Travel Stories

पैसा वसूल आइसलँड ( Iceland best Option to Travel )

पैसा वसूल आइसलँड!!!

आइसलँड, म्हणजे आग आणि बर्फ ह्यांचा देश, अशी याची ख्याती आहे. कारणही तसेच आहे, एकीकडे प्रचंड असे हिमनग तर दुसरीकडे रुद्र ज्वालामुखी! हिवाळ्यात निर्माण होणाऱ्या जादुई बर्फाळ गुहा आणि हजारो वर्षांपासून निद्रिस्त असलेल्या ज्वालामुखीच्या जबड्यातली गुहा. काय तो परस्पर विरोधी योग! दोनीही थक्क करणारे.

२०१७ चा जुलै महिना. मी आणि रश्मीता माझ्या वाढदिवसाचे निमित्त साधून या थरारक ट्रिप साठी सज्ज झालो होतो.

तसा अभ्यास केला होता ट्रिपचा, पण अभ्यास कितीही करा भीती तर वाटतेच. त्यात किती थंडी असेल, आइसलँड म्हणजे बर्फच बर्फ असेल कि काय….. या आणि अशा वेगवेगळ्या प्रश्नांनी थोडा गोंधळ उडाला.

पण एकदा का ठरलं कि ट्रिप करायचीच….

थंडी चे जॅकेट्स, उबदार कपडे, ट्रेकिंग चे शूज, पाऊस आला तर पॉन्चोस, वगैरे वगैरे ..

आमचे विमान रोकलावं नावाच्या दुसऱ्या शहरातून होते, म्हणून आम्ही आदल्या रात्रीच तिकडे पोहोचलो होतो. ११ जुलै चा दिवस उजाडला, नाश्ता करून विमानतळ गाठले. विमान प्रवास साडे पाच तासांचा. आम्ही पूर्ण वेळ पत्ते खेळून काढला..

संध्याकाळी ५ वाजता आम्ही रेक्याव्हीक या आइसलँड च्या राजधानीत पोहोचलो. अतिशय शुद्ध हवा आणि छान मानवेल असे तापमान. आजूबाजूला झाडे नसून छोटे खुरटयां प्रमाणे झुडुपं तीही अगदीच वेगळी. जणू काही वाटलं पृथ्वीच्या दुसऱ्याच टोकाला पोहोचलो कि काय आपण.

एअरपोर्ट वरून बस बुक केली आणि हॉटेलकडे निघालो. पाऊण तासाने बस आम्हाला हॉटेल जवळ सोडून निघून गेली. आम्ही ऐरबीएनबी द्वारे एका कुटुंबासोबत घर शेअर करणार होतो. एखाद्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणच्या स्थानिक लोकांसोबत राहण्याचा खूप फायदा असतो. तेथील राहणीमान, संस्कृती, जागा याची उत्तम माहिती मिळते.

जसे आम्ही आमच्या मुक्कामी पोहोचलो, आमच्या घर मालकाने आमचे स्वागत एका वेगळ्याच पद्धतीने केले. त्याने आम्हाला दोन डार्टस वजा पिना दिल्या व आम्हाला त्या भिंतीवर लावलेल्या मोठ्या नकाशा वर बरोबर तिथे लावायला सांगितल्या ज्या देशातून, शहरातून आम्ही आलो आहोत. आधी गमतीने त्याने आम्हाला त्या पिना आमच्याच गालाला टोचायला सांगितल्या. काय बरे ही इथली परंपरा आहे का? मी दचकून विचारले!

घर पाहून झाल्यावर आम्ही थोडा आराम केला. पण स्वस्थ बसवत नव्हते. बाहेर जणू काही कोणीतरी बोलावत होते. छान उजेड असल्याने आम्ही पटकन जेवण उरकले आणि फिरायला बाहेर पडलो. वेळ तशी रात्री १२ वाजताची असेल, पण उजेड आणि उत्तम वातावरण. आम्ही चालत चालत जवळ असलेल्या समुद्रकिनाऱ्यापाशी आलो आणि समोर पाहतो तर सूर्य ढगांमागून डोकावत होता. रात्री बारा वाजता सूर्य पाहून आठवले कि मिडनाईट सन ची मेजवानी आपसूकच मिळाली होती.

तास भर भटकंती केल्यावर घराकडे निघालो. सूर्य अजूनही क्षितिजावर होता. रात्रभर उजेड असल्याने झोप काही येत नव्हती आणि बाहेरील सुंदर दृश्य पाहून तर मन भरत नव्हते. कसाबसा डोळा लागला असेल तोवर पहाट झाली होती. तसा दिवस मावळल्याचे वाटतच नव्हते म्हणा!

सकाळी आम्ही आवरून आमच्या घराबाहेर टूर बसची वाट पाहत थांबलो. जिओआइसलँड या टूर कंपनीची बुकिंग आम्ही येण्याअगोदर करून ठेवली होती. पहिल्या दिवसाची सफर होती “साऊथ कोस्ट” (दक्षिण किनारा). आम्ही ऑनलाईन माहिती पाहून मगच साऱ्या टूर्स ठरवल्या होत्या. ही टूर म्हणजे कोणत्याही साधारण टुरिस्ट ची अगदी मस्ट सीन वगैरे टूर होती. शाहरुख च्या “गेरुवा” गाण्यातले बहुतांश चित्रीकरण येथेच झाले आहे बहुधा.

तर आमची टूर गाईड एक तिशीतील तरुणी होती. अतिशय उत्साही आणि तिच्या कामाबाबत खूप प्रेम आणि प्रामाणिक असलेली. तिने सर्वांचे स्वागत अतिशय उत्साहाने केले आणि पूर्ण टूर अशीच राहील ह्याची ग्वाही देखील दिली. टूर निघाल्यापासून प्रत्येक लहान सहान माहिती, कधी जोक्स, कधी फॅक्टस, तर कधी सूचना अशी मिक्स कॉमेंटरी करत तिने आम्हाला पहिल्या टूर स्पॉट वर आणलं. तो होता “स्कोगफॉस” धबधबा!

जवळपास २०० फुटांवरून कोसळणारे शुभ्र पाणी, पण ८० फूट व्यासाचा तोच प्रचंड जलप्रपात मनात चांगलीच धडकी भरवत होता. मी तरीही थोडी हिम्मत करत अगदी जवळ जात सेल्फी घेण्यात यशस्वी झालो.

पोटभर फोटो काढून आणि तो नितांत सुंदर निसर्ग पाहून आम्ही पुन्हा बस मध्ये येऊन बसलो. आमची गाईड आमचीच वाट पाहत होती, कारण आम्ही उशिरा परतलो होतो.

बस पुढच्या स्पॉट कडे निघाली.

उंचच उंच डोंगर रांगा हिरव्या चादरीने जणू नटलेल्या….

झाडे कमी परंतु हिरवी खुरटी झुडुपे मात्र सगळीकडे पसरलेली. अचानक जोरात पाऊस सुरु झाला आणि पूर्ण सभोवताल धुक्याने भरून गेला. पण आमची गाईड मात्र पक्की रुळलेली ड्रायव्हर असावी. बस त्याच वेगाने हाकलत होती, जणू काही खास धुक्याचे गॉगल्स होते डोळयांवर! आम्ही मात्र जीव मुठीत घेऊन बसलो होतो. पण काय निसर्गाची जादू, अगदी काही किलोमीटर्स नंतर पुन्हा एकदा पूर्ण स्वच्छ दृश्य दिसायला लागले. चढउताराचे रस्ते आणि छोटी-छोटी गावे, मधेच सुंदर नदी, पूल आणि जवळपास दिसणारे चर्चचे कळस. अतिशय रमणीय सभोवताल जणूकाही परिकथेतला!

तासाभराने आम्ही पुढील स्पॉट वर आलो. “व्हिक इ मिर्दाल” नावाचे टुमदार टेकडीला वसलेले कोळ्यांचे गाव. एकीकडे दूर फेसाळणारा अटलांटिक महासागर, दुसरीकडे महाकाय पर्वत, लांब दूरवर दिसणारे काळे खडकवजा सुळके. केवळ स्वप्नवत दृश्य. दुसरे काहीही मनात पाऊल ठेऊ शकणार नाही याची खात्री बाळगत निसर्ग आमच्याशी हवेच्या सुंदर झुळुकेने संवाद साधत होता. जवळच एक देखणं छोटंसं चर्च त्या निसर्गाच्या किमयेची शोभा आणखी खुलवत होतं.

आम्ही शक्य तेवढ्या आठवणी टिपल्या आणि मिळालेले घड्याळाचे काही अमूल्य क्षण तिथे बसून फक्त ते निसर्गाने रेखाटलेले चलचित्र न्याहाळण्यात वापरले अगदी तहान भूक विसरून.

अचानक कोणीतरी बोलवल्याचे भासले, आमची गाईड पुन्हा एकदा वाट पाहत थांबलेली. आम्ही धावत बस मध्ये शिरलो, तशी ती हसत म्हणाली, “नो प्रॉब्लेम, इट ऑल्वेज हॅपन्स”.

आमची बस आता प्रसिद्ध काळ्या वाळूच्या किनाऱ्याकडे जाऊ लागली, “रेनिस्फीआरा ब्लॅक सॅण्ड बीच”

.

“बेसाल्ट खडकांपासून बनलेल्या खांबांच्या उंच टेकडीच्या पार्श्वभूमीवर आणि ज्वालामुखीच्या प्रभावाने तयार झालेल्या काळ्या रेतीच्या जादूई झालरीवर पसरून त्यावर झेपावणारा रुद्र अटलांटिक” अशी अतिशय रोमांचित व्याख्या करावी लागेल त्या दृश्याची.

आम्ही शूज बसमध्ये ठेऊन अन फक्त हातात कॅमेरा घेऊन अधाशासारखे फोटो काढत धावत फिरत होतो. आजूबाजूला फिरणाऱ्या लोकांची सुद्धा तीच गत झालेली. आम्हाला पाण्यात जाण्यास मज्जाव केला होता आमच्या गाईड ताईने, कारण हा बीच खूप धोकादायक समजला जातो.

आणि दिसायलाही तो आहेच तसा विस्मयकारक आणि गूढ! आम्ही अर्धा तास बीच वर एन्जॉय केले आणि मग मस्त जवळ असलेल्या एकमेव खाद्यगृहात जाऊन माशांवर ताव मारला पोट भरेस्तोवर.

पुढचा टप्पा होता (Sólheimajökull) “सोहेमायोकुल ग्लेशियर “. नाव खूपच जास्त किचकट आहे…… हो, गाईड ताई सुद्धा पुन्हा पुन्हा उच्चार करून सांगत होती, पण आम्ही बिचारे जीभ वाकडी करून मेटाकुटीला आलो होतो. तर हा प्रचंड ग्लेशियर (Mýrdalsjökull ) “मिर्दालस्योकुल ” (बहुधा योग्य उच्चार) ची एक जीभ म्हणून ओळखला जातो. हा छोटा ग्लेशियर दोन रुद्र आणि महाकाय, शिवाय खूप संवेदनशील अशा ज्वालामुखीच्या मध्ये वसलाय.

त्यांची नावेही भयंकर आहेत, एक कातला आणि दुसरा (Eyjafjallajökull) “इअफिआल्योक्कुलं “. आहे कि नाही भन्नाट!! आम्ही बस च्या ठिकाणाहून चालत १ किलोमीटर अंतरावर असलेल्या ह्या जागेवर पोहोचलो. ४ वाजले असावेत. कसरत करत बर्फाच्या त्या महाकाय पसाऱ्यावर आम्ही पाय ठेवत वर जाऊ लागलो. गाईड ताईने आधीच आम्हाला दम दिलेला कि कोणीही अतिउत्साहीपणे त्या ग्लेशियरच्या पूर्ण वरच्या टोकास जाऊ नये, कारण कुठेही बर्फ फसवा असू शकतो आणि प्रचंड खोल खड्ड्यात पडू शकतो. तरीही अनेक महाभाग कान बंद करून आगाऊपणे सेल्फी काढण्यासाठी वर-वर चढतच होते. आम्ही सुरक्षित अंतरापर्यंत जाऊन त्या विसम्यकारी निसर्ग निर्माणाचा मनमुराद आनंद लुटला. खूप मज्जा आली इतका प्रचंड बर्फ आणि तोही इतक्या सहजतेने फिरण्यास मिळाल्याने. हुर्रे!

तिथून आम्ही दिवसाच्या अखेरच्या स्पॉट साठी प्रयाण केले.


“सेलियालँड्सफॉस ” नावाने ओळखला जाणारा धबधबा.

अतिशय सुरेख आणि विशेष म्हणजे टुरिस्ट ह्या धबधब्याच्या पाठीमागून प्रदक्षिणा करून धबधब्यामागील गुहेत जाऊन येऊ शकतात. आहे कि नाही गम्मत!!!!

आम्ही काळजीपूर्वक निसरड्या वाटेवरून धबधब्याच्या मागे गेलो, तर छानपैकी इंद्रधनुष्य सभोवताली दिसत होते. फोटो काढण्यास कॅमेरा बाहेर काढताच अगदी काही क्षणात लेन्स ओली. शिवाय पाण्याचा जबरदस्त आवाज, मग शांतपणे नियतीच्या शक्तीचा आनंद घेण्यास सुरुवात केली आणि मग मात्र तोच प्रचंड जलप्रपात अगदी शांत वाटू लागला. अतिशय सुखद अनुभव होता तो. आम्ही दुसऱ्या दिशेने खाली उतरत आणि आजूबाजूची निसर्गसंपत्ती अनुभवत पुन्हा बसपाशी आलो. ह्या वेळेस आम्ही वेळेत पोहोचलो होतो, पाय देखील दुखत होते. दिवसभर फिरून चांगलेच दमलो होतो, पण अजून काही बघायचे शिल्लक असते तर एका पायावर तयार होतो.

आता टार्गेट होते मिशन घर!!

संध्याकाळ झाली होती घरी पोहोचेपर्यंत, तीही फक्त म्हण्यापुरती कारण दिवस तर मावळला नव्हताच. पण भारतातले १४ जुलै चे १२ वाजले होते, म्हणजे बर्थडे सेलिब्रेशन चालू, येस्स. आमच्या घर मालकाने आम्हाला जवळ असलेल्या शॉपिंग मॉल मध्ये नेले व एक मस्त चॉकलेट केक विकत घेतला. शिवाय आम्ही थोडे मटण देखील विकत घेतले, कारण आइसलँड मध्ये मेंढ्या, शेळ्या खूपच उत्कृष्ट प्रतीच्या आहेत. आम्ही घरी आलो आणि केक कापत फोटो घेत बर्थडे एन्जॉय केला. चॉकलेट सोबत थंड दूध, हे वेगळेच समीकरण आमच्या घर मालकाने मला शिकवलं.

बहुधा त्याला आवडत असावे, पण आम्हाला देखील ते खूप पसंत पडले. रश्मीताने मग मस्त मटणाचा झणझणीत रस्सा केला, मग काय फुल्ल टू धमाल!

आम्ही घर मालकास देखील खाण्यास सांगितले. त्याच्यासाठी तो खूप तिखट होता, पण त्याला चव आवडली. आम्ही थकलो असल्याने लवकर झोपी गेलो.

तिसरा दिवस उजाडला. उठून चहा बनवण्यासाठी किचन मध्ये आलो. पाहतो तर काय मटणाचा रस्सा चाटून पुसून चक्क साफ केलेला आमच्या घर मालकाने! शेवटी इंडियन फूड ते, तो बिचारा काय कंट्रोल करणार!

