Discover the unexplored,  India,  More to Explore

कार है कमाल 😍 ( Wonder Cars )


कार है कमाल😍

मित्रांनो तुम्ही बालपणी ‘नॉडी’ चं कार्टून पाहिलंय का ? त्यामधली आपला सुपरहिरो ‘नॉडी’ आणि त्याची छोटीशी टुमदार कार किती मस्त आहे ना ! टीव्हीवर ते कार्टून पाहताना “माझ्याकडे पण अशीच मस्त कार असती तर …… मी पण अशीच ऐटीत माझ्या छोट्याशा कारमधून फिरले असते. कधीतरी पोलीस काकांचं लक्ष चुकवून ‘झिप झॅप झूप’ करत पसार झाले असते. कारला मस्त वेगळ्या फुलाच्या आकारात बनवून घेतलं असतं. मग रस्त्याने जाताना माझीच गाडी सगळ्यात आकर्षक आणि लक्षवेधी ठरली असती”, अशी स्वप्नं आपल्यापैकी अनेकांनी पाहिली असतील.
आपण फक्त स्वप्नं पाहिली, पण ती सत्यात उतरवली मात्र एका अवलियाने. आज आपण त्याच्याच अनोख्या कलाकृतीला भेट देणार आहोत. ते आहे गाड्यांचं एक अनोखं संग्रहालय “सुधा कार्स संग्रहालय” (Sudha Cars Museum).

काय दडलंय सुधा कार्स संग्रहालयात ?
या संग्रहालयात दडलंय सुधाकर यांच्या कल्पनाशक्तीचं गुपित ! फक्त सांगितलं तर विश्वास बसणार नाही म्हणून फोटोंसहित दाखवतोय सुधाकर यादव यांची कमाल.😎 या संग्रहालयात आहेत त्यांनी स्वतः बनवलेल्या १५० विविध आकाराच्या गाड्या, ३०हून अधिक सायकल्स आणि १२ प्रकारांच्या मोटारसायकल्स. भंगारातून साहित्य गोळा करून त्यांनी आपल्या दैनंदिन जीवनातील वस्तूंच्या आकाराच्या गाड्या बनवल्या. अगदी स्वप्नवत वाटावे असे हे संग्रहालय दर्शकांना आपल्या अनोख्या गाड्यांच्या कमालीने मंत्रमुग्ध करते.
सुधा कार्स संग्रहालय म्हणजे व्हिंटेज आणि आधुनिक गाड्यांच्या विविध मॉडेल्सचा संगम असणारं एकमेव संग्रहालय आहे. इथे मुख्यतः जुन्या-नव्या, लहान – आलिशान गाड्या व बाईक्सचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो. इथे दहा माणसं बसतील एवढी जगातील सगळ्यात छोटी डबलडेकर बस आहे, तर साधारण ३३ सेंमी उंचीची सगळ्यात लहान पण ताशी ३० किलोमीटर वेगाने धावणारी मोटरसायकलही आहे. त्याचसोबत लंडनच्या रेड बसचं मॉडेल, लिपस्टिक, फुटबॉल, कमोड, पलंग, सोफा, शिवलिंग, कॅमेरा, बर्गर, हेल्मेट, शूज, नववधूचा पोशाख इत्यादी विविध आकारांत असणाऱ्या कार्स मनोवेधक ठरतात.
इथे फक्त कार्सचे नमुनेच ठेवलेले नाहीत तर त्यांच्या शेजारी गाडीची मूळ माहिती, तिला बनवण्यासाठी लागलेला वेळ आणि तिचा जास्तीत जास्त वेग यांची माहितीदेखील दिली आहे. या गाड्या बहुतांशी निरुपयोगी व भंगाराच्या सामानातून बनवल्या असल्या तरीही अगदी सामान्य गाडीप्रमाणे रस्त्यावर चालवता येतात. त्यांचं प्रत्येक मॉडेल बनवण्यासाठी
कमीत कमी २० दिवस ते ३ वर्षांपर्यंतचा कालावधी लागतो, तर ८५,००० ते १,५०,००० रुपयांपर्यंत खर्च येतो. असे असले तरीही या गाड्या कधीच विक्रीसाठी ठेवल्या जात नाहीत, हे वैशिष्ट्य. या गाड्या दरवर्षी एक दिवस ठरवून संग्रहालयाबाहेर ‘रोड शो’ साठी आणल्या जातात, जिथे लोक त्यांना प्रत्यक्षात रस्त्यावर चालताना पाहू शकतात.

