More to Explore,  शोध अज्ञाताचा.....

९० अंशातलं वक्र अरण्य !(crooked forest)

जगात अशी अनेक आश्चर्य आहेत ज्यांची उत्तरं विज्ञानालाही अजून सापडली नाहीत. आता या वक्र अरण्याचंच बघा ना ! इथे ९० अंशात वाकलेली उंच वाढलेली देवदार वृक्षांची जवळजवळ ४०० झाडं आहेत. त्यांचं वैशिष्ट्य हे की ही सर्व झाडं एकाच दिशेने वक्र झालेली आहेत.सलग २२ रांगांमध्ये उत्तरपूर्व दिशेने वाढलेली ही झाडं बुंध्याजवळ ते मीटरमध्येच बरोबर वक्र झाली आहेत. पाहताक्षणी वाटावं आरामदायी खुर्चीच जणू !

वक्र अरण्याचं हे रहस्य आपल्याला ८९ वर्ष मागे घेऊन जातं. असं म्हणतात, १९३० साली काही शेतकऱ्यांनी या जागी देवदार वृक्षांची रोपं लावली. ती सात वर्षांची झाल्यावर त्यांनी वेगळं फर्निचर बनवण्याच्या दृष्टीने या झाडांचा बुंधा असा वक्राकार केला. पण नेमका त्याच वेळी पोलंडने दुसऱ्या महायुद्धात प्रवेश केला. महायुद्धामुळे हे काम अर्धवटच राहिलं. हे खरं मानलं तरी ते ऐकायला वेगळं आणि आश्चर्यजनकच वाटतं. काहींचं म्हणणं आहे की हिमवादळांमुळे झाडांच्या बुंध्याजवळ बर्फ साचला. त्यामुळे जिथून जागा मिळाली तिथून ती वाढली. पण जर असं झालं असेल, तर ती एकाच दिशेने कशी वक्र झाली हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. काही जण म्हणतात की , परग्रहावरून आलेल्या लोकांनी या झाडांना असा आकार दिला. शक्यता फार आहेत, पण नेमकं काय झालं कुणालाच ठाऊक नाही.
आता तुम्ही म्हणाल, तिथल्याच एखाद्या त्याकाळच्या रहिवाशाला विचारायचं ना ! इथेच तर घोळ आहे, कारण दुसऱ्या महायुद्धाच्या काळात संपूर्ण शहराचाच विध्वंस झाला. त्यामुळे अनेक दशकं हे शहर वैराण झालं होतं. १९७० च्या काळात इथे एक नवीन ऊर्जानिर्मिती प्रकल्प आला आणि तेव्हापासून शहराने नव्याने आकार घ्यायला सुरुवात केली. हे क्रूक्ड फॉरेस्ट अर्थात वक्र अरण्य या प्रकल्पापासून अगदी जवळ आहे

आता अनेक पर्यटक इथल्या निसर्गसंपन्न स्थळांना भेटी देतात पण, कुठलंही पर्यटनस्थळ या क्रूक्ड फॉरेस्टइतकं रहस्यमय नाही. तुम्ही या अरण्यात प्रवेश करताक्षणी नानाविध कल्पना आणि शक्यता डोक्यात घर करू लागतात. तुम्ही तेव्हा काय झालं असेल याचा ठाव घेण्याचा प्रयत्न करता पण, हाती मात्र काहीच लागत नाही. शेवटी मनात एकच विचार येतो, कदाचित या झाडांना बोलता आलं तर !
          असं हे वक्र अरण्य आहे झाशोनिओपोमोरस्की (zachodniopamorskie) प्रातांत वसलेल्या ग्रिफिनो (Gryfino) उपनगरात. जेव्हा तुम्ही पोलंडला जाल, तेव्हा नक्की पहा हे क्रूक्ड फॉरेस्ट अर्थात वक्र अरण्य !

नमस्कार मंडळी, मी पूजा.... पूजा नरेश जाधव. आपल्या ट्रॅव्हल विथ ड्रीम्स या ब्लॉगच्या माध्यमातून नवनवीन पर्यटनस्थळांची माहिती तुमच्यासमोर आणतेय. गेल्याच वर्षी तोलानी वाणिज्य महाविद्यालयातून B. Com चं शिक्षण पूर्ण केलं. सध्या स्पर्धा परीक्षांची तयारी करतेय. त्यातून वेळ मिळाला की सरळ मोर्चा वळतो तो आपलं सगळ्यात आवडतं काम करायला ! हेच आपल्या ब्लॉगसाठी नवीन पोस्ट बनवण्याकडे.... यासोबत मला नवनवीन पदार्थ बनवायला आणि खायलाही खूप आवडतात. माझा दुसरा आवडता छंद म्हणजे झाडं लावणे आणि त्यांना न्याहाळत बसणे. अधूनमधून पुस्तकंही वाचते. त्यामध्ये परीकथा, साहसकथा आणि प्रवासवर्णनं वाचण्याकडे माझा जास्त कल असतो. या सगळ्यासोबत कॉलेजमध्ये असताना ज्यूडोचं प्रशिक्षणही घेतलं. नंतर पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना महाराष्ट्र टाइम्ससोबत "कॉलेज क्लब रिपोर्टर" म्हणूनही कामाचा अनुभव घेतला. या सगळ्या उद्योगांव्यतिरिक्त मला मनसोक्त भटकंती करायला आणि त्या त्या ठिकाणचे पारंपारिक पदार्थ चाखायलाही खूप आवडतं. तिथली संस्कृती अनुभवणं, लोकांच्या लहानसहान गोष्टींचं निरीक्षण करणं यात वेगळीच मजा येते. तशी स्वप्नं बरीच आहेत, पण त्यातलं एक म्हणजे आपला हा ब्लॉग यशस्वी करायचा. तुम्ही सगळे या प्रवासात आमच्यासोबत आहात, त्यामुळे काळजीचं काही कारणच नाही. ...... खूप बोलले ना. आता थोडं थांबते. तसे आपण भेटत राहूच नवीन पोस्टसोबत. तुम्हांला पोस्ट आवडली का हे जरूर कळवा हं. वाट बघतेय तुमच्या प्रतिक्रियेची.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enjoy this blog? Please spread the word :)

RSS
EMAIL
Facebook
Facebook
Google+
Google+
http://travelwithdreams.com/crooked-forest
Instagram