चिंचोटी धबधबा : दोन
तास खडकाळ वाटेवरून
प्रवास केल्यावर डोळ्याचे
पारणे फेडणारे दृश्य

मुंबईपासून जवळच वसईतील घनदाट जंगलात हा धबधबा आहे. मान्सून पर्यटनासोबत ट्रेकिंग आणि साहसाची आवड असेल तर तुम्ही चिंचोटी धबधब्याचा पर्याय निवडायला हरकत नाही. प्रवास थोडा खडतर आणि शीण आणणारा असला तरी धबधब्याजवळ पोहोचल्यावर समोरचे नयनरम्य दृश्य पाहून तो थकवा दूर पळून जातो. पक्षीप्रेमी व फोटोग्राफर्ससाठी मुंबईच्या जवळचा हा निसर्ग म्हणजे स्वर्गच जणू ! पण या साहसी सफरीवर निघण्याआधी काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे.

धबधब्याकडे जाणारा खडकाळ रस्ता


धबधब्याकडे जाणारा रस्ता खडकाळ असल्यामुळे चांगल्या प्रतीचे फ्लोटर्स किंवा ट्रेकिंग शूज घातले तर चालताना त्रास होणार नाही.

वाटेतील चिंचोटी नदीचे पात्र


या जंगलातून जाताना चिंचोटी नदी पार करावी लागते. नदीचे पात्र खडकाळ व काही ठिकाणी खोल असल्यामुळे तोल जाऊन बुडण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे सतर्क रहा. महत्त्वाचे म्हणजे एकट्याने जाण्यापेक्षा गटाने जा. धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी कोणताही एक निश्चित मार्ग नाही. त्यामुळे गावकऱ्यांची मदत घ्या. तसेच वाट जंगलातील असल्यामुळे किडे माशी चावण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे प्रथमोपचार पेटी (First-aid box) सोबत घ्या. सकाळी लवकर ट्रेकला सुरुवात केली तर मनसोक्त निसर्गाचा आनंद घेता येईल व सूर्य मावळण्यापूर्वी परतता येईल. ट्रेकला जातानाच स्वतःच्या पोटाची व पाण्याची सोय करूनच निघा. जास्त पाऊस असेल तर हा ट्रेक टाळा, कारण इथे पोलीस किंवा सुरक्षारक्षकांची सुविधा उपलब्ध नाही.
हा धबधबा मानवी वस्तीपासून आणि गोंगाटापासून तसा लांब असल्यामुळे तुम्हाला निसर्गाच्या सान्निध्यात व एकांतात शांतता अनुभवायला मिळेल. चिंचोटी धबधबा जवळजवळ १०० ते १५० फूटांवरून खाली पडतो. जास्त पाऊस असेल तर पाण्याचा प्रवाह जोर धरतो, त्यामुळे सावधानता बाळगूनच निसर्गाची मजा घ्या. दगड निसरडे असल्यामुळे चढण्याचा प्रयत्न करू नका. थोडक्यात निसर्गाच्या मर्यादेपुढे जाऊ नका आणि सतर्क राहून पावसाची मजा लुटा. ग्रुप ट्रेकसाठी चिंचोटी धबधबा उत्तम पर्याय आहे.

जायचे कसे ?
१. खाजगी वाहनाने मुंबईपासून ४० ते ५० मिनिटांचा रस्ता आहे.NH8 च्या उत्तरेकडील बाजूला वसई आहे. तिथून कामन फाट्यापर्यंत खाजगी वाहनाने जाता येते. त्याला चिंचोटी फाटादेखील म्हणतात. त्याच्या डावीकडील लेनपासून चिंचोटी धबधब्याच्या ट्रेकला सुरुवात होते.
२. ट्रेनने गेलात तर वसई व नायगाव ही जवळची स्थानकं आहेत. ट्रेनचा प्रवास जवळजवळ १.३० तासाचा आहे. तिथून पुढे रिक्षाने कामन फाट्यापर्यंत पोहोचता येते.

सर्व फोटो : गौतम खेतवाल

उंचावरून कोसळणारे शुभ्र पाणी


चिंचोटी नदीच्या पाण्याचा प्रवाह

POOJA JADHAV

नमस्कार मंडळी, मी पूजा.... पूजा नरेश जाधव. आपल्या ट्रॅव्हल विथ ड्रीम्स या ब्लॉगसाठी आकाशसोबत लिखाणाची धुरा सांभाळतेय. गेल्याच वर्षी तोलानी वाणिज्य महाविद्यालयातून B. Com चं शिक्षण पूर्ण केलं. सध्या स्पर्धा परीक्षांची तयारी करतेय. त्यातून वेळ मिळाला की सरळ मोर्चा वळतो तो आपलं सगळ्यात आवडतं काम करायला ! हेच आपल्या ब्लॉगसाठी नवीन पोस्ट बनवण्याकडे.... यासोबत मला नवनवीन पदार्थ बनवायला आणि खायलाही खूप आवडतात. माझा दुसरा आवडता छंद म्हणजे झाडं लावणे आणि त्यांना न्याहाळत बसणे. अधूनमधून पुस्तकंही वाचते. त्यामध्ये परीकथा, साहसकथा आणि प्रवासवर्णनं वाचण्याकडे माझा जास्त कल असतो. या सगळ्यासोबत कॉलेजमध्ये असताना ज्यूडोचं प्रशिक्षणही घेतलं. नंतर पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना महाराष्ट्र टाइम्ससोबत "कॉलेज क्लब रिपोर्टर" म्हणूनही कामाचा अनुभव घेतला. या सगळ्या उद्योगांव्यतिरिक्त मला मनसोक्त भटकंती करायला आणि त्या त्या ठिकाणचे पारंपारिक पदार्थ चाखायलाही खूप आवडतं. तिथली संस्कृती अनुभवणं, लोकांच्या लहानसहान गोष्टींचं निरीक्षण करणं यात वेगळीच मजा येते. तशी स्वप्नं बरीच आहेत, पण त्यातलं एक म्हणजे आपला हा ब्लॉग यशस्वी करायचा. तुम्ही सगळे या प्रवासात आमच्यासोबत आहात, त्यामुळे काळजीचं काही कारणच नाही. ...... खूप बोलले ना. आता थोडं थांबते. तसे आपण भेटत राहूच नवीन पोस्टसोबत. तुम्हांला पोस्ट आवडली का हे जरूर कळवा हं. वाट बघतेय तुमच्या प्रतिक्रियेची.

1 Comment

९. उलटा धबधबा (सडावाघापूर धबधबा)Reverse waterfall Travel with Dreams · 27/08/2018 at 5:52 pm

[…] कड्यावरून धो-धो कोसळणारे झेनिथ धबधबा, चिंचोटी धबधबा यांसारखे ‘सरळ’ धबधबे पाहिलेत आणि […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *