Discover the unexplored,  More to Explore

असाव्या सुंदर चॉकलेटच्या टेकड्या : चॉकलेट हिल्स

‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला,
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला’

हे बालगीत लहानपणी आपण सगळ्यांनीच पाठ केलंय . अगदी आपलाही चॉकलेटचा बंगला असावा अशा कल्पनाही केल्या, पण तेव्हा काही या बंगल्यात जाण्याचा योग आला नाही. जर आता कोणी चॉकलेटच्या टेकडीवर जाऊ असं म्हटलं तर …. आणि एकच टेकडी नाही बरं का ! १७७० हून जास्त “फक्त चॉकलेटच्याच टेकड्या !” . मी काही कल्पना किंवा स्वप्न सांगत नाहीये . खरंच आहेत चॉकलेटच्या टेकड्या , पण त्या पाहायच्या असतील तर फिलिपिन्स ला यावं लागेल.
तुमचा पुन्हा एकदा गोंधळ उडालेला दिसतोय. चमकत्या ताऱ्यांच्या दर्या, गुलाबी तलाव इथपर्यंत ठीक होतं , पण आता चॉकलेटच्या टेकड्याही मिळाल्या ! कशा ? तर ही सुद्धा निसर्गाचीच एक करामत पण , गंमत अशी कि या टेकड्या मानवनिर्मित चॉकलेटच्या नसून निसर्गनिर्मित चॉकलेटच्या आहेत . यांच्या उत्पत्तीची कथाही रंजक आहे. समुद्रात आढळणाऱ्या चुनखडकापासून (Marine Limestone) या टेकड्यांची निर्मिती झाली . भूगर्भात होणाऱ्या हालचालींमुळे जमिनीचा काही पृष्ठभाग वर उचलला गेला व नंतर टेक्टॉनिक प्लेट्सच्या हालचालींमुळे तो तसाच राहिला . त्यानंतर पाऊस , भूजल, नद्या व झरे यांच्या पाण्याने या चुनखडकांची धूप (erosion) होऊन या शंकूच्या आकाराच्या टेकड्या (Conical hills) तयार झाल्या. त्यांना कॉकपीट कार्स्ट (Cockpit Karst) असेदेखील म्हणतात. तिथे विकसित झालेल्या सपाट मैदानांमुळे या टेकड्या एकमेकांपासून थोड्या अंतरावर आहेत. तसेच त्यांच्यामध्ये अनेक लहान गुहा व झरेही आहेत. या टेकड्यांची संख्या कमीत कमी १२६८ ते १७७६ इतकी आहे. त्या साधारण ३० ते ५० मीटर उंचीच्या आहेत. सगळ्यात मोठी टेकडी १२० मीटर उंच आहे. पावसाळ्यात किंवा दमट वातावरणात या टेकड्यांनी हिरवा शालू पांघरलेला असतो, तर शुष्क वातावरणात गवत सुकून गेल्यामुळे त्या चॉकलेटसारख्या दिसतात. त्यामुळे तुम्ही कधी या ठिकाणाला भेट देता यावर तुम्हाला कोणत्या रंगाचं चॉकलेट पाहायला मिळणार हे अवलंबून असतं.

ग्रीन चॉकलेट
डार्क चॉकलेट

या टेकड्यांविषयी तीन लोककथाही प्रचलित आहेत. त्या अशा कि :
एकदा दोन भांडखोर राक्षस एकमेकांशी युद्ध करत होते. युद्धात त्यांनी एकमेकांवर मोठमोठे दगड, वाळू व खडकांचा मारा केला. कित्येक दिवस ते अविरत युद्ध करत होते. अखेरीस दोघांचेही प्राण कंठाशी आले, तेव्हा ते भांडण विसरून एकमेकांचे मित्र झाले. पण तिथून जाताना त्यांनी जी नासधूस केली होती, ती साफ करायला विसरले आणि त्यापासूनच या टेकड्या निर्माण झाल्या.
दुसरी कथा रोमँटिक आहे. एरोगो (Arogo) नावाचा तरणाबांड व अतिशय ताकदवान राक्षस एलोया (Aloya) नावाच्या साध्या-सरळ तरुणीच्या प्रेमात पडला. पण एरोगोचे दुर्दैव…. एलोयाचा अचानक मृत्यू झाला.तो धक्का एरोगोला सहन झाला नाही. तो एकाकी झाला व प्रेयसी एलोयाच्या विरहात खूप रडला. जेव्हा त्याचे अश्रू वाळले, तेव्हा त्यापासून या ‘चॉकलेटच्या टेकड्या’ निर्माण झाल्या.
तिसरी कथा हास्यास्पद व रंजक आहे. फार पूर्वी बोहोल (BOHOL) प्रांतात ‘काराबाओ’ (Carabao) नावाच्या राक्षसाने आपली दहशत पसरवली होती. तो लोकांच्या शेतातील सर्व अन्नधान्य खाऊन संपवत असे. लोकांनी त्याचा अत्याचार खूप सहन केला. नंतर जेव्हा पाणी अगदीच डोक्यावरून जाऊ लागले, तेव्हा त्यांनी एक शक्कल लढवली. सर्व खराब झालेले अन्न गोळा केले व ते अशा रीतीने पसरवून ठेवले की काराबाओला पाहताक्षणी ते खाण्याचा मोह झाला. त्याने अधाशीपणे ते फस्त केले, पण त्यामुळे त्याचे पोट बिघडले. एक तर एवढा अजस्त्र राक्षस , त्यात मलविसर्जनासाठी जागा शोधण्याचीही फुरसत नाही. मग त्याने आहे तिथेच नैसर्गिक विधी सुरू केला तो अगदी पोट रिकामी होईपर्यंत ! 😷 त्यानंतर ते वाळलं आणि त्याच्याच टेकड्या तयार झाल्या.

युद्धात झालेली नासधूस की एरोगोच्या दुःखाचे डोंगर की काराबाओची विष्ठा …. नक्की काय असेल ना !!!!

तिसरी कथा थोडी किळसवाणी आहे, पण गमतीशीरही आहे. तर, या अशा ‘चॉकलेटच्या टेकड्या’ म्हणजे फिलिपिन्सला भेट देणाऱ्या सर्व पर्यटकांच्या बकेट लिस्टमधील मुख्य आकर्षण. तुम्हीही त्यांना तुमच्या बकेट लिस्टमध्ये समाविष्ट करताय ना !

नमस्कार मंडळी, मी पूजा.... पूजा नरेश जाधव. आपल्या ट्रॅव्हल विथ ड्रीम्स या ब्लॉगसाठी आकाशसोबत लिखाणाची धुरा सांभाळतेय. गेल्याच वर्षी तोलानी वाणिज्य महाविद्यालयातून B. Com चं शिक्षण पूर्ण केलं. सध्या स्पर्धा परीक्षांची तयारी करतेय. त्यातून वेळ मिळाला की सरळ मोर्चा वळतो तो आपलं सगळ्यात आवडतं काम करायला ! हेच आपल्या ब्लॉगसाठी नवीन पोस्ट बनवण्याकडे.... यासोबत मला नवनवीन पदार्थ बनवायला आणि खायलाही खूप आवडतात. माझा दुसरा आवडता छंद म्हणजे झाडं लावणे आणि त्यांना न्याहाळत बसणे. अधूनमधून पुस्तकंही वाचते. त्यामध्ये परीकथा, साहसकथा आणि प्रवासवर्णनं वाचण्याकडे माझा जास्त कल असतो. या सगळ्यासोबत कॉलेजमध्ये असताना ज्यूडोचं प्रशिक्षणही घेतलं. नंतर पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना महाराष्ट्र टाइम्ससोबत "कॉलेज क्लब रिपोर्टर" म्हणूनही कामाचा अनुभव घेतला. या सगळ्या उद्योगांव्यतिरिक्त मला मनसोक्त भटकंती करायला आणि त्या त्या ठिकाणचे पारंपारिक पदार्थ चाखायलाही खूप आवडतं. तिथली संस्कृती अनुभवणं, लोकांच्या लहानसहान गोष्टींचं निरीक्षण करणं यात वेगळीच मजा येते. तशी स्वप्नं बरीच आहेत, पण त्यातलं एक म्हणजे आपला हा ब्लॉग यशस्वी करायचा. तुम्ही सगळे या प्रवासात आमच्यासोबत आहात, त्यामुळे काळजीचं काही कारणच नाही. ...... खूप बोलले ना. आता थोडं थांबते. तसे आपण भेटत राहूच नवीन पोस्टसोबत. तुम्हांला पोस्ट आवडली का हे जरूर कळवा हं. वाट बघतेय तुमच्या प्रतिक्रियेची.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *