India,  More to Explore

शनिशिंगणापूर – दरवाजे नसलेलं गाव ! (Shani shingnapur – Village with no doors)

१. शनिशिंगणापूर – दरवाजे नसलेलं गाव ! ( Shani shingnapur – Village with no doors) 

जमिनीतून वर आलेला काळा पाषाण
नावावरूनच गावात ‘शनी’ देवाची पूजा केली जात असणार हे लक्षात येतं. या गावाच्या नावालाही इतिहास आहे. म्हटलं जातं की एक गुराख्याने अनेक वर्षांपूर्वी जमिनीतून एक काळा दगड वर येताना पाहिला. त्याला आश्चर्य वाटलं. त्याने हातातल्या लाकडी काठीने तो दगड चाचपला आणि पाहतो तर काय ? जिथे त्या काठीचा स्पर्श झाला तिथून रक्ताची धार वाहू लागली. गुराखी घाबरला. अचानक शनिदेव तिथे प्रकट झाले व त्या गुराख्याला म्हणाले , “या जागेवरील हा काळा दगड म्हणजे माझे स्थान आहे. मी सदैव इथे वास्तव्य करेन. या जागेवर कधीही मंदिर बांधू नका, परंतु दर शनिवारी नित्यनियमाने तेलाचा अभिषेक करा.” तेव्हापासून आजतागायत या परंपरेला कधीही खंड पडलेला नाही. इथले लोक शनिदेवाच्या शक्तीवर खूप विश्वास ठेवतात. शनिदेव चुकीचे काम करणाऱ्याला योग्य ती शिक्षा देतात असे त्यांचे म्हणणे आहे. म्हणून तर अख्ख्या शनिशिंगणापूर मध्ये तुम्हांला एकही पोलीस स्थानक दिसणार नाही.
दरवाजे नसलेलं गाव
याचं आणखी एक सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे कोणत्याही घराला दरवाजे किंवा खिडक्या नाहीत. गोपनीयतेसाठी फक्त पडदे आहेत. एवढंच काय तर लोक कामाला किंवा कुठे बाहेर जातानाही निःसंशय जातात. ते त्यांच्या मौल्यवान वस्तू व आभूषणांनाही लॉकरमध्ये ठेवत नाहीत. अगदी बिनधास्त कुलूपांशिवाय राहतात. नाहीतर इथे मुंबईत घराला चांगली मजबूत कुलूपं लावूनपन चोऱ्या होतात. शनिशिंगणापूर मध्ये  चोऱ्या न होण्याचं कारण म्हणजे या लोकांचा शनिदेवावरील पराकोटीचा विश्वास ! त्यांची श्रद्धा आहे की चोरी करणाऱ्यांवर शनीदेवाचा कोप होईलनव त्याची साडेसाती सुरू होईल. लोकांच्या या श्रद्धेचा आदर आणि विश्वासावर विश्वास ठेवून २०११ साली एका बँकेने इथे आपली “लॉकलेस” शाखा सुरू केली. आपले विक्रांत सरंजामेही म्हणतातच की , ” आय लव्ह यू पेक्षा महत्त्वाचं आहे आय ट्रस्ट यू ! ” हेही अगदी तसंच !
शनिशिंगणापूर चं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे पुजारी नाही. भाविक स्वतःच पूजा करतात. आधी फक्त पुरुषांनाच मंचकावर चढून पूजा करण्याची अनुमती होती , पण आता स्त्रियांनाही समान अधिकार आहे.
शनिमंदिर व आवार
शनिशिंगणापूर आहे तरी कुठे ?
महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या नेवासा तालुक्यात शनिशिंगणापूर वसलेलं आहे. ते मुंबईपासून अंदाजे ३५० किमी तर शिर्डीपासून ६० किमी अंतरावर आहे.
शनिशिंगणापूर मधील मुख्य दैवत :
शनिदेवाची ५ फूट उंचीची स्वयंभू मूर्ती म्हणजेच तो काळा पाषाण. या मूर्तीजवळ एक त्रिशूळ आहे.
शनिशिंगणापूर ला जायचं कसं ? 
शनिशिंगणापूर शिर्डीपासून जवळजवळ दोन तासांच्या अंतरावर आहे. त्यामुळे भाविक मुख्यतः शिर्डीला आले की तिथून इथे येतात. शिर्डीहून इथे येण्यासाठी खाजगी टॅक्सी, सुमो सेवा सहज उपलब्ध होतात. तशा सरकारी बसेसची सुविधाही आहे, पण त्या ठरलेल्या वेळेनुसारच असतात.

नमस्कार मंडळी, मी पूजा.... पूजा नरेश जाधव. आपल्या ट्रॅव्हल विथ ड्रीम्स या ब्लॉगच्या माध्यमातून नवनवीन पर्यटनस्थळांची माहिती तुमच्यासमोर आणतेय. गेल्याच वर्षी तोलानी वाणिज्य महाविद्यालयातून B. Com चं शिक्षण पूर्ण केलं. सध्या स्पर्धा परीक्षांची तयारी करतेय. त्यातून वेळ मिळाला की सरळ मोर्चा वळतो तो आपलं सगळ्यात आवडतं काम करायला ! हेच आपल्या ब्लॉगसाठी नवीन पोस्ट बनवण्याकडे.... यासोबत मला नवनवीन पदार्थ बनवायला आणि खायलाही खूप आवडतात. माझा दुसरा आवडता छंद म्हणजे झाडं लावणे आणि त्यांना न्याहाळत बसणे. अधूनमधून पुस्तकंही वाचते. त्यामध्ये परीकथा, साहसकथा आणि प्रवासवर्णनं वाचण्याकडे माझा जास्त कल असतो. या सगळ्यासोबत कॉलेजमध्ये असताना ज्यूडोचं प्रशिक्षणही घेतलं. नंतर पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना महाराष्ट्र टाइम्ससोबत "कॉलेज क्लब रिपोर्टर" म्हणूनही कामाचा अनुभव घेतला. या सगळ्या उद्योगांव्यतिरिक्त मला मनसोक्त भटकंती करायला आणि त्या त्या ठिकाणचे पारंपारिक पदार्थ चाखायलाही खूप आवडतं. तिथली संस्कृती अनुभवणं, लोकांच्या लहानसहान गोष्टींचं निरीक्षण करणं यात वेगळीच मजा येते. तशी स्वप्नं बरीच आहेत, पण त्यातलं एक म्हणजे आपला हा ब्लॉग यशस्वी करायचा. तुम्ही सगळे या प्रवासात आमच्यासोबत आहात, त्यामुळे काळजीचं काही कारणच नाही. ...... खूप बोलले ना. आता थोडं थांबते. तसे आपण भेटत राहूच नवीन पोस्टसोबत. तुम्हांला पोस्ट आवडली का हे जरूर कळवा हं. वाट बघतेय तुमच्या प्रतिक्रियेची.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enjoy this blog? Please spread the word :)

RSS
EMAIL
Facebook
Facebook
Google+
Google+
http://travelwithdreams.com/shani-shingnapur-village-with-no-doors
Instagram