India,  More to Explore

२. शिवथरघळ (Shivtharghal)


02 . शिवथरघळ

 

गीरीचे मस्तकी गंगा ।
तेथुनि चालिली बळे ।
धबाबा लोटती धारा ।
धबाबा तोय आदळे ॥ १ ॥

गर्जतो मेघ तो सिंधु ।
ध्वनि कल्लोळ उठीला ।
कड्यासी आदळे धारा ।
वात आवर्त होतसे ॥ २॥

तुशार उठती रेणु ।
दुसरे रज मातले ।
वात मिश्रीत ते रेणु ।
सीत मिश्रीत धुकटे ॥ ३॥

दराच तुटला मोठा ।
झाड खंडे परोपरी ।
निबीड दाटली छाया ।
त्यामधे वोघ वाहाती ॥ ४॥

गर्जती स्वापदे पक्षी ।
नाना स्वरे भयंकरे ।
गडद होतसे रात्री ।
ध्वनीकल्लोळ उठती ॥ ५॥

कर्दमु निवदेना तो ।
मनासी साकडे पडे ।
विशाळ लोटली धारा ।
ती खाली रम्य विवरे ॥ ६॥

कपाटे नेटक्या गुंफा ।
तापसी राहती सदा ।
नेमस्त बांधली नाना ।
उत्तमे निर्गळे स्थळे ॥ ७ ॥

विश्रांती वाटते तेथे ।
जावया पुण्य पाहिजे ।
कथा निरुपणे चर्चा ।
सार्थके काळ जातसे ॥ ८॥

Shivtharghal

पावसाळ्यात समर्थ रामदासांनी केलेले शिवथरघळीचे हे वर्णन अगदी चपखल वाटते. घळीतून अगदी समोरच गर्जना करत कोसळणारा धबधबा पाहिला की या वर्णनातील शब्द न् शब्दाची सत्यता पटते.महाडपासून ३४ किमी अंतरावर असलेल्या बारसगाव जवळ शिवथरघळ आहे. तिला सुंदरमठ असेदेखील म्हणतात. इथेच समर्थ रामदासांनी त्यांचे शिष्य कल्याणस्वामींना दासबोध सांगितला. जवळजवळ २२ वर्षे समर्थांनी शिवथरघळीत वास्तव्य केले. असेही म्हटले जाते की छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास यांची पहिली भेट इथेच झाली. १९३० मध्ये श्री शंकरराव देव यांना शिवथरघळीचा शोध लागला आणि त्यानंतर १९५० मध्ये समर्थ सेवा मंडळाची स्थापना करून तिचे नूतनीकरण करण्यात आले. ज्यांना पावसाळ्यात वर्षाऋतूची मजा घेत अध्यात्मिक व्हायला आवडेल त्यांनी नक्की भेट द्यावी असं हे ठिकाण आहे.

शिवथरघळीच्या परिसरात धबधबा, रामदास स्वामींचं मंदिर व वरच्या बाजूला जावळीच्या चंद्रराव मोरेंचा वाडा ( जागेची पडझड झाली आहे) आहे. इथून राजगड, रायगड, प्रतापगड व तोरणा किल्ल्यांवर दृष्टिक्षेप टाकता येतो. शिवथरघळीत जेवणाचा हॉल व राहण्याची उत्तम सुविधा उपलब्ध आहे. घळीतील वातावरण नेहमी शांत, प्रसन्न, थंड व आल्हाददायक असते. जर तुम्ही इथे दुपारी १२.०० ते १.३० मध्ये आलात तर मूगडाळीची चविष्ट खिचडी आणि शिऱ्याच्या प्रसादाचा आस्वाद घेता येईल. इथे लहान ५-६ फॅमिली रेस्टॉरंट्स आहेत तसेच शिवथरघळ ट्रस्टचा हॉल किंवा जिल्हा परिषदेच्या गेस्ट हाऊस (प्रवासी निवारा) मध्ये जेवण व राहण्याची सोय उपलब्द्ध होईल. याचप्रमाणे शिवथरघळ सुंदरमठ सेवा समिती तरुणांसाठी वेगवेगळ्या शिबीरांचे व उपक्रमांचे आयोजन करते. त्यामध्येही सहभागी होता येईल. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात शिवथरघळीच्या प्रसन्न वातावरणात नक्की रिफ्रेश होऊन या.