हे संग्रहालय अस्तित्वात आलं तरी कसं ?
म्हणतात ना, “बाळाचे पाय पाळण्यात दिसतात” , अगदी तसंच या संग्रहालयाचे पाय सुधाकर यांच्या बालपणात दिसतात. जेव्हा सामान्य मुलं आपल्या कल्पनाविश्वात रमलेली असतात, तेव्हा या मुलाच्या कल्पना प्रत्यक्षात आकार घेऊ लागल्या. वयाच्या १४ व्या वर्षी स्वतःची पहिली सायकल डिझाईन केली. तो प्रयोग यशस्वी झाला आणि त्याचा हुरूप वाढला. मग पुढच्याच वर्षी त्याने स्वतःची चालवण्यास व हाताळण्यास सोपी ‘इझी रायडर मोटरबाईक’ बनवली. इंटरमीजिएटच्या दुसऱ्या वर्षाला शिकत असताना त्याने चारचाकी बनवण्याचा प्रयोग करायचं ठरवलं आणि आकर्षक डून बग्गी (Dune Buggy) बनवली. असेच एक-एक प्रयोग यशस्वी होत गेले आणि सुधाकर यांच्या मेहनतीने ‘गिनीज बुक’ला ही आपल्या कल्पनाशक्तीची दखल घ्यायला भाग पाडलं. त्यांनी २००५ साली बनवलेल्या तीन चाकी सायकल (Tricycle) ची ‘गिनीज बुक’ मध्ये जगातील सर्वात मोठी सायकल म्हणून नोंद झाली. तिची उंची ४१.६ फूट, वजन ३ टन, चाकांचा व्यास १७ फूट आणि लांबी ३७.३ फूट आहे. आता असे वेगवेगळे मॉडेल्स तर बनवले, पण ते एकाच ठिकाणी संग्रहित करावे व सगळ्यांना ते पाहता यावेत या हेतूने २०१० साली सुधाकर यांनी ‘सुधा कार्स संग्रहालयाची’ स्थापना केली आणि पर्यटकांच्या ‘मस्ट व्हिजिट’ स्थानांमध्ये मान मिळवला.

निर्मितीकाराच्या नजरेतून…..
आपल्या अनोख्या आवडीबद्दल आणि या संग्रहालयाबद्दल सांगताना सुधाकर यादव म्हणतात ,”लहानपणापासूनच मला कार्सची खूप आवड आहे. सगळीकडे फक्त कार्सच दिसतात . त्यामुळे मी जेव्हा लहानसहान प्रयोग करायला सुरुवात केली, तेव्हापासूनच कुटुंबीयांचा पाठिंबा मिळाला.त्यांनी कधीच मला अडवलं नाही.त्यामुळेच मला नवनवीन कल्पना अंमलात आणता आल्या. त्यातील एक म्हणजे खास प्रसंगांना नजरेसमोर ठेवून गाड्यांची निर्मिती करणे.जागतिक महिलादिनासाठी पर्सच्या आकाराच्या कार्स बनवण्यात आल्या होत्या, ज्यांची इंजिन क्षमता ६ सीसी आहे . बालदिनाचे औचित्य साधून पेन,पेन्सिल, शार्पनर आणि बॅटच्या आकाराच्या कार्स डिझाईन केल्या. याव्यतिरिक्त सामाजिक संदेश देण्याच्या हेतूने जागतिक एड्स दिनाच्या दिवशी ‘कंडोम’ च्या आकाराची बाईक लोकांसमोर आणली, तर फुटबॉल फिवरची छटा पसरलेली असताना ‘फिफा फुटबॉल’ ला समर्पित कार बनवली. कधीही विचार केला नव्हता की आपण असं एकमेव संग्रहालय बनवू जिथे देशविदेशातील पर्यटक उत्साहाने येतील. पण लोकांचा सकारात्मक प्रतिसाद पाहून केलेल्या कामाचं चीज झाल्यासारखं वाटतं”.

