India,  More to Explore

शौचालय …… एक संग्रहालय

शौचालय …… एक संग्रहालय


Entrance of Museum

सुलभ आंतरराष्ट्रीय शौचालय संग्रहालय, नवी दिल्ली ( Sulabh International Museum of Toilets, New Delhi)
‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ पाहताना मनात एकच विचार खूप वेळ घर करून होता. “शौचालयांची नितांत गरज दाखवण्यासाठी त्यावर एक संपूर्ण चित्रपट तयार करावा लागला. तरीही अनेक गावं आणि दुर्गम भाग या मूलभूत सुविधेपासून वंचित आहेत.” चित्रपटगृहातून घरी येतानाही हाच विचार कितीतरी वेळ मनात घोळत होता.सहज टाईमपास म्हणून गुगलवर सर्फिंग सुरू केलं आणि दिसलं ’10 Weirdest Museums in the World’ ….. उत्सुकतेपोटी क्लिक केलं आणि आणि त्यात आपल्या देशातलं हे “शौचालय संग्रहालय” गावलं. आज फक्त टॉयलेट्स बघायचे दिवसभर असंच वाटलं. आधी प्रेमकथा, नंतर संग्रहालय…😂

Precious toilet


## Toilet museum overall view ##

इथे आहे फक्त शौचालय ! 😱

आजपर्यंत संग्रहालयात पर्यटकांच्या सोईसाठी असलेलं शौचालय पाहिलं पण संपूर्ण संग्रहालयातच शौचालय, शौचालय आणि फक्त शौचालय असं हे एकमेवच ! जगविख्यात सामाजिक कार्यकर्ते डॉ. बिंदेश्वर पाठक यांच्या अद्भुत कल्पनेतून साकार झालेलं हे संग्रहालय म्हणजे पुरातनकाळातील शौचालयांच्या उत्पत्तीपासून ते त्यांच्या आधुनिक रूपाचा इतिहास उलगडणारं ठिकाण. १९९२ साली नवी दिल्ली मध्ये त्याची स्थापना झाली. या संग्रहालयात गेल्या पाच हजार वर्षांत जगभरात शौचालय बांधणीमध्ये झालेलं बदल अधोरेखित केलेले आहेत. इथे ठेवलेल्या प्रत्येक नमुन्यामागे एक कथा आहे. त्यामुळे जसजसं आपण त्यांची माहिती घ्यायला सुरुवात करतो तशी उत्सुकता वाढत जाते.


## Porta-potti plastic bodied ##

शौचालयाचे पण ३ भागांत विभाजन 🤔

या संग्रहालयाचे वर्गीकरण प्रामुख्याने तीन भागांत केले आहे – प्राचीन , मध्ययुगीन आणि आधुनिक . सर्वात आधी गाठ पडते ती प्राचीन व्यवस्थेशी. हडप्पा संस्कृती नाव ऐकल्यासारखं वाटतंय का ? शाळेत असताना यावर थोडाफार अभ्यास केलाय आपण ! प्राचीन काळात भारतीय संस्कृती आणि लोक किती प्रगत होते याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे हडप्पा संस्कृती . इ. पूर्व ३००० च्या काळातील शौचालयं, मैलाचा निचरा करण्याची पद्धत यांची इत्यंभूत माहिती इथे मिळते. त्याचप्रमाणे या काळातील इजिप्त, जेरुसलेम, ग्रीस, रोम इत्यादी देशांतील शौचालयांचा इतिहास कळतो.
मध्ययुगीन काळात मोठमोठे सम्राट , राजे प्रशस्त किल्ल्यांवर राहणे पसंत करत. तेव्हा त्या किल्ल्यांवर या राजांनी बांधून घेतलेल्या शौचलयांचे नमुनेही इथे पाहायला मिळतात. त्याचसोबत इंग्लंडमधील टेबलटॉप टॉयलेट ( तिथेच खायचं, तिथेच बसायचं आणि तिथेच मोकळं व्हायचं😉 ) , राणी व्हिक्टोरियाचे मौल्यवान रत्नांनी सजवलेले शौचालय, ऑस्ट्रियामधील उत्कृष्ट सजावट केलेले शौचालय आणि युरोपमधील अनोख्या कमोडचे नमुने पर्यटकांना खिळवून ठेवतात.
आधुनिक शौचालयांच्या विभागात त्यांच्याशी निगडित कार्टून्स, विविध देशांतील सार्वजनिक शौचालये, त्यांच्यावरील विनोद, प्रतिष्ठित स्वच्छताविषयक साधनं बनवणाऱ्या कंपन्यांमधील शौचालयांच्या नमुन्यांचे फोटो पाहायला मिळतात. तसेच चीनमधील खेळण्यातील कमोड, ‘सुलभ’चे फिरते शौचालय, अमेरिकेतील इलेक्ट्रिक टॉयलेट, शिर्डीस्थित जगातील सर्वात मोठ्या टॉयलेट कॉम्प्लेक्सचे नमुने शौचालयांच्या प्रगत रूपाचे दर्शन घडवतात.


## Outside Model ##

शौचालयांच्या डिझाईनमागेही कथा आहे ! 😍

काही शौचालयांच्या नमुन्यांमागे पर्यटकांना अचंबित करणाऱ्या कथाही आहेत. त्यातील एक म्हणजे फ्रान्सचे चौदावे सम्राट राजा लुईस यांनी आपल्या सिंहासनामध्येच कमोड बसवून घेतले होते. म्हणजे दरबार सुरू असताना अडचण नको ना ! 😬 त्यात एकाच वेळी दोन कामं होतायत म्हणून वेळही वाचत होता. अत्याधुनिक प्रकारात पाहायचं झालं तर इनसिनोलेट ! हे एक इलेक्ट्रिक टॉयलेट आहे जे अमेरिकन नौदलाने खास त्यांच्या पणबुडीसाठी बनवले होते. यामध्ये एक बटण आहे जे दाबल्यावर काही सेकंदात मैल्याचे रूपांतर राखेत होते.😱 अशा अनेक कथांनी हे जगातील अनोखं संग्रहालय तयार झालं आहे. एवढंच नव्हे तर पर्यटकांच्या ‘मस्ट व्हिजिट’ लिस्टमध्येही आपलं स्थान बनवतंय.


## Incinolet ##

शौचालयालाही बक्षीस मिळतं ! 👏

टाईम्स मॅगझीनने जगातील विक्षिप्त संग्रहालयांपैकी एक म्हणत ‘सुलभ आंतरराष्ट्रीय शौचालय संग्रहालया’ला तिसऱ्या क्रमांकाचे स्थान दिले आहे. त्याचप्रमाणे २०१८ चा ‘एक्सपर्ट चॉईस अवॉर्ड’ ही या संग्रहालयाने पटकावला आहे. मग लवकरच तुम्हीही भेट देताय ना या अनोख्या संग्रहालयाला ?

हे माहित असलेलं बरं !

१. हे संग्रहालय वर्षाचे ३६५ दिवस सुरू असते. फक्त भारतातील राष्ट्रीय सुट्ट्यांच्या दिवशी बंद असते.
२. या संग्रहालयात प्रवेश, पार्किंग व मार्गदर्शनाची सोय मोफत उपलब्ध आहे.
३. संग्रहालयाची वेळ :
सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.०० ( १ नोव्हेंबर ते ३० मार्च
सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० ( १ एप्रिल ते ३० ऑक्टोबर )

##Book Shelf type french toilet ##

नमस्कार मंडळी, मी पूजा.... पूजा नरेश जाधव. आपल्या ट्रॅव्हल विथ ड्रीम्स या ब्लॉगसाठी आकाशसोबत लिखाणाची धुरा सांभाळतेय. गेल्याच वर्षी तोलानी वाणिज्य महाविद्यालयातून B. Com चं शिक्षण पूर्ण केलं. सध्या स्पर्धा परीक्षांची तयारी करतेय. त्यातून वेळ मिळाला की सरळ मोर्चा वळतो तो आपलं सगळ्यात आवडतं काम करायला ! हेच आपल्या ब्लॉगसाठी नवीन पोस्ट बनवण्याकडे.... यासोबत मला नवनवीन पदार्थ बनवायला आणि खायलाही खूप आवडतात. माझा दुसरा आवडता छंद म्हणजे झाडं लावणे आणि त्यांना न्याहाळत बसणे. अधूनमधून पुस्तकंही वाचते. त्यामध्ये परीकथा, साहसकथा आणि प्रवासवर्णनं वाचण्याकडे माझा जास्त कल असतो. या सगळ्यासोबत कॉलेजमध्ये असताना ज्यूडोचं प्रशिक्षणही घेतलं. नंतर पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना महाराष्ट्र टाइम्ससोबत "कॉलेज क्लब रिपोर्टर" म्हणूनही कामाचा अनुभव घेतला. या सगळ्या उद्योगांव्यतिरिक्त मला मनसोक्त भटकंती करायला आणि त्या त्या ठिकाणचे पारंपारिक पदार्थ चाखायलाही खूप आवडतं. तिथली संस्कृती अनुभवणं, लोकांच्या लहानसहान गोष्टींचं निरीक्षण करणं यात वेगळीच मजा येते. तशी स्वप्नं बरीच आहेत, पण त्यातलं एक म्हणजे आपला हा ब्लॉग यशस्वी करायचा. तुम्ही सगळे या प्रवासात आमच्यासोबत आहात, त्यामुळे काळजीचं काही कारणच नाही. ...... खूप बोलले ना. आता थोडं थांबते. तसे आपण भेटत राहूच नवीन पोस्टसोबत. तुम्हांला पोस्ट आवडली का हे जरूर कळवा हं. वाट बघतेय तुमच्या प्रतिक्रियेची.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *