India,  More to Explore,  शोध अज्ञाताचा.....

रांजण खळगे : कधीही न आटणारे !

‘रांजण’ हा शब्द वाचून तुम्हाला काही आठवलं का ? मला तर तहानलेल्या कावळ्याची गोष्ट आठवली. त्याने नाही का, रांजणात लहान – लहान दगड टाकले. त्यामुळे पाण्याची पातळी वाढली. मग तो ते पाणी प्यायला आणि स्वतःची तहान भागवली. अशीच काही रांजणं आहेत महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातील शिरूर व अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या कुकडी नदीमध्ये. पण, ही रांजणं कोणी मनुष्याने बनवली नाहीत, ती आपोआप तयार झाली आहेत. एवढंच नाही तर, “आशिया खंडातील महाकाय जलकुंड” म्हणून त्यांची गिनिज बुकमध्ये नोंदही झाली आहे. त्यांनाच रांजण खळगे म्हणतात.


या जलकुंडांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती बारमाही आहेत. दुष्काळ पडला तरी आटत नाहीत ! विज्ञान सांगतं, ही नद्यांची भौगोलिक विशेषता आहे. त्या पाण्यासोबत लहानमोठे दगडगोटे वाहून आणतात आणि प्रवाह संथ झाला की ते तिथेच असलेल्या खाचखळग्यांमध्ये साठतात. पाण्याच्या प्रवाहानुसार हे खाचखळग्यांमध्ये साठलेले दगडगोटे तिथल्या तिथेच आपटत- फिरत राहतात. त्यामुळे रांजणाच्या आकाराचे गोल खळगे तयार होतात. बेसाल्ट खडकांमध्ये तयार झालेले हे खळगे हळूहळू मोठे होतात आणि मग त्यातूनच जलकुंडांची निर्मिती होते. पण त्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी लागतो. असेच तयार झालेले हे रांजण खळगे !    

रांजण खळगे

पाण्याचा प्रवाह व दगडगोट्यांच्या करामतीने कुकडी नदीवर खिंड तयार झाली आहे. तिची लांबी २०० मीटर आणि रुंदी ६० मीटर आहे. त्यात तयार झालेले विविध आकारांचे, लांबी-रुंदींंचे खळगे अगदी गुळगुळीत आहेत. ते पाहताना आपण जणू मंगळावरच आलोय असं वाटावं ! जशी वर्ष लोटली तशी या खळग्यांची खोलीही वाढतच गेली. काही ठिकाणी तर अगदी १०० फूट खोल खळगेही आहेत ! निसर्गाची ही निर्मिती खरंच सुंदर आहे. कारण, खळगे बनायला वर्षानुवर्षांचा काळ लागत असला तरी त्यानंतर दिसणारं दृश्य मात्र विलोभनीय असतं. 

या रांजणखळग्यांबाबत आणखी एक दुर्मीळ गोष्ट म्हणजे इथे राहणाऱ्या पक्ष्यांनी बनवलेली मातीची घरटी. घरटीही दुर्मीळ आणि इथे आढळणारे पक्षीही ! भारतातील खूप कमी ठिकाणी अशी घरटी पाहायला मिळतात. त्यामुळे रांजणखळग्यांची सफर पक्षीप्रेमींसाठीही पर्वणीच ठरते.

पक्ष्यांनी बनवलेली मातीची घरटी

    पूर्वी फक्त भौगोलिक बदलांचा अभ्यास करणारे अभ्यासकच इथे यायचे पण, गिनिज बुकमध्ये नोंद झाल्यानंतर अनेक उत्साही पर्यटकही ही निसर्गाची निर्मिती पाहायला आवर्जून येतात. याशिवाय कुकडी नदीपात्राच्या दोन्ही बाजूंना असलेली मळगंगा देवीची मंदिरं आणि या दोन्ही मंदिरांना जोडणारा ‘झुलता पूल’ही पर्यटकांमध्ये आकर्षणाचा विषय ठरतोय. त्यामुळे पर्यटकांची गर्दीही वाढतेय. मग या वीकेंडला तुम्हीही करा की बेत रांजण खळगे पाहण्याचा ! त्यासोबतच तुम्ही मोराची चिंचोली हे पर्यटनस्थळही पाहू शकता.

नदीपात्राजवळील मळगंगा देवीची मंदिरं

नमस्कार मंडळी, मी पूजा.... पूजा नरेश जाधव. आपल्या ट्रॅव्हल विथ ड्रीम्स या ब्लॉगच्या माध्यमातून नवनवीन पर्यटनस्थळांची माहिती तुमच्यासमोर आणतेय. गेल्याच वर्षी तोलानी वाणिज्य महाविद्यालयातून B. Com चं शिक्षण पूर्ण केलं. सध्या स्पर्धा परीक्षांची तयारी करतेय. त्यातून वेळ मिळाला की सरळ मोर्चा वळतो तो आपलं सगळ्यात आवडतं काम करायला ! हेच आपल्या ब्लॉगसाठी नवीन पोस्ट बनवण्याकडे.... यासोबत मला नवनवीन पदार्थ बनवायला आणि खायलाही खूप आवडतात. माझा दुसरा आवडता छंद म्हणजे झाडं लावणे आणि त्यांना न्याहाळत बसणे. अधूनमधून पुस्तकंही वाचते. त्यामध्ये परीकथा, साहसकथा आणि प्रवासवर्णनं वाचण्याकडे माझा जास्त कल असतो. या सगळ्यासोबत कॉलेजमध्ये असताना ज्यूडोचं प्रशिक्षणही घेतलं. नंतर पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना महाराष्ट्र टाइम्ससोबत "कॉलेज क्लब रिपोर्टर" म्हणूनही कामाचा अनुभव घेतला. या सगळ्या उद्योगांव्यतिरिक्त मला मनसोक्त भटकंती करायला आणि त्या त्या ठिकाणचे पारंपारिक पदार्थ चाखायलाही खूप आवडतं. तिथली संस्कृती अनुभवणं, लोकांच्या लहानसहान गोष्टींचं निरीक्षण करणं यात वेगळीच मजा येते. तशी स्वप्नं बरीच आहेत, पण त्यातलं एक म्हणजे आपला हा ब्लॉग यशस्वी करायचा. तुम्ही सगळे या प्रवासात आमच्यासोबत आहात, त्यामुळे काळजीचं काही कारणच नाही. ...... खूप बोलले ना. आता थोडं थांबते. तसे आपण भेटत राहूच नवीन पोस्टसोबत. तुम्हांला पोस्ट आवडली का हे जरूर कळवा हं. वाट बघतेय तुमच्या प्रतिक्रियेची.

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enjoy this blog? Please spread the word :)

RSS
EMAIL
Facebook
Facebook
Google+
Google+
http://travelwithdreams.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A3-%E0%A4%96%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A5%87-ranjan-khalge
Instagram