Reverse waterfall at Sadawaghapur

९. उलटा धबधबा (सडावाघापूर धबधबा)

More to Explore भटकंती वर्षाऋतूतली!
Spread the love

आतापर्यंत आपण सगळ्यांनीच कड्यावरून धो-धो कोसळणारे झेनिथ धबधबा, चिंचोटी धबधबा यांसारखे ‘सरळ’ धबधबे पाहिलेत आणि त्यांंच्यात मनसोक्त चिंब झालो, पण तुम्ही कधी ‘उलटा धबधबा’ ( Reverse waterfall) पाहिलाय का ? आश्चर्य वाटलं ना ! पण निसर्गाला काहीच अशक्य नाही. त्याचाच अद्भुत चमत्कार म्हणजे हा उलटा धबधबा ( Reverse waterfall). अजूनही विचार करताय ना ‘उलटा धबधबा’ ( Reverse waterfall) नक्की कसा असेल याचा!
या धबधब्याचं गुपित तसं साधं-सरळच आहे आणि ते लपलंय साताऱ्यातील पाटण तालुक्यात. कास पठाराच्या रस्त्याकडे जाताना यवतेश्वर डोंगरापुढे काही अंतरावर सडावाघापूर ( Sadawaghapur) हे लहानसं गाव आहे. या परिसरावर निसर्गाने मुक्तहस्ते सौंदर्याची उधळण केली आहे, त्यामुळे त्याला “मिनी महाबळेश्वर” असे देखील म्हणतात. पावसाळ्यात तर इथली निसर्गाची नवलाई पाहण्यासारखी असते. पठारावर कड्याच्या शेजारीच एक मोठं तळं आहे. ते भरल्यानंतर पाणी कड्याकडे वाहू लागते. तसेच पावसामुळे पठारावर पडणारे पाणी कड्यावरून शेकडो मीटर खोल दरीकडे धाव घेते, पण वाऱ्याच्या प्रचंड दाबामुळे त्यातील निम्म्याहून अधिक पाणी उलटे पठारावरच फेकले जाते. जवळजवळ १०० फुटांपर्यंत पाणी मागे फेकले जाते. त्यातूनच हा उलटा धबधबा ( Reverse waterfall) अस्तित्वात आणि प्रसिद्धीच्या झोतात आला.जुलै , ऑगस्ट महिन्यांंत तर या पठारावर स्वर्ग अवतरल्याचा भास होतो. त्यात जर पावसाने मस्त जोर धरला असेल, तर हे उलट्या धबधब्याचे (Reverse waterfall) दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरते. निसर्गाची ही किमया पाहण्यासाठी तुम्हीसुद्धा नक्कीच उत्सुक असाल, पण जरा थांबा! जाण्यापूर्वी काही गोष्टी जाणून घ्या.
१. धबधब्याजवळ हॉटेलची सोय नाही. जाताना वाटेत तुरळक चहा आणि नाश्त्याचे स्टॉल दिसतात. त्यामुळे आपल्या खाण्यापिण्याचा बंदोबस्त तुम्हांला सातारा स्थानकातच करावा लागेल किंवा घरून खाऊ घेऊन जा.
२. धबधब्याकडे जाण्यासाठी निश्चित मार्ग दाखवणारी दिशादर्शक पाटीही नसल्यामुळे गोंधळ उडण्याची शक्यता असते. त्यामुळे स्थानिकांना विचारतच मार्गक्रमण करा.
३. पठारावर कड्याच्या बाजूला कोणतीही सुरक्षिततेची साधने किंवा सुरक्षारक्षक उपलब्ध नाहीत. त्यामुळे कड्याच्या अगदीच टोकाजवळ जाणे धोकादायक आहे. काळजी घ्या.

उलटा धबधबा ( Reverse waterfall) पाहायला जायचे कसे ?
१. खाजगी वाहनाने किंवा एसटी ने जाणार असाल तर पुढीलप्रमाणे मार्ग आहेत :
•सातारा – नागठाणे – तारळे – सडावाघापूर
•कऱ्हाड – पाटण – सडावाघापूर
•उंब्रज – चाफळ – दाढोली – सडावाघापूर
२. ट्रेनने गेलात तर सातारा स्थानकात उतरून नागठाणे- तारळे मार्गे सडावाघापूरला पोहोचता येते, पण खाजगी वाहन करून जाणे केव्हाही उत्तम.

जेव्हा पावसाचा जोर व वाऱ्याचा वेग जास्त असेल तेव्हा असे उलटे धबधबे ( Reverse waterfall) लोहगड, सांधण व्हॅली व लोणावळ्याच्या पर्वतरांगांंमध्येही दृष्टीस पडतात.

सांधण व्हॅलीतील उलटा धबधबा

लोहगडावर वाहणारा उलटा धबधबा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *