Social Corner

तुम्ही कोण आहात …. सामान्य की असामान्य ?

नमस्कार मंडळी ! आज तुमच्या भेटीला आलेय पण कोणताही निसर्गाचा चमत्कार किंवा पर्यटनासंबंधीचा लेख न घेता ! म्हटलं, दररोज आपण पर्यटनाविषयी बोलतो. आज स्वप्नांवर बोलू काही ! आपल्या ब्लॉगच्या नावातही आहेच की स्वप्न (Dream). खरचं, या शब्दातच फँटसी आहे . नाव उच्चारताच वाचणारा प्रत्येकजण ‘ माझं स्वप्न काय?’ हा विचार करू लागला. तशी ही स्वप्न व्यक्ती, प्रसंग व परिस्थितीनुरूप प्रत्येकासाठी वेगवेगळी असतात. बऱ्याचदा स्वप्न पूर्ण झालं म्हणून एखादा आनंदाने हरखून जातो, तर स्वप्न हे स्वप्नच राहिलं म्हणून एखादा नशिबाला दोष देत बसतो. पण या दोन्ही परिस्थितींमधल्या संधीचं गमक जो ओळखतो तोच खरा विजेता ठरतो. असाच एक विजेता म्हणजे कॅरोली टाकाक्स (Karoly Takacs). आज आपण त्याची जीवनकथा पाहूया.

 बुडापेस्टमधल्या एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेला हा मुलगा. त्याने तेव्हा जेमतेम शिक्षण घेतलं व वयात आल्यानंतर हंगेरियन लष्करामध्ये भरती झाला. लष्करी प्रशिक्षण घेताना तो शूटिंगमध्ये तरबेज झाला. इतका की १९३६ च्या काळात तो जागतिक दर्जाचा अव्वल शूटर होता !त्यामुळे साहजिकच त्यालाही ऑलिम्पिकमध्ये आपली कला दाखवाविशी वाटली. खरं तर त्याने हे स्वप्न पाहिलं ! पण…. सरकारी नियमांनुसार ऑलिम्पिकमध्ये उच्चपदस्थ लष्करी अधिकारीच सहभागी होऊ शकत होते आणि कॅरोली तर फक्त लष्करी जवान होता.त्यामुळे १९३६ च्या ऑलिम्पकचे दरवाजे त्याच्यासाठी बंद झाले. स्वप्नभंग झाला ! पण कॅरोली इतरांसारखा नशिबाला दोष देत बसला नाही. त्याने आपला सराव सुरूच ठेवला.

 योगायोगाने ऑलिम्पिकमधून ही पदानुसार पात्रता ठरवण्याची अट रद्द झाली. कॅरोलीने दुप्पट जोमाने तयारी सुरू केली. पण, नशिबाने इथेही त्याची परीक्षा घ्यायचं ठरवलं. १९३८ साल सुरू होतं. कॅरोली लष्करात आपलं कर्तव्य बजावत होता. त्यावेळी तिथे ग्रेनेड हल्ला झाला आणि त्यात त्याने उजवा हात गमावला. तो हात ज्यामुळे कॅरोली जागतिक दर्जाचा शूटर झाला ! तो हात ज्याने त्याला ऑलिम्पिकचं स्वप्न दाखवलं ! आता काय ?  सगळंच संपलं. ऑलिम्पिक नाहीच पण, लष्करामध्येही आता आपल्याला जागा नाही. सारखा हाच विचार तो करत होता. डोळ्यापुढे फक्त अंधार आणि ग्रेनेड हल्ल्यात जळून बेचिराख झालेलं स्वप्न एवढंच होतं. दीड-दोन महिने तो नैराश्याच्या गर्तेत होता. पण नंतर त्याने विचार केला, असंही आता गमवण्यासारखं आपल्याकडे काहीच नाही. मग जो उरलेला एक हात आहे, त्याने नशीब आजमवूया. Let’s hit back to the DESTINY. 

परिस्थितीने त्याला झुकवण्याचा प्रयत्न केला, पण तो झुकला नाही. कारण एकच ! त्याच्याकडे असलेल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर स्वप्नाचा पाठलाग करण्याची तयारी ! कॅरोलीने गुप्तपणे डाव्या हाताने शूटिंगचा सर्व सुरू केला. सुरुवातीला त्रास झाला. सगळं सोडून द्यावंसं वाटलं, पण त्याने हार मानली नाही. तो सर्व करत राहिला. १९३९  साल उजाडलं. हंगेरीमध्ये राष्ट्रीय स्तरावर शूटिंग स्पर्धेचं आयोजन केलं होतं. कॅरोली तिथे गेला तेव्हा सगळ्यांना वाटलं, हा स्पर्धकांचं मनोबल वाढवण्यासाठी आला आहे. प्रत्येकाने त्याला अभिवादन केलं. विचारपूस केली. सांत्वन केलं. कॅरोलीने शांतपणे सगळं ऐकून घेतलं. पण, जेव्हा तो इतर स्पर्धकांसोबत मैदानात उतरला, तेव्हा सगळ्यांचे डोळे विस्फारले. सगळेच गोंधळलेल्या नजरेने त्याचा नेम बघण्यासाठी उत्सुक झाले. तो गेला. त्याने नेम धरला. अचूक निशाणा साधला. अखेर तो जिंकला. सुवर्णपदक मिळवत त्याने १९४० मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकचं तिकीट मिळवलं. स्वप्नाच्या दिशेने टाकलेलं हे पहिलं यशस्वी पाऊल ! 
    

आता कॅरोली तहानभूक विसरून तयारीला लागला, पण नशिबाचे भोग काही संपले नव्हते. याच काळात दुसऱ्या महायुद्धाने रणशिंग फुंकलं अन् त्यावर्षीचं ऑलिम्पिक रद्द झालं. कॅरोलीला वाईट तर वाटलंच, पण आता त्याला या अशा धक्क्यांची सवय झाली होती. त्याने मनाशीच म्हटलं, आणखी ४ वर्ष मिळाली सरावाला ! पुन्हा तयारी सुरू केली, पण १९४४ साल आलं तरी महायुद्ध संपण्याची काही चिन्ह नव्हती. त्यामुळे त्या साली होणारं ऑलिम्पिकही रद्द झालं. काय धैर्य असेल त्याच्याकडे ! एवढं होऊनही कॅरोलीने स्वप्नाचा त्याग केला नाही की स्वतःला ऑलिम्पिकच्या मैदानावर पाहणं सोडलं नाही. कारण तो कोणी सामान्य माणूस नव्हता. तो होता कॅरोली ! स्वप्नांचा पछाडल्यासारखा पाठलाग करणारा हंगेरीचा कोहिनूर ! 

  १९४८ साल उजाडलं. ऑलिम्पिकची तयारी सुरू झाली. लंडनमध्ये क्रीडाविश्वात नावाजलेली मंडळी जमली. स्पर्धांना सुरुवात झाली. कॅरोलीच्या आनंदाला पारावार नव्हता, पण अजूनही त्याने १००वी पायरी गाठली नव्हती. तो जिथे शूटींग स्पर्धा होणार होत्या, तिथे येऊन बसला. त्यावेळी कॅर्लोस एनरीक त्याला भेटायला आला. हा कॅर्लोस म्हणजे अर्जेंटिनाचा प्रख्यात शूटर आणि सुवर्णपदकाचा मुख्य दावेदार ! तो कॅरोलीला म्हणाला, “अपघातानंतर तू आता काय करतोयस ?” तेव्हा कॅरोली शांतपणे म्हणाला, ” मी इथे विश्वविक्रम कसा करायचा हे शिकायला आलोय.” त्यानंतर स्पर्धा सुरू झाल्या. प्रत्येक शूटर त्याच्या ‘बेस्ट’ हाताने खेळत होता, पण कॅरोली मात्र त्याच्या एकमेव हाताने खेळत होता. सगळेच स्तब्ध होते. प्रत्येकालाच काय होईल याची उत्सुकता होती. शेवटी कॅरोली जिंकला. इतकी वर्ष त्याने जोपासलेलं स्वप्न पूर्ण झालं. सगळीकडे होता फक्त टाळ्यांचा कडकडाट आणि आनंदाने , भरल्या डोळ्यांनी हा प्रेमाचा, अभिनंदनाचा वर्षाव झेलणारा कॅरोली. 

एक महत्वाची गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते ती म्हणजे तारुण्यात पाहिलेलं स्वप्न साकार होईपर्यंत वयाची ३८ वर्ष उलटली, पण त्याने  स्वप्नांचा पिच्छा सोडला नाही. या वयात सुवर्ण पदक जिंकण प्रत्येकालाच जमत नाही, पण कॅरोलीने ते केलं. कारण, परिस्थितीपुढे हार न मानता तो घडत गेला. स्वप्नांच्या दिशेने कूच करत राहीला. म्हणूनच तो असामान्य ठरला. एवढ्यावरच तो थांबला नाही बरं का? १९५२ साली झालेल्या ऑलिम्पिकमध्ये त्याने सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. त्यावेळी कॅर्लोस पुन्हा त्याला भेटला व गमतीत म्हणाला, ” जर विश्वविक्रम कसा करायचा हे तुझं शिकून झालं असेल तर आता कृपया मलाही शिकव “.

तर मंडळी ही कथा होती स्वप्नवेड्या , सामान्यातून असामान्य बनलेल्या कॅरोलीची ! असे अनेक स्वप्नवेडे कॅरोली आपल्यात आहेत. फक्त गरज आहे तो स्वतःच्या क्षमता ओळखून त्यानुसार स्वप्न साध्य करण्याची ! स्वतःच स्वतःच्या पंखांना बळ देण्याची ! आणि मग आकाशात उंच भरारी घेण्याची ! म्हणूनच जागेपणी स्वप्न बघाकठोर परिश्रम घ्या आणि ती साकार करा. कोणीतरी म्हटलंच आहे “तुमचं यश तुमच्या हाती.” 

नमस्कार मंडळी, मी पूजा.... पूजा नरेश जाधव. आपल्या ट्रॅव्हल विथ ड्रीम्स या ब्लॉगच्या माध्यमातून नवनवीन पर्यटनस्थळांची माहिती तुमच्यासमोर आणतेय. गेल्याच वर्षी तोलानी वाणिज्य महाविद्यालयातून B. Com चं शिक्षण पूर्ण केलं. सध्या स्पर्धा परीक्षांची तयारी करतेय. त्यातून वेळ मिळाला की सरळ मोर्चा वळतो तो आपलं सगळ्यात आवडतं काम करायला ! हेच आपल्या ब्लॉगसाठी नवीन पोस्ट बनवण्याकडे.... यासोबत मला नवनवीन पदार्थ बनवायला आणि खायलाही खूप आवडतात. माझा दुसरा आवडता छंद म्हणजे झाडं लावणे आणि त्यांना न्याहाळत बसणे. अधूनमधून पुस्तकंही वाचते. त्यामध्ये परीकथा, साहसकथा आणि प्रवासवर्णनं वाचण्याकडे माझा जास्त कल असतो. या सगळ्यासोबत कॉलेजमध्ये असताना ज्यूडोचं प्रशिक्षणही घेतलं. नंतर पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना महाराष्ट्र टाइम्ससोबत "कॉलेज क्लब रिपोर्टर" म्हणूनही कामाचा अनुभव घेतला. या सगळ्या उद्योगांव्यतिरिक्त मला मनसोक्त भटकंती करायला आणि त्या त्या ठिकाणचे पारंपारिक पदार्थ चाखायलाही खूप आवडतं. तिथली संस्कृती अनुभवणं, लोकांच्या लहानसहान गोष्टींचं निरीक्षण करणं यात वेगळीच मजा येते. तशी स्वप्नं बरीच आहेत, पण त्यातलं एक म्हणजे आपला हा ब्लॉग यशस्वी करायचा. तुम्ही सगळे या प्रवासात आमच्यासोबत आहात, त्यामुळे काळजीचं काही कारणच नाही. ...... खूप बोलले ना. आता थोडं थांबते. तसे आपण भेटत राहूच नवीन पोस्टसोबत. तुम्हांला पोस्ट आवडली का हे जरूर कळवा हं. वाट बघतेय तुमच्या प्रतिक्रियेची.

13 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enjoy this blog? Please spread the word :)

RSS
EMAIL
Facebook
Facebook
Google+
Google+
http://travelwithdreams.com/the-man-with-only-hand
Instagram