युद्धभूमी गाजवणारा रणगाडा

More to Explore अद्भुत संग्रहालय
Spread the love

युद्धभूमी गाजवणारा रणगाडा

आशिया खंडातील एकमेव रणगाडा संग्रहालय 😱

तुम्हाला इतिहास आवडतो ? ऐतिहासिक घटना , प्रसंग जाणून घ्यायची उत्सुकता आहे ? जागतिक महायुद्धात कोणकोणती शस्त्रास्त्रे, दारुगोळा वापरला गेला या सगळ्याची जवळून माहिती घ्यायचीय ? तर मग तुम्ही अहमदनगर जिल्ह्यातील कँव्हल्री रणगाडा संग्रहालयाला नक्कीच भेट द्यायला हवी. अतिशय दुर्मीळ आठवणींचा खजिना असलेलं आशिया खंडातील हे एकमेव रणगाडा संग्रहालय आहे. अहमदनगरमधील सशस्त्र सेना केंद्र आणि शाळा यांच्या साहाय्याने फेब्रुवारी १९९४ मध्ये या रणगाडा संग्रहालयाची स्थापना करण्यात आली. विस्तृत जागेत पसरलेल्या या रणगाडा संग्रहालयाची खासियत म्हणजे वेगवेगळ्या महायुद्धांत वापरल्या गेलेल्या जवळजवळ ५० रणगाड्यांची माहिती त्यांच्या मॉडेल्ससह इथे आपल्याला मिळते. संग्रहालयाच्या आवारात उंचच उंच नारळी वृक्ष आपले स्वागत करतात. आवारातून थोडं पुढे गेल्यावर “नेचर पार्क” नावाचं छोटं उद्यान आहे. निसर्गाचं सौंदर्य पाहून हरखून जाताना आपण कधी इतिहासातल्या विश्वात प्रवेश करतो कळतच नाही . तिथून सुरु होते सफर इतिहासाची…..

रणगाड्यांची निर्मिती कशी झाली ?🤔

सगळीकडे मोठमोठे , वेगवेगळे रणगाडे पाहून विचार येतो, हे रणगाडे कसे , कुणी आणि का बनवले असतील ? तेथील पिवळ्या रंगाचा फलक याचं उत्तर देतो. विसाव्या शतकात सगळीकडे अराजकता , अशांती माजली होती. छोट्या मोठ्या घोडदळी युद्धांत बरेच सैनिक मारले जात होते. तेव्हा आपल्या सैनिकांच्या रक्षणासाठी आणि अनिश्चितता, दहशत पसरवून शत्रूपक्षाचा नाश करण्यासाठी ब्रिटिशांनी या रणगाड्यांची निर्मिती केली.बिग विलि हा पहिला नमुना त्यांनी तयार केला. १९१६ साली झालेल्या सोम्मे येथील युद्धात ब्रिटिशांनी पहिल्यांदा आपला रणगाडा वापरून शत्रूचा नि:पात केला. भारतानेही स्वातंत्र्योत्तर काळात १९४८ साली जोझिला पास, १९६० साली गोवा , १९६२ मध्ये चुशुल आणि सेला पास आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे १९६५ आणि १९७१ च्या भारत-पाक युद्धात भारताने याच रणगाड्यांचा कुशलतेने वापर करुन शत्रूसैन्याला पराभूत केले होते.

रणगाड्यांचं नामकरण व त्यामागील कथा 😎

इतिहासाचा मागोवा घेताना आपण भेट देतो ‘रोल्स रॉईल्स आर्मर्रड कार’ या सर्वात जुन्या व यशस्वी कामगिरी बजावणाऱ्या रणगाड्याला. या ४.७ टन वजनाच्या रणगाड्याचा वापर पहिल्या महायुद्धात, व दुसर्या महायुद्धाच्या काळात केला गेला. सुप्रसिद्ध ब्रिटिश लेखक, लष्करी अधिकारी आणि कुशल राजनीती तज्ज्ञ थॉमस एडवर्ड लॉरेन्स याने या रणगाड्याच्या मदतीने तुर्की सैन्यावर विजय मिळवल्यानंतर या रणगाड्याच्या ९ मॉडेल्सना *”रुबी रत्नापेक्षाही जास्त मौल्यवान”* अशी उपाधी दिली होती. दुसरा महत्त्वाचा ‘व्हँलेंटाईन रणगाडा’. नाव थोडं विचित्र वाटतंय ना … युद्धाच्या वस्तूला प्रेमाची उपमा…! सांगते. कारणं बरीच आहेत . याचा नमुना लष्कर विभागाला १४ फेब्रुवारी , १९४० रोजी दाखवण्यात आला आणि एक कारण म्हणजे ज्यांचा अमूल्य सहभाग व्हँलेंटाईनसह अनेक रणगाड्यांचे नमुने बनवण्यात होता ते सर जॉन व्हँलेंटाईन कार्डेन यांच्या नावावरुन या रणगाड्याचं व्हँलेंटाईन असं नामकरण झालं. याचा वापर ब्रिटिश, न्यूझीलंड व रेड आर्मीच्या लष्करांनी केला. याची उत्पत्ती अमेरिकेत दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी करण्यात आली. हा पायदळ रणगाडा १९४० पासून १९६० पर्यंत लष्कर सेवेत होता.

नंतर आपण पोहोचतो ते भारताची शान असलेल्या संपूर्ण भारतीय बनावटीच्या ” विजयंता “पाशी. या रणगाड्याने १९६५ सालापासून २००८ पर्यंत यशस्वीरित्या भारतीय लष्कराची सेवा केली. नंतर लक्ष वेधून घेतो तो ‘शर्मन क्रॅब’ हा खेकड्यासारखा असलेला पुढून साखळ्यांनी वेढलेला रणगाडा. शत्रूच्या प्रदेशात सैनिकांसाठी वाटेतले अडथळे दूर करण्यासाठी याचा वापर केला गेला आहे. अशीच मटिल्डा, चर्चिल , पीटी -७६ अँम्फिबियस अशा एकापेक्षा एक प्रत्येक रणगाड्याची गोष्ट जाणून घेत आपण मेमरी हॉलमध्ये प्रवेश करतो. इथे आल्यावर एक वेगळाच उत्साह वाटतो. या हॉलमध्ये भूतकाळाच्या सगळ्या आठवणी ताज्या होतात. भारतीय सैनिकांच्या यशोगाथांची ,मुत्सद्दी लष्करी अधिकाऱ्यांच्या सन्मानाची व पराक्रमांची , सीमेवरील स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाची छायाचित्रं , तहान-भूक विसरुन देशाच्या विजयासाठी लढणाऱ्या सैनिकांची युद्धभूमीवरील क्षणचित्रं, काचेच्या पेटीत जतन करून ठेवलेले रणगाड्यांचे नमुने पाहून मन प्रसन्न होतं. सैनिकांचा अभिमान वाटतो.

अशा प्रकारे इतिहासाची पाने उलगडत आपण ही सफर पूर्ण करतो आणि एका नव्या सकारात्मक उमेदीने आणि सळसळत्या उत्साहाने परतीच्या प्रवासाला निघतो.

हे माहीत असलेलं बरं !😀

१. हे संग्रहालय दररोज सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० या वेळात सुरू असते.

२. प्रवेश मूल्य प्रत्येकी १० रुपये आहे.

३. फोटोग्राफीसाठी वेगळे शुल्क आकारले जाते.