हे संग्रहालय नक्की आहे तरी कुठे ?
मध्य हैद्राबादपासून ६ किलोमीटर अंतरावर असलेल्या बहादूरपूर शहरामध्ये जगातील हे आगळंवेगळं गाड्यांचं संग्रहालय वसलेलं आहे. जगप्रसिद्ध हैद्राबादी बिर्याणीसारखंच हे संग्रहालयही एकमेवाद्वितीय ! इथे आल्यानंतर वेळात वेळ काढून पाहावं असं कारण, लहानपणी गाड्यांचे कार्टून्स आवडीने पाहणाऱ्यांसाठी बालपणीचे स्वप्न प्रत्यक्षात अनुभवण्याची ही एक छान पर्वणीच असेल. मग तुम्हीही करताय ना या अनोख्या कार्स संग्रहालयाला तुमच्या ‘विशलिस्ट’ मध्ये ऍड ?

जाण्यापूर्वी हे माहीत असलेलं बरं !
१. हे संग्रहालय दररोज सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० पर्यंत खुले असते.
२. प्रौढ व्यक्तींसाठी प्रवेशमूल्य प्रत्त्येकी ५० रुपये अणे तर, लहान मुलांसाठी प्रत्येकी १५ रुपये आहे.

कार संग्रहालयाचे काही फोटो


 

नमस्कार मंडळी, मी पूजा.... पूजा नरेश जाधव. आपल्या ट्रॅव्हल विथ ड्रीम्स या ब्लॉगसाठी आकाशसोबत लिखाणाची धुरा सांभाळतेय. गेल्याच वर्षी तोलानी वाणिज्य महाविद्यालयातून B. Com चं शिक्षण पूर्ण केलं. सध्या स्पर्धा परीक्षांची तयारी करतेय. त्यातून वेळ मिळाला की सरळ मोर्चा वळतो तो आपलं सगळ्यात आवडतं काम करायला ! हेच आपल्या ब्लॉगसाठी नवीन पोस्ट बनवण्याकडे.... यासोबत मला नवनवीन पदार्थ बनवायला आणि खायलाही खूप आवडतात. माझा दुसरा आवडता छंद म्हणजे झाडं लावणे आणि त्यांना न्याहाळत बसणे. अधूनमधून पुस्तकंही वाचते. त्यामध्ये परीकथा, साहसकथा आणि प्रवासवर्णनं वाचण्याकडे माझा जास्त कल असतो. या सगळ्यासोबत कॉलेजमध्ये असताना ज्यूडोचं प्रशिक्षणही घेतलं. नंतर पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना महाराष्ट्र टाइम्ससोबत "कॉलेज क्लब रिपोर्टर" म्हणूनही कामाचा अनुभव घेतला. या सगळ्या उद्योगांव्यतिरिक्त मला मनसोक्त भटकंती करायला आणि त्या त्या ठिकाणचे पारंपारिक पदार्थ चाखायलाही खूप आवडतं. तिथली संस्कृती अनुभवणं, लोकांच्या लहानसहान गोष्टींचं निरीक्षण करणं यात वेगळीच मजा येते. तशी स्वप्नं बरीच आहेत, पण त्यातलं एक म्हणजे आपला हा ब्लॉग यशस्वी करायचा. तुम्ही सगळे या प्रवासात आमच्यासोबत आहात, त्यामुळे काळजीचं काही कारणच नाही. ...... खूप बोलले ना. आता थोडं थांबते. तसे आपण भेटत राहूच नवीन पोस्टसोबत. तुम्हांला पोस्ट आवडली का हे जरूर कळवा हं. वाट बघतेय तुमच्या प्रतिक्रियेची.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *