दगडाचा बगीचा (Rock Garden, Chandigarh)

Spread the love

दगडाचा बगीचा (Rock Garden, Chandigarh)

राक्षस आणि पिंजऱ्यातला पोपट

“एका अजस्त्र राक्षासाचा जीव किल्ल्यावरील उंच टोकाला टांगलेल्या पिंजऱ्यातील पोपटात असतो. जो त्या पोपटाला मारेल त्याला किल्ल्याचा ताबा तर मिळेलच पण राक्षसाने दडवून ठेवलेला खजिनाही मिळेल. अनेक तरुण श्रीमंत होण्याच्या लालसेपोटी आपले नशीब आजमवायला जातात आणि राक्षस जादूने त्यांचे दगडी पुतळ्यात रूपांतर करतो…..” आता तुम्ही म्हणाल हा ट्रॅव्हल ब्लॉग आहे आणि ही गोष्टी का सांगतेय? तेही सांगते… ट्रॅव्हल चॅनेल वर ‘रॉक गार्डन’ पाहिलं आणि लहानपणी गोष्टीच्या पुस्तकात वाचलेली ही ‘राक्षस आणि पिंजऱ्यातल्या पोपटाची गोष्ट’ आठवली. जसं गोष्टीतल्या किल्ल्यात प्रवेश केल्यावर प्रथम वेगवेगळ्या स्थितीतील दगडी पुतळे नजरेस पडतात, अगदी तसंच इथेही! वाटलं ही पण जादूच असेल तर? कोण्या मोठ्या जादूगाराने जिवंत माणसांचे पुतळे बनवले असतील तर… उत्सुकता क्षणाक्षणाला वाढत होती आणि विचारांचा वेगही.😁 मग आणखी माहिती मिळवायला सुरुवात केली आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. इथेही जादूगार होता त्याचं नाव श्रीमान नेकचंद, पण त्याने आपल्या जादूचा उपयोग लोकोपकारासाठी केला.😊

रॉक गार्डन म्हणजे नक्की काय?

‘रॉक गार्डन’ हे नाव ऐकून सुरुवातीलाच थोडं विचित्र वाटलं ना! मराठीत अगदी शब्दशः म्हणायचं झालं तर दगडाचा बगीचा! त्यात काय वेगळं आहे? दगड तर रस्त्यावर पण असतात. पण या ‘रॉक गार्डन’ चं वेगळेपण पाहायचं असेल तर चंदीगढला एकदा तरी भेट द्यायलाच हवी. ‘नेक चंदचे रॉक गार्डन’ म्हणूनही ते प्रसिद्ध आहे. ४० एकर विस्तृत जागेत पसरलेल्या या रॉक गार्डनमध्ये निरुपयोगी वस्तूंपासून बनवलेल्या विविध शिल्पाकृती पाहायला मिळतील. हे गार्डन सुखना तलावाजवळ आहे.

याचं वेगळेपण कशात आहे?

याची खासियत म्हणजे ते इतर वस्तुसंग्रहालयाप्रमाणे बंदिस्त नाही. इथे कृत्रिम धबधबे आहेत. तसेच बॉटल, काच, बांगड्या, तुटलेले पाईप्स, टाईल्स, मातीची भांडी, कोळसा, चिकणमाती, इलेक्ट्रिकल वेस्ट, सिंक्स अशा घरगुती व औद्योगिक निरुपयोगी वस्तूंचा वापर करून येथील शिल्पाकृती बनवल्या आहेत. एकाच आकारातील अमूर्त दगडी रचना केलेले प्रवेशद्वार लक्षवेधक आहे. या गार्डनचा नमुना काळाच्या ओघात नष्ट झालेल्या उत्कृष्ट राज्याचा आहे. रॉक गार्डनचे लहान प्रवेशद्वार राजसी थाटासोबत विनम्रपणे झुकायला शिकवतात. विविध प्रकारच्या कमानीचे दरवाजे, ओटी , रस्ते, लेन, पार करत आपण प्रत्येकवेळी नव्या आवारात प्रवेश करतो. राजवाड्यात असाव्यात अशा राजदरबार , गीतकार- संगीतकारांच्या खोल्या , त्यांचे पुतळे, राजस्त्रियांचे अंत:गृह , शयनकक्ष , गाव , डोंगर, पूल , धबधबे, देवदेवतांची कोरीव शिल्पे असं सगळं या स्वप्नवत राज्यात पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे रानटी हत्तींंचा समूह , वानरांची टोळी आणि इतर प्राण्यांची शिल्पेही मनोवेधक आहेत . मानवी शिल्पाकृतींना दिलेला शहरी फॅशनचा तडकाही उत्तम आहे. इथल्या सगळ्यात मोठ्या धबधब्याचं वैशिष्ट्य म्हणजे आपण अगदी दगडी भिंत चढून त्याचं मूळ गाठू शकतो . त्याचप्रमाणे ‘रॉक गार्डन’ मध्ये असलेल्या ओपन एअर थिएटर मध्ये बऱ्याच प्रतिष्ठित कार्यक्रमांचं सादरीकरण झालं आहे. ज्या देशात वाढती झोपडपट्टी आणि निरुपयोगी कचऱ्याचे वाढते प्रमाण आहे तिथे पुनः प्रक्रिया करून बनवलेलं हे रॉक गार्डन उल्लेखनीय आहे. अशा विविध मानवनिर्मित कलाकृतींनी नटलेल्या या रॉक गार्डन चा पायी चालत घेतला जाणारा शोध रोमांचक ठरतो.

या ‘रॉक गार्डन’ चा शोध कसा लागला?

रॉक गार्डनच्या अस्तित्वात येण्याची कथाही रंजक आहे. आताची रॉक गार्डन ची जागा पूर्वी कचरा टाकण्यासाठी डम्पिंग ग्राउंड म्हणून वापरली जायची. त्यावेळी ‘नेक चंद’ हे चंदीगढच्या कॅपिटल प्रोजेक्टसाठी अभियंटकी विभागात ‘रोड इन्स्पेक्टर’ म्हणून रुजू झाले. त्यांनी सायकल वर फेरफटका मारत शिवालिकच्या पर्वतरांगांतून विविध समान आकाराचे , रंगांचे लहान-लहान दगड गोळा केले. १९५८ ते १९६५ या सात वर्षांत शहरी आणि औद्योगिक निरुपयोगी वस्तू गोळा केल्या. यात अगदी तुटलेल्या फ्रेम्स, काटे चमचे, धातूच्या तारा, गोट्या, जास्त भाजलेल्या विटा आणि न्हाव्याच्या दुकानातील केसांचाही समावेश होता. त्यांच्याकडे जवळ जवळ २० हजार दगडांच्या नमुन्यांचा संग्रह झाला. हे सर्व साहित्य त्यांनी स्वतःच्या कामासाठी तयार केलेल्या एका झोपडीत ठेवलं. मग झऱ्याकाठच्या रम्य वातावरणात या अमूर्त शिल्पांच्या निर्मितीला सुरुवात झाली. १८ वर्षानंतर अनपेक्षितपणे एका ऑफिसर ने या जंगलाला भेट दिल्यामुळे नेक चंद यांच्या गुपित कार्याचा शोध लागला. अनधिकृत बांधकाम असल्यामुळे हे रॉक गार्डन धोक्यात होते, पण सर्व नागरिकांच्या एकजुटीमुळे १९७६ साली सर्व सामान्य नागरिकांसाठी खुले करण्यात आले. त्याचप्रमाणे या अनोख्या रॉक गार्डन च्या विकासासाठी सरकारने नेक चंद यांना ५० कामगार व नियमित पगार देऊ केला. १९८३ साली बांधकाम पूर्ण झाले व नंतर ‘रॉक गार्डन’ सर्व पर्यटकांसाठी अधिकृतपणे खुले करण्यात आले. आता दरवर्षी स्थानिक स्त्रिया मोठ्या उत्साहात इथे ‘तीज’ हा सण साजरा करतात. दररोज किमान ५००० पर्यटक भेट देत असलेल्या या आगळ्यावेगळ्या संग्रहालयाचे जगभरातील पर्यटकांकडून या कौतुक होत असल्याने त्याला ‘हेरिटेज साईट’चे महत्त्व प्राप्त झाले आहे.

हे माहीत असलेलं बरं!

१. रॉक गार्डन ला भेट देण्याची वेळ:
उन्हाळा (१ एप्रिल ते ३० सप्टेंबर): सकाळी ९.०० ते संध्याकाळी ७.००)
हिवाळा (१ ऑक्टोबर ते ३१ मार्च): सकाळी ९.०० ते संध्याकाळी ६.००)
२. पर्यटकांच्या सोईसाठी इथे एलइडी लाईट्सची पण सोय करण्यात आली आहे.

Thank you for Visiting TWD

For Any Query & feed back please mail us on travelwithdreams18@gmail.com

For Recend travel Changes , Visa Details , Blogs & travel Stories please visit http://travelwithdreams.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *