Spread the love

आजपर्यंत गुलाबी प्रेम, गुलाबी आँखेंं यांबद्दल ऐकलं होतं. आता गुलाबी तलावही यांच्या यादीत समाविष्ट झाला! हा सुद्धा निसर्गानेच निर्माण केलेला एक चमत्कार : लेक हिलियर. ऑस्ट्रेलियातील रिशर्श आर्किपेलागो (Recherche Archipelago) बेटावरील हा गुलाबी तलाव म्हणजे गुलाबी रंगाचा बबलगमच जणू! एका बाजूला अथांग पसरलेला निळाशार समुद्र , मध्ये दाट झाडी आणि दुसऱ्या बाजूला हा गुलाबी तलाव म्हणजेच लेक हिलियर.

हिलियर लेक व समुद्राला दुभागणारी दाट झाडी

या तलावाचे वैशिष्ट्य म्हणजे वर्षभर त्याचे पाणी गुलाबी रंगाचेच असते. तुम्ही थोडे पाणी अगदी तुमच्याकडच्या बाटलीत भरून पाहिले तरी त्याचा रंग काही बदलणार नाही. प्रश्न पडला असेल ना , कसं शक्य आहे म्हणून! म्हणतात ना देवाची करणी अन् नारळात पाणी ! तसंच काहीसं या तलावाचं. वैज्ञानिकांच्या म्हणण्याप्रमाणे तो एक क्षारयुक्त तलाव आहे. पाण्यातील उच्च पातळीची क्षारयुक्तता, खारट पाण्यावर उगवणारे शेवाळ ज्याला ड्युनेलिला सॅलिना (Duneliella Salina) असेदेखील म्हणतात व गुलाबी हॅलोबॅक्टेरिया (halobacteria) यांच्या प्रभावाने तलावातील पाणी गडद गुलाबी रंगाचे आहे. विशेष म्हणजे पाण्यातील क्षाराचे प्रमाण उच्च पातळीचे असले तरी हिलियर लेक पोहण्यासाठी सुरक्षित आहे.
जवळजवळ ६०० मीटर लांबी व २५० मीटर रुंदी असलेल्या या गुलाबी तलावाचा शोध १८०२ साली लागला. इतिहासातील नोंदीप्रमाणे या तलावाचा वापर मीठ गोळा करण्यासाठी केला जायचा. आता ते एक पर्यटनस्थळ म्हणून नावाजले गेले आहे. लेक हिलीयरपर्यंत पोहोचण्यासाठी खूप कमी मार्ग उपलब्ध आहेत. एरोप्लेन सिनिक फ्लाईट्स(Aeroplane Scenic Flights) हा पर्यटकांमध्ये प्रसिद्ध असलेला पर्याय आहे. त्याशिवाय क्रुझेसचाही पर्याय उपलब्ध आहे . तुम्ही काय निवडताय?
गुलाबी रंगाचा बबलगम भासावा असा लेक हिलियरचा नजारा

1 comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *