आपल्या भेटीस येण्यास कारण की…..

Spread the love

जग फिरण्याचा ध्यास मनी,

 

                  खुणावती दशदिशा दाही.....

                  विश्वभ्रमंतीची जिज्ञासा भारी

                 मिळे अनुभवांची शिदोरी न्यारी

 

     मग, आहात का सगळे या स्वप्नमय विश्वादौऱ्यासाठी तयार ? वाचकमित्रहो फिरणं ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून ब्रेक देते आणि स्वतःसाठी जगायला शिकवते. त्यामुळे आपल्यापैकी अनेकजण सुट्टी मिळाली की गावी पळतात. बच्चेकंपनी थीमपार्क, रिसॉर्ट्स तर कॉलेजिअन्स ट्रेकिंगच्या योजना आखतात. बरेचजण सलग येणाऱ्या सुट्ट्यांचे समायोजन करून करून परदेशवाऱ्याही करतात

 

     खरं तर परदेशवारीची सुप्त इच्छा प्रत्येकजण मनी बाळगून असतो. पण कधी सुट्टी मिळाली नाही, तर कधी आर्थिक गणित जमलं नाही म्हणून ती स्वप्नातच राहून जाते. अनेकदा तिथे जाऊन ही नीट माहिती नव्हती म्हणून काहीतरी मस्त मिस झाल्याची चुटपूट मनाला लागून राहते. त्यामुळे एखाद्या ठिकाणी जाण्याआधी तिथली संपूर्ण माहिती असणं अत्यावश्यक आहे. आता 'गुगल' बाबामुळे ही माहिती तर अगदी एका क्लिकवर उपलब्ध आहे पण इंग्रजीमध्ये ! काही मराठी ब्लॉग्सवर महाराष्ट्रातील सर्व गड-किल्ल्यांची माहिती मराठीमध्ये उपलब्ध आहे पण देश-विदेशातील आकर्षणं...... त्यांच्याबद्दल का फक्त इंग्रजीमध्येच जाणून घ्यायचं ? म्हटलं  '२७ जानेवारी' लाच का मातृभाषेवरच्या प्रेमाला पाझर फोडायचा ? करूया की एखादा छानसा मराठी ब्लॉग सुरू, जिथे मराठीमध्ये भारतासह जगातील विविध देशांची, शहरांची माहिती उपलब्ध होईल. मग या चांगल्या कामासाठी वेळ का दवडा ? म्हणून 'शुभस्य शीघ्रम' म्हणत आम्ही हा ब्लॉग सुरू केलाय. या ब्लॉगवर आपल्या वाचकांना एका टिचकीवर ( क्लिक ला मराठीत टिचकी म्हणतात बरं का ! ) विविध शहरांची संपूर्ण माहिती म्हणजे अगदी जाण्याच्या तयारीपासून ते तिथल्या विविध महत्त्वाच्या आकर्षणांपर्यंत सगळं उपलब्ध होईल

 

     हे तर झालंच पण संवाद जर दोन्ही बाजूंनी झाला तर त्यात जिवंतपणा येतो. म्हणूनच आम्ही एक प्रयोग करायचा ठरवलंय. आपल्या वाचकांनीही त्यांच्या प्रवासाचे अनुभव इथे मांडायचे. आम्ही तुमच्या नाव फोटोसहित त्यांना आपल्या ब्लॉगवर प्रसिद्ध करू. तसेच भारतामध्ये पर्यटन क्षेत्रात घडणाऱ्या घडामोडींचे ताजे अपडेट्स तुम्हांला आपल्या ब्लॉगवर पाहता येतील आणि तुमच्या शंकाही विचारता येतील. आम्ही तुम्हांला योग्य पूर्ण मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू. त्याचप्रमाणे तुम्हांला आपला ब्लॉग आणखी आकर्षक उपयुक्त करण्यासाठी नवनवीन कल्पना सुचत असतील तरबिनधास्त  आम्हांला  travelwithdreams18@gmail.com या मेल आयडीवर कळवा. अशा नाविन्यपूर्ण कल्पना आम्ही नक्की आपल्या ब्लॉगसाठी वापरू

 

     मायबाप वाचकहो तुम्हांला आमची ही कल्पना आवडली असेल तर नक्की आपल्या ब्लॉगला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातलगांनाही याविषयी जरूर सांगा. चला तर मग 'हातात हात गुंफुनी सारे' सज्ज होऊ या विश्वसफरीसाठी

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *