More to Explore

मोराची चिंचोली : एक अविस्मरणीय अनुभव !

"नाच रे मोरा ,आंब्याच्या वनात 
 नाच रे मोरा नाच 
ढगांशी वारा झुंजला रे,
काळा काळा कापूस पिंजला रे
आता तुझी पाळी ,
वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच,
नाच रे मोरा......"


बघा! वाचताना नकळत तुम्हीही लयबद्ध आवाजात बोललात. हे बालगीतच तसं आहे. ते ऐकलं किंवा वाचलं तरी आपण भूतकाळात जातो आणि बालपणीच्या गोड आठवणी ताज्या होतात. तेव्हा शाळेत आपण मोठ्या उत्साहाने कोरसमध्ये हे गीत म्हणायचो, पण तुम्ही कधी असा नाचणारा  मोर पाहिलात का? आंब्याचं वन तर आपल्यापैकी बहुतांश जणांनी पाहिलंय. पण, पावसाची चाहूल लागताच आनंदाने नाचणारा मोर पाहणारा खरंच भाग्यवान! अशा भाग्यवानांच्या यादीत तुम्हांलाही  यायची इच्छा आहे का ? जर उत्तर ‘हो’ असेल तर ‘मोराची चिंचोली’ तुमची वाट बघतेय.

मोराची चिंचोली. नाव थोडं वेगळं आणि आकर्षक आहे ना ! खरं तर या गावात फार पूर्वीपासून चिंचेची खूप झाडं आहेत. त्यामुळे त्याला चिंचोली हे नाव पडलं. त्यानंतर इथे आढळणाऱ्या मोरांमुळे  गावाच्या नावात त्यांची भर पडली व ‘मोराची चिंचोली’ म्हणून  ते ओळखलं जाऊ लागलं. गावाचं हे ‘मयूरवैभव‘ टिकवण्यात गावकऱ्यांचा मोठा वाटा आहे. चिंचोलीतील शांत वातावरण व जैवविविधतेमुळे इथे पूर्वीपासूनच मोर वास्तव्यास आहेत. “आपला  राष्ट्रीय पक्षी असलेला हा देखणा मोर गावाचे वैभव आहे ,तसेच भगवान कार्तिकेयाचे वाहनही !” या समजुतीमुळे गावकऱ्यांनी कधीही मोरांची शिकार केली नाही. उलट त्यांंचं अस्तित्त्व टिकून राहावं व त्यांची संख्या वाढावी म्हणून गावकऱ्यांनी आपल्या शेतांभोवती मोरांना आकर्षित करणारी झाडं लावली.  त्यांच्यासाठी पोषक वातावरण तयार केलं. एवढंच नाही तर पुढच्या पिढीनेही त्यांना इजा न पोहोचवता त्यांची काळजी घ्यावी, असे संस्कारही केले.म्हणूनच आजच्या घडीला गावातल्या लोकसंख्येइतकीच मोरांचीही संख्या आहे. जवळजवळ ३ हजारांच्या घरात ! शहरांतल्या प्राणिसंग्रहालयात एखादा मोर दिसताना पंचाईत आणि इथे मात्र हजारोंच्या संख्येत मोर ! तेही सहज घरासमोरच्या व्हरांड्यात फिरताना दिसणारे !

मोराची चिंचोली

इथले गावकरी आणि मोरांची केमिस्ट्री खूप सुंदर आहे.मोर ‘हे गाव आपलंच असल्यासारखे’ बिनधास्त इथे फिरतात आणि त्यांच्या एकांताची काळजी गावकरी घेतात. मोरांना लपता यावे म्हणून ग्रामस्थांनी खास शेताच्या परिसरात, मोकळया जागांवर मोठी झाडं लावली आहेत. शिवाय उन्हाळ्यात त्यांना अन्नपाण्याचा तोटा होऊ नये यासाठी त्यांची खाण्यापिण्याची सोय मनुष्यवस्तीपासून दूर रानात केली जाते. यामागे गावकऱ्यांचा एक ठोस विचार आहे.तो म्हणजे मोरांचा मूळ लाजाळू स्वभाव बदलू  दयायचा नाही. त्यांना पाळीव करायचं नाही. इतका विचार गावकरी करतात ! त्यामुळे या गावकऱ्यांपासून आपल्याला काही इजा पोहोचणार नाही, हे मोरांना कळून चुकलंय म्हणून ते गावात, शेतांत सहज फिरतात. ते गावकऱ्यांपासून दूर पळत नाहीत, पण कोणी नवीन दिसलं की मात्र सरळ धूम ठोकतात.

ऐन पावसाळ्यात इथे येणं म्हणजे दुग्धशर्करायोगच ! मी दुग्धशर्करायोग म्हटलं कारण, मेघराजाच्या वर्षावाने न्हाऊन निघालेली धरती, वातावरणातला सळसळणारा उत्साह , ताजी हवा आणि या अशा ‘मौसम मस्ताना’ मध्ये हिरव्यागार माळरानावर डौलाने  ठेका धरणारे मोर ! ‘याचि देही, याचि डोळा पाहावा हा सोहळा! हे दुर्मिळ दृश्य पाहताना  “ढगांशी वारा झुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे, आता तुझी पाळी वीज देते टाळी, फुलव पिसारा नाच…” हे बोल मुखात आले नाहीत तर नवल !

गावाचं हे ‘मयूरवैभव’ सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे.त्यामुळे अनेक हौशी पर्यटक ‘मोराची चिंचोली’ पाहण्यासाठी इथे येतायत. गेल्या ४-५ वर्षांत मुंबई-पुण्याजवळचा ‘वन डे पिकनिक स्पॉट‘ म्हणून हे गाव नावारूपाला आलंय. याची दखल घेऊन काही गावकऱ्यांनी पर्यावरणपूरक कृषी पर्यटन केंद्रही उभारली आहेत. तिथे पर्यटकांच्या राहण्याची व जेवणाची सोय होते. शिवाय खेडेगावातील साध्या जीवनाचा जवळून अनुभव घेता येतो. इथल्या माणसांच्या मनाची श्रीमंती पाहून प्रसन्न वाटतंं. हे सगळं असलं तरी तिथे जाण्यापूर्वी काही नियम समजून घ्या. त्यांचं पालन केलं तरच हा निर्भेळ अनुभव तुम्हांला घेता येईल. 

कृषी पर्यटन केंद्र
  • मोर हा अतिशय लाजाळू आणि संवेदनशील पक्षी आहे. त्यामुळे त्याला तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची खबरदारी घ्या.
  •  ‘मोराची चिंचोली’ला जाण्यापूर्वी तुमचं आगाऊ बुकिंग करा. पर्यटकांची संख्या जास्त होत असल्यास आज गावाला येऊ नका असं गावकरी थेट सांगतात. 
  • फोटोसाठी  किंवा काही खाऊ घालण्यासाठी मोराच्या पाठीमागे लागू नका. 
  • मोर काही खात असेल तर तिकडे अजिबात फिरकायचं नाही. 
  • पर्यटन केंद्रात फक्त शाकाहारी जेवणच मिळतं. संपूर्ण गावात मद्यपानास बंदी आहे. 
  • इथे जास्त गोंधळ घालायचा नाही. मोराच्या हालचाली टिपायच्या असतील तर शांतताच हवी, नाहीतर मोर जवळ येणारच नाहीत. 

याशिवाय मोरांच्या सूक्ष्म हालचाली टिपायच्या असतील तर आणखी काही मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत. इथे जवळजवळ अडीच-तीन हजार मोर आहेत. त्यामुळे सतत त्यांच्या ओरडण्याचा आवाज येत राहतो. जर आवाजाचा लक्षपूर्वक कानोसा घेतला तर मोर कुठे आहेत ते कळतं. शेतात फिरताना या आवाजाच्या रोखाने गेल्यास हमखास मोर पाहायला मिळतात. मोराबरोबरच मोठ्या संख्येने लांडोरीही पाहायला मिळतात. शेतात एकाच ठिकाणी अनेक लांडोरी पाहायला मिळाल्या की समजायचं मोर जवळपासच आहे. याव्यतिरिक्त एकत्र उडणारे मोर-लांडोर , नाचणारे मोर-लांडोर, पिसं स्वच्छ करणारे मोर, झाडाच्या शेंड्यावर बसलेले मोर, अन्नाच्या शोधात फिरणारे मोर, प्रणयक्रीडा करणारे मोर-लांडोर अशा मोरांच्या अनेक दुर्मीळ हालचाली तुम्हांला टिपता येतील. त्यासाठी सकाळी ६.०० ते ८.०० व सायंकाळी ४.०० ते ७.०० पर्यंतची वेळ अगदी मोक्याची आहे. 

मोराची चिंचोली

मोरांव्यतिरिक्त इथे बया पक्षी, खंड्या, भारद्वाज, कीर्कीडे अगदी सहज दृष्टीस पडतात. तसेच चिंचेच्या झाडांसोबतच डाळींबाच्या बागा  व गर्द आमराईही मन मोहून टाकते.

भारद्वाज

म्हणूनच तर  म्हणतात ‘मोरांची चिंचोली’ हा एक निसर्गसंपन्न व आगळा अनुभव आहे. त्यामुळे तुम्हीही तो नक्की घ्या.

मोराची चिंचोली आहे कुठे ?

पुणे -अहमदनगर मार्गावरील शिरूरजवळ मोराची चिंचोली आहे.अहमदनगर मार्गाच्या सुरूवातीला डाव्या हाताला शिक्रापूर फाट्यावरून आत सुमारे २३ किमी अंतरावर हे गाव आहे. मोराची चिंचोलीपासून अंदाजे २० किमीवर निसर्गाचा आणखी एक आविष्कार आहे. तो म्हणजे रांजण खळगे. त्याला निघोज कुंड, मळगंगा कुंड असेदेखील म्हणतात. इथे येणारे पर्यटक आवर्जून रांजणखळगे व रांजणगावच्या महागणपतीचेही दर्शन घेतात. शिवाय शिक्रापूरपासून जवळच संभाजी महाराजांची समाधीही आहे. त्यामुळे एकाच भेटीत ही सगळी पर्यटनस्थळं पाहायला हरकत नाही. 

नमस्कार मंडळी, मी पूजा.... पूजा नरेश जाधव. आपल्या ट्रॅव्हल विथ ड्रीम्स या ब्लॉगच्या माध्यमातून नवनवीन पर्यटनस्थळांची माहिती तुमच्यासमोर आणतेय. गेल्याच वर्षी तोलानी वाणिज्य महाविद्यालयातून B. Com चं शिक्षण पूर्ण केलं. सध्या स्पर्धा परीक्षांची तयारी करतेय. त्यातून वेळ मिळाला की सरळ मोर्चा वळतो तो आपलं सगळ्यात आवडतं काम करायला ! हेच आपल्या ब्लॉगसाठी नवीन पोस्ट बनवण्याकडे.... यासोबत मला नवनवीन पदार्थ बनवायला आणि खायलाही खूप आवडतात. माझा दुसरा आवडता छंद म्हणजे झाडं लावणे आणि त्यांना न्याहाळत बसणे. अधूनमधून पुस्तकंही वाचते. त्यामध्ये परीकथा, साहसकथा आणि प्रवासवर्णनं वाचण्याकडे माझा जास्त कल असतो. या सगळ्यासोबत कॉलेजमध्ये असताना ज्यूडोचं प्रशिक्षणही घेतलं. नंतर पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना महाराष्ट्र टाइम्ससोबत "कॉलेज क्लब रिपोर्टर" म्हणूनही कामाचा अनुभव घेतला. या सगळ्या उद्योगांव्यतिरिक्त मला मनसोक्त भटकंती करायला आणि त्या त्या ठिकाणचे पारंपारिक पदार्थ चाखायलाही खूप आवडतं. तिथली संस्कृती अनुभवणं, लोकांच्या लहानसहान गोष्टींचं निरीक्षण करणं यात वेगळीच मजा येते. तशी स्वप्नं बरीच आहेत, पण त्यातलं एक म्हणजे आपला हा ब्लॉग यशस्वी करायचा. तुम्ही सगळे या प्रवासात आमच्यासोबत आहात, त्यामुळे काळजीचं काही कारणच नाही. ...... खूप बोलले ना. आता थोडं थांबते. तसे आपण भेटत राहूच नवीन पोस्टसोबत. तुम्हांला पोस्ट आवडली का हे जरूर कळवा हं. वाट बघतेय तुमच्या प्रतिक्रियेची.

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enjoy this blog? Please spread the word :)

RSS
EMAIL
Facebook
Facebook
Google+
Google+
http://travelwithdreams.com/morachi-chincholi-pune-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80
Instagram