघतेय तुमच्या प्रतिक्रियेची.

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enjoy this blog? Please spread the word :)

RSS
EMAIL
Facebook
Facebook
Google+
Google+
http://travelwithdreams.com/triyuginarayan-temple-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3
Instagram