More to Explore,  शोध अज्ञाताचा.....

ठिपक्यांचं तलाव (Spotted Lake)

आपण सगळ्यांनी ठिपक्यांचं हरिण, वाघ, कुत्रा, कासव वगैरे पाहिलंय. पण तुम्ही कधी रंगीबेरंगी ठिपक्यांचं तलाव पाहिलंय का ? आम्हांला सापडलंय ते ! एक असं जादुई तलाव जे ठिपकेदार आहे…ज्यातील प्रत्येक ठिपक्यात औषधी गुणधर्म आहेत. हिवाळ्यात, मुख्यतः वसंत ऋतूत हे तलाव अगदी इतर सामान्य तलावांसारखं दिसतं. पण जसा उन्हाळा सुरू होतो, तसं त्यातील पाण्याचं बाष्पीभवन होतं अन् दिसू लागतं ते हिरव्या, पिवळ्या नि निळ्या रंगांच्या ठिपक्यांनी सजलेलं ठिपकेदार तलाव (Spotted Lake). बरं ठिपके पण लहान नाहीत हां ! एक ठिपका म्हणजे कमीत कमी तुमच्या स्वतंत्र व्हिलाचा ऐसपैस जलतरण तलाव (swimming pool) होऊ शकतो. असे एकूण ३६५ लहान – मोठे ठिपके ! अगदी वर्षातल्या ३६५ दिवसांसारखे ! म्हणून तर या ठिपकेदार तलावाला कॅनडामधील सगळ्यात जादुई जागा म्हटलंय. या जादूचं रहस्य जाणून घ्यायचंय? 

Image Source

हे तलावातील रंगीबेरंगी ठिपके म्हणजे कॅल्शियम, सोडियम सल्फेट आणि मॅग्नेशियम सल्फेट या खनिजांचा खजिना आहेत. ते पाण्यात मिसळल्यावर त्यांचा संयोग होऊन तेवढ्या ठिपक्यातील पाण्याचा रंग बदलतो. ही खनिजं तलावजवळील डोंगरदऱ्यांतून वाहणाऱ्या पाण्यातून येतात आणि पाण्याचा प्रवाह संथ झाल्यावर तिथेच साठून राहतात. ठिपक्यांचा रंग त्यांच्यामध्ये असलेल्या खनिजांच्या प्रमाणानुसार बदलतो

Image Source

अनेक वर्षांपूर्वी हे तलाव क्लिलुक (Kliluk) या नावाने ओळखले जायचे. ब्रिटिश कोलंबिया व्हिजिटर सेंटरच्या मते, गेल्या अनेक शतकांपासून या ठिपकेदार तलावाला ओकॅनॅगनचे लोक एक पवित्र स्थान मानतात. त्यांच्या समजुतीप्रमाणे प्रत्येक ठिपक्यात वेगवेगळे आजार बरे करण्याचे औषधी गुणधर्म आहेत. एवढंच नव्हे तर पहिल्या जागतिक महायुद्धात या ठिपकेदार तलावातील खनिजांचा उपयोग दारुगोळा बनवण्यासाठी केला असल्याची नोंद आहे. त्यामुळे ऐतिहासिकदृष्ट्याही हे तलाव महत्त्वपूर्ण आहे. महायुद्धानंतर अनेक वर्षांनी हे तलाव एक प्रामाणिक व नवनवीन प्रयोगांसाठी उत्सुक अशा स्मिथ कुटुंबाच्या नियंत्रणाखाली आलं आणि जवळजवळ ४० वर्षे त्यांच्याच नियंत्रणात होतं. १९७९ मध्ये त्यांनी या ठिकाणी नैसर्गिक स्पा बनवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. पण देशाची सार्वजनिक मालमत्ता वैयक्तिक फायद्यासाठी वापरली जाऊ नये यासाठी कॅनडातील फर्स्ट नेशन्सने हे तलाव खरेदी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. ऑक्टोबर २००१ मध्ये त्यांनी या तलावाची २२ हेक्टर जागा खरेदी केली व उर्वरित जागा कॅनडाच्या Indigenous and Northern Affairs Canada म्हणजेच इंडियन अफेअर्स डिपार्टमेंट (IndiaN Affairs Department) ने खरेदी केली. 

Image Source

आता तुम्हीही या तलावात मनसोक्त जलविहार करत आजार बरे करण्याची कल्पना करताय का ? पण जरा थांबा. आता पर्यटकांची संख्या, तलावाची पर्यावरणीय संवेदनशीलता आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन त्याभोवती एक संरक्षक कुंपण तयार केले आहे. त्यामुळे पर्यटक त्या ठिकाणी थांबून फोटो काढू शकतात व निसर्गाची किमया डोळेभरून पाहू शकतात, पण तलावात प्रवेश शकत नाहीत. हेही नसे थोडके ! हो ना ? 

कॅनडातील ब्रिटिश कोलंबियामध्ये साऊथ ओकॅनॅगनच्या संरक्षित गवताळ प्रदेशात हे ठिपकेदार तलाव आहे. त्यामुळे कॅनडाला गेल्यावर निसर्गाचा हा अजूबा नक्की बघा. 

नमस्कार मंडळी, मी पूजा.... पूजा नरेश जाधव. आपल्या ट्रॅव्हल विथ ड्रीम्स या ब्लॉगच्या माध्यमातून नवनवीन पर्यटनस्थळांची माहिती तुमच्यासमोर आणतेय. गेल्याच वर्षी तोलानी वाणिज्य महाविद्यालयातून B. Com चं शिक्षण पूर्ण केलं. सध्या स्पर्धा परीक्षांची तयारी करतेय. त्यातून वेळ मिळाला की सरळ मोर्चा वळतो तो आपलं सगळ्यात आवडतं काम करायला ! हेच आपल्या ब्लॉगसाठी नवीन पोस्ट बनवण्याकडे.... यासोबत मला नवनवीन पदार्थ बनवायला आणि खायलाही खूप आवडतात. माझा दुसरा आवडता छंद म्हणजे झाडं लावणे आणि त्यांना न्याहाळत बसणे. अधूनमधून पुस्तकंही वाचते. त्यामध्ये परीकथा, साहसकथा आणि प्रवासवर्णनं वाचण्याकडे माझा जास्त कल असतो. या सगळ्यासोबत कॉलेजमध्ये असताना ज्यूडोचं प्रशिक्षणही घेतलं. नंतर पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना महाराष्ट्र टाइम्ससोबत "कॉलेज क्लब रिपोर्टर" म्हणूनही कामाचा अनुभव घेतला. या सगळ्या उद्योगांव्यतिरिक्त मला मनसोक्त भटकंती करायला आणि त्या त्या ठिकाणचे पारंपारिक पदार्थ चाखायलाही खूप आवडतं. तिथली संस्कृती अनुभवणं, लोकांच्या लहानसहान गोष्टींचं निरीक्षण करणं यात वेगळीच मजा येते. तशी स्वप्नं बरीच आहेत, पण त्यातलं एक म्हणजे आपला हा ब्लॉग यशस्वी करायचा. तुम्ही सगळे या प्रवासात आमच्यासोबत आहात, त्यामुळे काळजीचं काही कारणच नाही. ...... खूप बोलले ना. आता थोडं थांबते. तसे आपण भेटत राहूच नवीन पोस्टसोबत. तुम्हांला पोस्ट आवडली का हे जरूर कळवा हं. वाट बघतेय तुमच्या प्रतिक्रियेची.

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enjoy this blog? Please spread the word :)

RSS
EMAIL
Facebook
Facebook
Google+
Google+
http://travelwithdreams.com/spotted-lake
Instagram