जायचे कसे?
• मुंबई, कल्याण व पुण्यावरून महाडपर्यंत नियमित एसटीची सुविधा उपलब्ध आहे. तिथून टूरिस्ट व्हेहिकल किंवा रिक्षाने शिवथरघळीच्या पायथ्याशी जाता येते. इथून घळीच्या टोकाला जाण्यासाठी १०० पायऱ्या चढून जावे लागते. महाडपासून घळीचा रस्ता दुतर्फा झाडांनी वेढलेला आहे. त्यामुळे फोटोशूटसाठी मस्त जागा आहेत, पण सुरक्षिततेचा विचार करूनच कोणतीही कृती करा.
• आपण शिवथरघळीला जाताना कुंभे शिवथर, कसबे शिवथर व आंबे शिवथर गावांतून जातो. कसबे शिवथर गावातूनही शिवथरघळीपर्यंत जाणारा रस्ता आहे, पण तो अवघड व जास्त वेळेचा आहे.
• पुण्याहून खाजगी वाहनाने जायचे झाल्यास गोप्या घाटातून जावे लागते. रस्ता पुढीलप्रमाणे: राजगड – भुतोंडे – बेळवंडी नदी – कुंबळे पर्वतरांगा – गोप्या घाट – कसबे शिवथर – शिवथरघळ.
• मुंबईहून खाजगी वाहनाने जाताना सरळ मुंबई – महाड – शिवथरघळ असा रस्ता आहे.

जवळची ठिकाणे :
तोरणा किल्ला, रायरेशवर व लिंगाणा किल्ला

माटवण(Mathvan) ची माहिती से साठी इथे क्लिक करा 

Written by Pooja jadhav , Published by T.W.D.

Please Comment below to share your feedback

Follow T.W.D. on Facebook , Instagram , Google Plus & Twitter for more travel stories & explore the known india

नमस्कार मंडळी, मी पूजा.... पूजा नरेश जाधव. आपल्या ट्रॅव्हल विथ ड्रीम्स या ब्लॉगच्या माध्यमातून नवनवीन पर्यटनस्थळांची माहिती तुमच्यासमोर आणतेय. गेल्याच वर्षी तोलानी वाणिज्य महाविद्यालयातून B. Com चं शिक्षण पूर्ण केलं. सध्या स्पर्धा परीक्षांची तयारी करतेय. त्यातून वेळ मिळाला की सरळ मोर्चा वळतो तो आपलं सगळ्यात आवडतं काम करायला ! हेच आपल्या ब्लॉगसाठी नवीन पोस्ट बनवण्याकडे.... यासोबत मला नवनवीन पदार्थ बनवायला आणि खायलाही खूप आवडतात. माझा दुसरा आवडता छंद म्हणजे झाडं लावणे आणि त्यांना न्याहाळत बसणे. अधूनमधून पुस्तकंही वाचते. त्यामध्ये परीकथा, साहसकथा आणि प्रवासवर्णनं वाचण्याकडे माझा जास्त कल असतो. या सगळ्यासोबत कॉलेजमध्ये असताना ज्यूडोचं प्रशिक्षणही घेतलं. नंतर पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना महाराष्ट्र टाइम्ससोबत "कॉलेज क्लब रिपोर्टर" म्हणूनही कामाचा अनुभव घेतला. या सगळ्या उद्योगांव्यतिरिक्त मला मनसोक्त भटकंती करायला आणि त्या त्या ठिकाणचे पारंपारिक पदार्थ चाखायलाही खूप आवडतं. तिथली संस्कृती अनुभवणं, लोकांच्या लहानसहान गोष्टींचं निरीक्षण करणं यात वेगळीच मजा येते. तशी स्वप्नं बरीच आहेत, पण त्यातलं एक म्हणजे आपला हा ब्लॉग यशस्वी करायचा. तुम्ही सगळे या प्रवासात आमच्यासोबत आहात, त्यामुळे काळजीचं काही कारणच नाही. ...... खूप बोलले ना. आता थोडं थांबते. तसे आपण भेटत राहूच नवीन पोस्टसोबत. तुम्हांला पोस्ट आवडली का हे जरूर कळवा हं. वाट बघतेय तुमच्या प्रतिक्रियेची.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enjoy this blog? Please spread the word :)

RSS
EMAIL
Facebook
Facebook
Google+
Google+
http://travelwithdreams.com/shivtharghal
Instagram