आम्ही पुन्हा आमच्या बसस्टॉप पाशी आलो. आजचा टूर प्लॅन होता “गोल्डन सर्कल”. प्रत्यक्षात सर्कल नसलं तरी या टूर मध्ये खूप विशिष्ट अशा गोष्टी सामावल्या होत्या. बस आली, थोडी उशिरा. आजचे गाईड एक चाळिशीतले गृहस्थ असावेत, पण आम्ही मात्र आमच्या आदल्या दिवशीच्या गाईड ताईला मिस करत होतो.

पुढे अर्धा तास इतर टुरिस्ट ना गोळा करत आम्ही आमच्या मार्गी लागलो.

काही वेळात एक लहान धबधबा लागला “फेक्सफॉस” नावाचा. इथे थोडी विश्रांती घेऊन लगेच पुढील अवाढव्य धबधब्या पाशी आलो, “गुलफॉस”. इथे फॉस म्हणजे धबधबा हे एव्हाना वाचून लक्षात आलेच असेल.

आम्हाला दुरून भासले कि इथे वाहणारी हवीत (हवीता)नदी एकदम दरीत कोसळते की काय, पण पुढे जाऊन लक्षात आले कि ही नदी इथे ३ पायऱ्यांमध्ये खाली कोसळते ह्या धबधब्याची निर्मिती होण्यासाठी.

प्रथम ३६, मग ६९ आणि शेवटी १०५ फूट खोल! शेवटचा प्रपात तब्ब्ल ६६ फूट व्यासाचा! खरंच अविश्वसनीय आणि अवर्णनीय असा निसर्गाचा अवतार पाहून मन हरवून गेले. त्यात गंमत म्हणजे हा धबधबा कधीकाळी भाड्याने वीजनिर्मितीसाठी दिला गेला होता. आज तोच सरकारी अखत्यारीत सुरक्षित आहे!

गुलफॉसला रामराम ठोकत आम्ही बस वारी करत पुढे पाऊल टाकले.

गिझर — गरम पाण्याचे कारंजे.

ही सर्वात वेगळी आणि विशेष अशी जागा होती टूरची. ह्या गिझर नेच जगाला गरम पाण्याच्या कारंज्यासाठी “गिझर” हे नाव दिले. दर ७ ते ८ मिनिटांनी जवळ जवळ ७० मीटर उंच गरम पाणी हवेत जोरदार उडवण्याची ताकद बाळगून असलेला हा अद्भुत जादूगार पृथ्वीच्या कुशीत राहून जगाला त्याची महती सांगतो. अगदी हजारो वर्षां पासून कार्यान्वित असलेला हा गिझर नावाचा आमचा करमणूककार मात्र अहोरात्र जागृत असतो. ५० मिनिटात शक्य तेवढे फवारे डोळ्यात अन कॅमेऱ्यात टिपून घेतले आणि थोडा वेळ पोटातील भुकेचा गिझर शांत करण्यासाठी जवळील रेस्टॉरंट मध्ये घुसलो. मस्त मटण सूप आणि ब्रेड. वाह वेगळीच मेजवानी!

मटण सूप इतके छान झाले होते काय सांगू. हळूहळू खात बसलो, पण आजचा आमचा गाईड थोडा स्ट्रिक्ट होता. तो काही जास्त वेळ देण्यास तयार नव्हता. आणि आम्हीही सूप सोडायला तयार नव्हतो. मग काय ब्रेड आणि मटण सूप घेऊन बसमध्ये बसलो आणि मस्त फुरके देत खात खात पुढे निघालो.

पिंगवेल्लीर राष्ट्रीय उद्यान

ही एक ऐतिहासिक जागा तर आहेच पण निसर्गाच्या दृष्टिने अद्भुत देखील. इथेच आइसलँड च्या देशाची राजकीय उत्पत्ती एक राष्ट्र म्हणून झाली आणि आजही जगातील सर्वात जुनं पार्लमेंट इथे आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

पण एवढेच विशेष आहे असे नाही, तर हे उद्यान (प्रचंड नैसर्गिक) ज्या ठिकाणी वसले आहे तिथे पृथ्वीच्या दोन टेक्टॉनिक प्लेट्स (युरोपियन आणि अमेरिकन) एकमेकांना घासतात. इथे स्पष्टपणे ह्या दोन खंडातील दरी दृश्यास पडली आणि आम्ही एकाच वेळी दोन खंडात पाय ठेऊन मोठ्या तोऱ्याने उभे राहिलो.

दोन खंडांतून काढता पाय घेत आम्ही पुन्हा बस गाठली. पुन्हा एकदा मिशन घर. आजचा दिवस भलताच चमत्कारी ठरला होता. पाहावे ते नवलच! जसे घरी पोहोचलो, प्रथम चहा करून मस्त दिवस भरातील आठवणी चघळत पाय लांब करून राहिलेला वेळ एन्जॉय केला.

आइसलँड ला आल्यापासून रात्र पाहिलीच नव्हती, पण मेंदूला बाहेरचा खेळ एव्हाना समजून चुकला असावा कि काय किंवा तो निसर्ग निर्मितीची नवीन शकले पाहून गुंग झाला होता आणि म्हणून आराम फर्मावण्यासाठी आम्हाला झोपी पाठवत होता.

चौथा दिवस उजाडला तो थोडा आरामात, कारण आज सकाळी लवकर उठून बसची घाई नव्हती. आजची ट्रिप थोडी उशिराने सुरु होणार होती. वेळ ११ वाजताची. आम्ही बस ची वाट पाहत थांबलो होतो. आज आम्ही अजून एका प्रसिद्ध आणि विशिष्ट ठिकाणास भेट देणार होतो.

ब्ल्यू लगून –

हे मानव निर्मित लगून / स्पा लाव्हा क्षेत्रात येते. भूगर्भातील गरम पाण्याचे खास गुणधर्म जसे सिलिका व सल्फर यांचे बक्कळ प्रमाण असलेले पाणी जवळील प्लांट मधून सोडले जाते.

आम्हाला गेल्यावर कळले कि इथे पाण्यात क्लोरिन टाकण्यात येत नाही आणि लोकांना आधी आंघोळ करून मग पाण्यात उतरावे लागते. आम्ही तयारीनिशी आलो होतो घरून टॉवेल, बदली कपडे, वगैरे घेऊन.

पाणी चांगलेच गरम होते आणि वरून पाऊस पडत होता. त्यामुळे पाण्यात शिरताच खूप बरे वाटत होते. आम्हाला पहिला १ तास तर कसा गेला हेच समजले नाही. मग आम्ही मोबाईल आणून फोटोग्राफी ची हौस पुरी केली. तिथे पिण्याच्या पाण्यासाठी देखील ओपन कारंज्याची सोय होती, जेणे करून डिहायड्रेशन झाल्यास त्या कारंज्यातील पाणी प्यायचे. आम्ही तीन तास चक्क पाण्यात डुंबण्यात खर्च केले. पण त्या पाण्यात खरंच विशेष होते, ज्याचा प्रभाव स्पष्टपणे आम्हाला जाणवला.

ब्ल्यू लगून वरून निरोप घेत आम्ही पुनः घराकडे वळलो. पण आज दिवस अजून हाती होता आणि तोच पूर्ण वसूल करायचा होता. रेक्याव्हीक मधले विशेष चर्च आम्हाला साद घालत होते. नवीनतम धाटणीचे आणि आइसलँड च्या एकूण जडणघडणीला समर्पित असे “हौलग्रिम्सकिरकिया ” (Hallgrímskirkja),

पुन्हा एकदा उच्चारांची अडचण. आम्ही आत दर्शन घेऊन आणि चर्चच्या शांततेला अनुभवून बाहेर आलो. एव्हाना पाऊस सुरु झाला होता, पण ती काही अडचण नव्हती. आम्हाला भूकही लागली होती, म्हणून काही अंतरावरील रस्त्यावरील एका “फिश अँड चिप्स” च्या स्टॉल वर जाऊन मस्त मासे आणि रताळ्याचे चिप्स हादडले.

येताना वाटेत काही छोटेखानी दुकाने आणि सुंदर गल्ल्या-रस्ते यांचे निसटते चित्र उचलले.

काही वेळाने आम्ही पुन्हा घरी परतलो. आजचा दिवस तसा खूप रिलॅक्स गेला. मात्र पुढील वेळ खूप विचित्र वाटू लागला, कारण बॅगा भरून परतीसाठी तयार व्हायचे होते. आम्ही काढलेले फोटो पाहत-पाहत आणि चहाचे घोट घेत सामान आवरले आणि लवकर झोपी गेलो.

पाचवा आणि आइसलँड मधील शेवटचा दिवस उजाडला. चहा घेऊन दुपारसाठी मूग खिचडी बनवून ठेवली होती रश्मीताने, तिची फेवरेट आणि माझीही.

आम्ही घर मालकाला भेटलो. आभार प्रदर्शन आणि निरोप समारंभ उरकून जड अंतःकरणाने बसस्टॉप वर आलो. बसमध्ये बसून त्याच साऱ्या जवळील घरांना, जागांना पाहत होतो ज्यांना गेले चार दिवस फिरायला जाताना पहिले होते. आज खूप काही वेगळे भासत होते.

आम्ही एअरपोर्टवर पोहोचलो. हातात ३ तास होते. मी रश्मीताला म्हटलं कि जवळच एक पूल आहे जो युरोप आणि अमेरिका खंडांना जोडतो. चल पटकन जाऊन येऊ या! तशी रश्मीता म्हणाली कि जे काही पहिले पाहिले आहे तेच अजून नीट सावरून जोडून नाही झालं आणि आता इतक्या घाईत कशाला risk! विमान गेले तर सुटून! बस्स! जाऊ दे. नतंर पाहू पुन्हा कधीतरी. मी मनात म्हटलं आणि गपचूप तिचा सल्ला मानत एअरपोर्ट मध्ये शिरलो. पण तिलाही कुठेतरी वाटून गेले कि खरंच एकदा येऊया का जाऊन त्या पुलावर!

विमानाने भरारी घेतली आणि पूल खालीच राहिला. पण आमच्या मनाने केव्हाच आइसलँड शी एक घट्ट पूल जोडला होता जो कधीच मागे राहणार नव्हता !!!

 

Story By

तुषार आणि रश्मीता जाधव
पोलंड

देशविदेशातील विविध पर्यटनस्थळांची मराठीतून माहिती देणारा व वाचकांनाही सामावून घेणारा आपला मराठी ब्लॉग. मराठी भाषा जगली पाहिजे व ती लोकांपर्यंत वेगळ्या पद्धतीने पोहोचली पाहिजे या हेतूने आम्ही हा ब्लॉग सुरु केला. शिवाय पर्यटनस्थळांविषयी मराठीतून क्वचितच माहिती उपलब्ध आहे, म्हणूनच तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही पर्यटन हा विषय निवडला. आशा आहे तुम्हालाही नक्की आवडेल. इथे फक्त आम्हीच लिहिणार नाही तर तुम्हीही लिहितं व्हायचं. तुमचे प्रवासाचे अनुभव, गमतीजमती , कडू-गोड आठवणी आम्हांला सांगायच्या. आम्ही त्यांना तुमच्या नाव व फोटोंसहित आपल्या ब्लॉगवर प्रसिद्धी देऊ. तसंच आपल्या ब्लॉगवर प्रसिद्ध होणारे लेख तुम्हांला कसे वाटले , त्यात आणखी काही नवीन टाकता येईल का याविषयीची तुमची मतं नक्की आम्हांला कळवा. वाट पाहतोय तुमच्या अभिप्रायाची.

Enjoy this blog? Please spread the word :)

RSS
EMAIL
Facebook
Facebook
Google+
Google+
http://travelwithdreams.com/iceland
Instagram