७. कोंडाणे गुंफा ( Kondane Caves)

More to Explore भटकंती वर्षाऋतूतली!
Spread the love

तुम्हांला पावसाची मजा घेत इतिहासात रमायला आवडेल का? प्राचीन काळातील बौद्ध भिक्षुकांच्या जीवनाचा मागोवा घ्यायला व एक रात्र गुंफेत तळ ठोकायला आवडेल का? जर या दोन्ही प्रश्नांची उत्तरं ‘हो’ अशी असतील तर आमच्याकडे आहे तुमच्यासाठी एक मस्त ठिकाण – कर्जतमधील ‘कोंडाणे गुंफा’.

कोंडाणे गुंफा

इसवीसन पूर्व पहिल्या शतकातील या प्राचीन गुंफा म्हणजे त्या काळातील बौद्ध भिक्षुकांचे निवासस्थान. गौतम बुद्धांची शिकवण देण्यासाठी ते गावोगाव फिरत. त्याकाळी काही आजच्यासारखी वाहतूक नव्हती. त्यामुळे मैलोनमैल जाण्यासाठी पायपीट करावी लागे.मग पावसाळ्यात, हिवाळ्यात चालून थकल्यानंतर आसरा घेण्यासाठी, विश्रांतीसाठी एक निश्चित जागा असावी या हेतूने या गुंफा बांधल्या. एकूण १६ गुंफांचा संग्रह असलेल्या या बुद्धिस्ट गुंफा म्हणजे प्राचीन शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना. या गुंफेत विहार, चैत्य व स्तूप कोरले आहेत. तसेच भिक्षुकांच्या आरामासाठी दगडात पलंगही कोरले आहेत. गुंफेत अनेक खोल्या आहेत. त्या एकमेकांजवळ असल्याने सहज सगळ्या खोल्यांत हिंडता येते. शेवटच्या गुंफेत पाण्याचा साठा आहे. या गुंफांचे बांधकाम , शिल्पाकृती व त्यांची उत्कृष्ट रचना पाहण्यासाठी वर्षभर कलाप्रेमी या गुंफांना भेट देतात. पावसाळ्यात इथे अनेक धबधबे कोसळतात. त्यामुळे दिसणारे दृश्य विहंगम असते.
गुंफांवरून वाट काढत कोसळणारा धबधबा

तसेच इथून राजमाची व उल्हास व्हॅली जवळच आहेत. राजमाचीपर्यंत पोहोचणारा रस्ताही कोंडाणे गुंफांजवळून जातो. त्यामुळे हे अनेक ट्रेकर्सच्याही परिचयाचे ठिकाण आहे. या गुंफांतून सह्याद्री पर्वतरंगांचे भव्य व मनोहारी दृश्य दिसते. सन १९०० च्या सुरुवातीला झालेल्या भूकंपामुळे गुंफांचे पुढील प्रवेशद्वार थोडे उध्वस्त झाले आहे, पण उर्वरित रचना काळाच्या ओघात आपले अस्तित्व कायम टिकवून आहे.
या गुंफा कर्जतपासून १५ किमी अंतरावर आहेत. तिथे जाताना कोंडीवडे व ठाकूरवाडी ही साधारण २० ते २५ घरं असलेली लहान गावं लागतात. त्यामुळे तिथे वाहतुकीची व खाण्यापिण्याची सोय उपलब्ध नाही. जर तुम्ही यंदाच्या पावसाळ्यात तिथे जाण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा:
* खाण्यापिण्याचे मुबलक पर्याय फक्त कर्जत स्टेशनवरच उपलब्ध आहेत.
* राहण्याचे पर्यायही कर्जत स्टेशननजीक उपलब्ध आहेत. तसेच जर ग्रुपने जाणार असाल, तर कोंडाणे गुंफांमध्येही राहण्याची सोय करता येईल.
* इथे मद्यपान व धूम्रपान निषिद्ध आहे.
* गुंफांजवळ खाद्यपदार्थांचे रॅपर्स टाकू नका. कुठेही लघुशंका करू नका. आपल्या प्राचीन वास्तूंची काळजी आपणच घ्या व एक जबाबदार पर्यटक व्हा.
तसे तुम्ही हुशार व जबाबदार आहातच, त्यामुळे चिंता का कोई विषय नहीं |😉 मग वाट कसली बघताय ? मस्त पाऊस सुरू झालाच आहे, तर बॅकपॅक करून निघा या मनोहारी गुंफांच्या शोधात…….
आणि तुम्हाला तिथे काही वेगळं दिसलं तर नक्की आम्हांला कळवा आपल्या travelwithdreams18@gmail.com या मेल आयडी वर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *