Bolivia tourism
More to Explore,  शोध अज्ञाताचा.....

एक महाकाय आरसा : सालार दे उयुनी

”मीच माझ्या रूपाची राणी गं, मी कशाला आरशात पाहू गं”, हे गाणं ऐकलंत का हो ? मला तर वाटतं हे गाणं लिहिणाराही तयार होताना दहा वेळा आरशात बघत असेल. आपण तरुण-तरुणी तर इतका वेळ त्या आरशात पाहून आवरत असतो कि आईला शेवटी म्हणावं लागतं, “अगं बास आता ! तो आरसा लाजेल.” इतकं अनन्यसाधारण महत्त्व आहे या आरशाला ! तुम्हीही जर थोड्या थोड्या वेळाने स्वतःला आरशात पाहत असाल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. आज आपण अशा ठिकाणी जाणार आहोत जिथे जगातील सगळ्यात मोठा आरसा आहे. त्याची निर्मिती खुद्द निसर्गदेवतेनंच केली आहे. हा आरसा आहे अँडीज पर्वतरांगांजवळ वसलेल्या बोलिव्हियामध्ये. दक्षिण- पश्चिम बोलिव्हियाच्या पोटोसीमध्ये डॅनियल कॅम्पोस प्रांतात हा विशाल आरसा आहे. त्याचंच नाव सालार दे उयुनी ! त्याला सालार दे ट्युनुपा असंदेखील म्हणतात.  समुद्रसपाटीपासून ३६५६ मीटर उंचीवर असलेला हा आरसा १०,५८२ वर्ग किलोमीटर इतका मोठा आहे. गोंधळलात! खरं तर हे आहे जगातील सर्वात मोठं मिठाचं मैदान.

salar de uyuni सालार दे उयुनी

त्याचं झालं असं की ब्रिटिश छायाचित्रकार गाय नेशर यांनी नॅशनल जिओग्राफीकसाठी या सालार दे उयुनीचं चित्र काढलं.  तेव्हा ते विस्तृत जागेवर पसरलेलं मिठाचं सामान्य मैदान होतं. त्यानंतर रात्री तिथे पाऊस पडला. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा नेशर परत तिथे आले , तेव्हा संपूर्ण दृश्यच बदललेलं होतं. पावसामुळे या मिठाच्या मैदानात पाणी जमा झालं होतं, म्हणून ‘मिरर व्ह्यू’ तयार झाला आणि त्यानंतर निसर्गाचा आणखी एक चमत्कार जगासमोर आला.

Bolivia tourism

इथून दिसणारं दृश्य इतकं विलक्षण असतं की परीकथेत जगतोय असं वाटावं! म्हणूनच तर सालार दे उयुनीला ‘धरतीवरचा स्वर्ग’ असंही म्हणतात. इथे तुम्ही स्वतःचं प्रतिबिंब अगदी आरशात पाहता तसं पाहू शकता. चोहोबाजूंनी एका महाकाय आरशात स्वतःला पाहायला किती मजा येत असेल ना! इथे असं वाटतं की धरती व आकाशाचा संगम झालाय आणि आपण त्या शुभ्र ढगांवर चालतोय. पक्ष्यांसारखे उडतोय! एवढंच नाही तर सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी सूर्य जमीन आणि आकाशातून उदयाला येतोय व अस्त पावतोय असं वाटतं. हे विस्मयकारी दृश्य एकदातरी पाहावंच!

सालार दे उयुनीत दिसणारे सूर्योदयाचे दृश्य
      असं म्हणतात या जागी फार पूर्वी एक मोठा तलाव होता . तो पूर्ण सुकला आणि तिथे हे मीठाचं वाळवंट तयार झालं . त्यामुळे हा परिसर काही मीटरपर्यंत पूर्णतः मिठाने झाकला आहे. इथेच लिथियम धातूचं भांडार आहे . एवढं की इथल्या जमिनीच्या पोटात जगातील एकूण साठयांपैकी ५० ते ७० अंशी लिथियमचा साठा आहे. आपल्या याच  विविध वैशिष्ट्यांमुळे सालार  दे उयुनी पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे . तिची आणखी काही वैशिष्ट्य उल्लेखनीय आहेत :
१.  सालार दे उयुनीच्या या आरसामय मैदानातून एक रस्ता थेट बोलिव्हियाच्या आल्टीप्लॅनो शहरात जातो.
२.  सालार दे उयुनी मुख्य शहरापासून दूर असल्यामुळे इथे काही हॉटेल्स बनवले आहेत आणि त्यांच्या भिंती, छत व फर्निचरसाठी सालार दे उयुनीच्याच मिठाचा वापर केला आहे .
 ३. इथून 3 किलोमीटर अंतरावर असलेलं ट्रेनचं कब्रस्तानही पर्यटकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. १९ व्या शतकात ब्रिटिशांनी एक रेल्वे ट्रॅक बनवला. खाणकामासाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रेन इथून ये-जा करत  , परंतु काही अनभिज्ञ कारणास्तव या ट्रेन बंद करण्यात आल्या. तेव्हापासून हे ट्रेनचं ‘कब्रस्तान’  बनलं.
४. आपल्या उपग्रहांची जागा निश्चित करण्यासाठी नासा सालार दे उयुनीचा वापर करते.
५. पक्ष्यांच्या जवळजवळ ८० प्रजाती इथे स्थलांतर व काही काळ वास्तव्यासाठी येतात. त्यामुळे पक्षीप्रेमींसाठी ही पर्वणीच ठरते.
६. असं म्हणतात , सालार दे उयुनीमध्ये ११ लक्ष टन मिठाचा साठा आहे.
 अशा नानाविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जगातील महाकाय आरशाला म्हणजेच सालार दे उयुनीला तुम्ही कधी भेट देताय?

Comment on our social sites to get latest update 

नमस्कार मंडळी, मी पूजा.... पूजा नरेश जाधव. आपल्या ट्रॅव्हल विथ ड्रीम्स या ब्लॉगच्या माध्यमातून नवनवीन पर्यटनस्थळांची माहिती तुमच्यासमोर आणतेय. गेल्याच वर्षी तोलानी वाणिज्य महाविद्यालयातून B. Com चं शिक्षण पूर्ण केलं. सध्या स्पर्धा परीक्षांची तयारी करतेय. त्यातून वेळ मिळाला की सरळ मोर्चा वळतो तो आपलं सगळ्यात आवडतं काम करायला ! हेच आपल्या ब्लॉगसाठी नवीन पोस्ट बनवण्याकडे.... यासोबत मला नवनवीन पदार्थ बनवायला आणि खायलाही खूप आवडतात. माझा दुसरा आवडता छंद म्हणजे झाडं लावणे आणि त्यांना न्याहाळत बसणे. अधूनमधून पुस्तकंही वाचते. त्यामध्ये परीकथा, साहसकथा आणि प्रवासवर्णनं वाचण्याकडे माझा जास्त कल असतो. या सगळ्यासोबत कॉलेजमध्ये असताना ज्यूडोचं प्रशिक्षणही घेतलं. नंतर पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना महाराष्ट्र टाइम्ससोबत "कॉलेज क्लब रिपोर्टर" म्हणूनही कामाचा अनुभव घेतला. या सगळ्या उद्योगांव्यतिरिक्त मला मनसोक्त भटकंती करायला आणि त्या त्या ठिकाणचे पारंपारिक पदार्थ चाखायलाही खूप आवडतं. तिथली संस्कृती अनुभवणं, लोकांच्या लहानसहान गोष्टींचं निरीक्षण करणं यात वेगळीच मजा येते. तशी स्वप्नं बरीच आहेत, पण त्यातलं एक म्हणजे आपला हा ब्लॉग यशस्वी करायचा. तुम्ही सगळे या प्रवासात आमच्यासोबत आहात, त्यामुळे काळजीचं काही कारणच नाही. ...... खूप बोलले ना. आता थोडं थांबते. तसे आपण भेटत राहूच नवीन पोस्टसोबत. तुम्हांला पोस्ट आवडली का हे जरूर कळवा हं. वाट बघतेय तुमच्या प्रतिक्रियेची.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enjoy this blog? Please spread the word :)

RSS
EMAIL
Facebook
Facebook
Google+
Google+
http://travelwithdreams.com/salar-de-uyuni
Instagram