More to Explore,  Travel Stories

सफर अविस्मरणीय केरळची…..

सफर अविस्मरणीय केरळची.....

पर्यटन म्हणजे आपल्यापैकी अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय. माझ्यासाठी तर अगदी ‘बॅग भरा आणि निघा‘ असाच ! तसं तर मित्र-मैत्रिणींसोबत आपण फिरतोच, पण कुटुंबासोबत जाण्याची मज्जाच वेगळी. त्यात अनेक कुटुंब एकत्र जाणार म्हटल्यावर ‘दुग्धशर्करायोगच’ ! मज्जा तर येईलच, पण प्रत्येकाची आवड वेगळी. म्हणतात ना, ‘व्यक्ती तितक्या प्रकृती‘ . अगदी तसंच . म्हणून आमचं सहलीला जायचं तर ठरलं, पण सगळ्यात मोठा प्रश्न होता “कुठे” ? कारण ठिकाणच असं निवडायचं होतं जिथे लहानांपासून मोठयांपर्यंत सगळ्यांनाच अगदी मनसोक्त सहलीचा आनंद घेता येईल. बराच विचार केला आणि डोळ्यांपुढे आला तो म्हणजे ‘देवांचा देश’ (God’s own country) केरळ – भारतातील सर्वाधिक हिरवाईने नटलेलं राज्य !

 

पश्चिम घाट आणि अरबी समुद्र यांच्या मध्ये वसलंय हे स्वर्ग! एक असं ठिकाण जिथे स्वच्छ नितळ पाण्याचे अथांग समुद्रकिनारेही आहेत आणि आकाशाकडे उत्तुंग झेप घेऊ पाहणारे डोंगरही आहेत. जिथे ऐतिहासिक – धार्मिक स्थळही आहेत अन् अभयारण्य, जंगलंही आहेत. जिथे दूरवर पसरलेले चहा- कॉफीचे मळेही आहेत अन् अद्ययावत आयुर्वेदही आहे. जिथे दुर्मिळ पक्ष्यांचा किलबिलाटही आहे अन् रानटी प्राण्याचं वास्तव्यही आहे. थोडक्यात काय,इथे प्रत्येकासाठी काहीतरी खास आहे. म्हणून मग आम्ही जास्त आढेवेढे न घेता केरळची सहल सुनिश्चित केली आणि ‘संजिवनी क्रीडा मंडळ’चे सर्व सदस्य ११ नोव्हेंबर रोजी केरळच्या निसर्गरम्य सफरीसाठी रवाना झालो.

संजिवनी क्रीडा मंडळ, भांडूप
संजिवनी क्रीडा मंडळाचं कुटुंब

आधी भांडुपवरून लक्झरी बसने पनवेल गाठलं आणि मग तिथून दुपारी १.१० ला जामनगर एक्सप्रेसने कोच्चीला प्रयाण केलं. प्रवास जवळजवळ २४ तासांहून अधिक होता, पण आम्ही सगळ्यांनी इतकी धमाल केली की वेळ कसा गेला कळलंच नाही. अंताक्षरीचा डाव इतका रंगात आला होता की सगळ्यांनीच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मिळून धमाल केली. सगळेच “करूया आता कल्ला, कल्ला, कल्ला”च्या मूड मध्ये होते. बघता – बघता आम्ही ‘ कोच्चि ‘ मधील एर्नाकुलम जंक्शनला पोहोचलो.आधी थोडी धास्ती होती की काही दिवसांपूर्वीच येऊन गेलेल्या पुरातून केरळ कितपत सावरलंय याची , पण एकंदर परिस्थिती खरंच चांगली होती.तिथल्या लोकांनी आमचं त्याच आत्मीयतेने आणि प्रेमाने स्वागत केलं. तिथून एसी बसने सिद्रा प्रिस्टाईन (Sidra pristine)हॉटेल कडे रवाना झालो.थोडा आराम करून सायंकाळी ५.०० वाजता क्रुझसफारी करीता मरीनड्राईव्हकडे रवाना झालो.

Cruz safari at marine drive
मरीनड्राईव्हवरील क्रूझसफारी
Marine drive
मरीनड्राईव्हवरील संध्याकाळचे दृश्य

आधी चहा – नाश्ता केला आणि शांतपणे तिथला परिसर आणि निसर्गसौंदर्य न्याहाळत होतो. जसा अंधार व्हायला लागला तसं ते सौंदर्य आणखीच मोहक दिसू लागलं. इतक्यात क्रूझवर डीजे सुरू झाला आणि माझा समाधीभंग ! सगळ्यांनी अक्षरशः धिंगाणा घातला. शेवटी क्रूझ निघण्याआधी ‘झिंगाट’ गाण्यावर थिरकताना तर सगळे सैराटच झाले. तिथून आम्ही ‘डच पॅलेस’ पाहायला गेलो.

डच पॅलेस
डच पॅलेस

तिथे कोच्चीचा इतिहास जवळून अनुभवता आला. राजवाड्यातील कोच्चीच्या राजघराण्याची कुलदेवी पझायान्नुर भगवती देवी, भगवान श्रीकृष्ण आणि शंभूदेवाचं दर्शन घेतलं. त्यासोबत १८६४ पासून कोच्चीवर राज्य केलेल्या राजांची चित्रं, नाणी, त्यांच्या जीवनावश्यक राजसी थाटातील वस्तूही जवळून पाहिल्या. काही क्षणांसाठी आम्ही प्राचीन काळातील जगणं अनुभवलं. तिथून मग चायनीज फिशिंग नेट्स पाहायला गेलो.

Chinese fishing net
चायनीज फिशिंग नेट

त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्या समुद्रात थोड्या अंतरावर कायमस्वरूपी बसवल्या आहेत आणि प्रत्येकी ६ मच्छीमारांचा एक गट एका फिशिंग नेटसाठी कार्यरत असतो.यामुळे कामाला वेग आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य नि पुरेपूर वापर होतो. आहे की नाही मासेमारीची ही आगळीवेगळी पद्धत मस्त ! या तंत्रज्ञानाच्या कमालीची वाहवा करत आम्ही पोहोचलो कोच्ची शिपयार्डला. तिथे भारतीय नौसेनेसाठी तयार केल्या जाणाऱ्या अत्याधुनिक व लढाऊ जहाजांची माहिती मिळाली.

सनसेट पॉईंट

तिथून सनसेट पॉईंट पाहून रात्री ९.०० च्या सुमारास आम्ही हॉटेलवर पोहोचलो. दिवसभरात इतके थकलो होतो की झोप कधी  लागली कळलंच नाही.

दुसऱ्या दिवशी केरळच्या कुडकुडणाऱ्या थंडीत जाग आली ती ब्लँकेट ओढून अजून थोडा वेळ झोपूया या विचारानेच! पण ते प्रसन्न आणि आल्हाददायी वातावरण नवा उत्साह, नवी ऊर्जा देत होतं . मग सगळा आळस झटकून उठलो आणि तयार झालो.सकाळी ९.०० वाजता नाश्ता करून मुन्नारसाठी प्रयाण केले. हॉटेलमधून बाहेर पडताच बोचणारी थंडी आणि गार वाऱ्याने सगळेच कुडकुडत होते .पण मला मात्र ‘ ही गुलाबी हवा , वेड लावी जीवा ‘ हे गाणं सुचलं, पण म्हटलं , राहु दे. आता नको. गुलाबी परी आयुष्यात आली की गाऊ. बाहेर धुकं पण खूप होतं म्हणून , त्यामुळे अजुनच जरा मज्जा येत होती. कोच्ची ते मुन्नार १४० किलोमीटर अंतर आहे आणि साधारण ५ तासांचा प्रवास आहे. या प्रवासात आम्ही छियापरा वॉटरफॉल , द पेरियार रिव्हर , टी गार्डन पाहिले.

छियापरा धबधबा
छियापरा धबधबा

हे स्थलदर्शन करत आम्ही सायंकाळी ‘द लेक व्ह्यू रिसॉर्ट’ वर पोहोचलो. वेड्यावाकड्या वळणांचा रस्ता आणि डोंगरावरील ते अप्रतिम हॉटेल ! ‘स्वप्न की आभास हा’ असंच फीलिंग येत होतं. हॉटेलच इतकं छान होतं की कोणालाही ‘ लव्ह ऍट फर्स्ट साईट ‘ व्हावं.मग ते पर्यटकांच्या बकेट लिस्ट मध्ये असणारच ना! आम्ही निघालो लेट लतीफ, पण नशीब जोरावर होत म्हणून शेवटी राहिलेली एक रुम तरी मिळाली आणि जीव भांड्यात पडला.

रुममध्ये जाऊन सगळ्यात आधी गॅलरी उघडली आणि बघतो तर काय! डोंगरांनी नेसलेला हिरवाकंच शालू आणि त्यावर पसरलेली धुक्याची झालर .कानात पुन्हा ‘ स्वप्न की आभास हा ‘ गाण्याचे बोल घुमू लागले. मी खरचं स्वर्गात होतो आणि त्यातच झोपी गेलो.
सकाळी लवकर आवरून मुन्नार दर्शनाला तयार झालो.

The lake view resort
द लेक व्ह्यू रिसॉर्ट

चहाचा मळा

तिथून रोझ गार्डन, कुंडाला लेक, मँट्टीपुडी धरण, इकोपॉईंट, चोक्रामुडी पॉईंट व टी गार्डनला भेट दिली.

Mattupetty dam

इको पॉईंट

Tea Museum

आतापर्यंत चित्रपटात पाहिलेलं चहाच्या मळ्याचं दृश्य प्रत्यक्षात पाहिलं. त्या मळ्याशेजारीच चहा बनवण्याची फॅक्टरी होती. तिथे आम्हांला चहाचे उत्पादन, त्याचे प्रकार याविषयी माहिती मिळाली.

चहाटळ

दिवसभरात केलेली मुन्नारची सफर अविस्मरणीय होती. तिथे काही विनोदी फोटोही आम्ही काढले आणि पुन्हा हॉटेलकडे प्रयाण केले.

गुरुवारी सकाळी एराव्हिकुलम नॅशनल पार्ककडे निघालो तेव्हा कडक ऊन पडलं होतं. त्यामुळे प्रवासात थोडे हाल झाले, पण तिथे पोहोचताच निसर्गाची अद्त किमया पाहून सगळ्यांचा थकवा निघून गेला.

तसं तर तिथे प्राणी, पक्षी व फुलांचे अनेक प्रकार आढळतात , पण तिथली खासियत म्हणजे तिथे आढळणारे निलगिरी तहर (Nilgiri tahar). त्याला ‘ ऑस्ट्रेलियन गाय’ असेही म्हणतात. या गाई केरळच्या पश्चिम घाटात आणि ऑस्ट्रेलयातच आढळतात. बकरीसारख्या दिसणाऱ्या या तहराला ‘माउंटन गोट’ असेदेखील म्हणतात.

एराव्हिकुलम नॅशनल पार्कची सफर करून आम्ही अडीमलीकडे हत्तीसफारीसाठी निघालो. याआधी लांबून पाहिलेल्या हत्तीच्या पाठीवर बसण्याचा अनुभव खूप मस्त होता.

त्यानंतर आम्ही स्पाईस गार्डनला भेट दिली आणि भारतीय मसाल्यांचे उत्पादन जवळून पाहिले. सायंकाळी तिथून हॉटेल हेवन्स गार्डनकडे रवाना झालो. आजचा अनुभवही खूप छान होता.
शुक्रवारची सकाळ उत्सुकता वाढवणारी होती, कारण आम्ही बॅकवॉटर मधील हाऊसबोटसाठी रवाना होणार होतो.

सकाळी लवकरच नाश्ता करून आम्ही अलेप्पी बीचवर रवाना झालो. त्याची खासियत म्हणजे शुक्रवारची सकाळ उत्सुकता वाढवणारी होती, कारण आम्ही बॅकवॉटर मधील हाऊसबोटसाठी रवाना होणार होतो. सकाळी लवकरच नाश्ता करून आम्ही अलेप्पी बीचवर रवाना झालो. त्याची खासियत म्हणजे इतिहासात लॉर्ड कर्झन यांनी ‘पूर्वेकडील स्वर्ग’ असे त्याचे वर्णन केले आहे. येथील समुद्रकिनाऱ्यावरील दृश्य सर्वात सुंदर दृश्यांपैकी एक आहे आणि इथली हाऊसबोट सफारी म्हणजे आठवणींच्या पोतडीतला थरारक अनुभव. म्हणूनच आम्ही एक संपूर्ण दिवस खास त्यासाठीच राखून ठेवला होता. दुपारी १२.०० वाजता इंद्रप्रस्थम हाऊसबोटमधून आम्ही दिवसभर फिरलो. अचानक पावसाने हजेरी लावली आणि थंडी एवढी वाढली की सहज चालताफिरताना पण आम्ही अंगाभोवती चादर लपेटली होती. त्या बोचऱ्या थंडीत गरमागरम साऊथ स्पेशल जेवणाचा आस्वाद घेत आम्ही केरळमधली शेवटची रात्र व्यतीत केली.

दुसऱ्या दिवशी हाऊसबोटमध्येच नाश्ता करून आम्ही कोच्चीकडे प्रयाण केले व अनेक आठवणींची शिदोरी सोबत घेऊन जड अंतःकरणाने मुंबईकडे निघणाऱ्या नेत्रावती एक्सप्रेसमध्ये बसलो. केरळ खरंच देवांचा देश आहे हे या ४-५ दिवसांत पुरतं पटलं, म्हणूनच पुन्हा इथे यायचं हे मनाशी ठरवूनच आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.

निखिल सावरटकर,
भांडूप

केरळ मधील असेच काही आनंदी क्षण :

Travel is not just moving from one place to another . It is pleasure of experience which we feel .

Read one of he  best stories of T.W.D.  by Tushar & Rashmi Jadhav of their iceland travel

देशविदेशातील विविध पर्यटनस्थळांची मराठीतून माहिती देणारा व वाचकांनाही सामावून घेणारा आपला मराठी ब्लॉग. मराठी भाषा जगली पाहिजे व ती लोकांपर्यंत वेगळ्या पद्धतीने पोहोचली पाहिजे या हेतूने आम्ही हा ब्लॉग सुरु केला. शिवाय पर्यटनस्थळांविषयी मराठीतून क्वचितच माहिती उपलब्ध आहे, म्हणूनच तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही पर्यटन हा विषय निवडला. आशा आहे तुम्हालाही नक्की आवडेल. इथे फक्त आम्हीच लिहिणार नाही तर तुम्हीही लिहितं व्हायचं. तुमचे प्रवासाचे अनुभव, गमतीजमती , कडू-गोड आठवणी आम्हांला सांगायच्या. आम्ही त्यांना तुमच्या नाव व फोटोंसहित आपल्या ब्लॉगवर प्रसिद्धी देऊ. तसंच आपल्या ब्लॉगवर प्रसिद्ध होणारे लेख तुम्हांला कसे वाटले , त्यात आणखी काही नवीन टाकता येईल का याविषयीची तुमची मतं नक्की आम्हांला कळवा. वाट पाहतोय तुमच्या अभिप्रायाची.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enjoy this blog? Please spread the word :)

RSS
EMAIL
Facebook
Facebook
Google+
Google+
http://travelwithdreams.com/gods-own-country-kerala
Instagram